एटीएममधून पैसे काढताय? मशिनमधून आलेले पैसे वेळेत घ्या नाहीतर…; विथड्रॉवल नियमात होणार बदल
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  एटीएममधून पैसे काढताय? मशिनमधून आलेले पैसे वेळेत घ्या नाहीतर…; विथड्रॉवल नियमात होणार बदल

एटीएममधून पैसे काढताय? मशिनमधून आलेले पैसे वेळेत घ्या नाहीतर…; विथड्रॉवल नियमात होणार बदल

HT Marathi Desk HT Marathi
Dec 09, 2024 11:48 AM IST

ATM Cash Withdrawal Rules : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल करणार आहे. सुरुवातीला देशातील निवडक एटीएम केंद्रांवर ही सुविधा सुरू होणार आहे.

एटीएम
एटीएम

ATM Cash Withdrawal Rules : एटीएम केंद्रातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मोठा बदल करणार आहे. याअंतर्गत आता देशभरातील निवडक एटीएममध्ये कॅश रिट्रॅक्शनची (Cash Retraction) सुविधा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. म्हणजेच एटीएममधून काढलेली रक्कम ग्राहकानं कॅश ट्रेमधून वेळेत उचलली नाही तर ती पुन्हा मशिनमध्ये जमा होणार आहे. ग्राहकांची वेगवेगळ्या मार्गांनी होणारी फसवणूक रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ग्राहकानं वेळेत ते पैसे उचलले नाही तर ते पुन्हा मशिनमध्ये परत जाण्याची एक सुविधा असते. ही पद्धत पूर्वी सुरू होती. मात्र, या सुविधेचा गैरवापर केला जात होता. फसवणूक करणारे लोक अर्धवट रक्कम उचलत असत आणि उरलेली रक्कम मशिनमध्ये पुन्हा जमा होई. मात्र, रेकॉर्डमध्ये संपूर्ण रक्कम परत आल्याची नोंद होत असे. यामुळं बँकांचं मोठं नुकसान होत होतं. त्यामुळं आरबीआयनं २०१२ मध्ये ही सुविधा बंद केली.

फसवणुकीचा नवा फंडा

यानंतर चोरट्यांनी एटीएम बूथवर फसवणुकीचा नवा मार्ग शोधला. कॅश-ट्रेसमोर बनावट कव्हर लावून ते एटीएम बंद करतात. त्यामुळं मशिनमधून येणारी रोकड मध्येच अडकते. ती ग्राहकाला दिसत नाही. त्यामुळं ट्रान्झॅक्शन फेल झाल्याचं समजून ग्राहक निघून जातो. यानंतर फसवणूक करणारे तिथं पोहोचतात आणि बनावट कव्हर काढून रोख रक्कम काढतात. यावर मात करण्यासाठी आरबीआयनं बँकांना अधिक तांत्रिक सुरक्षेसह रोख रक्कम काढण्याची प्रणाली लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

‘इथं’ सुरू होणार सुविधा

फसवणुकीची शक्यता जास्त असलेल्या एटीएममध्ये ही सुविधा पुन्हा कार्यान्वित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. हे तंत्रज्ञान राबवण्यासाठी बँकांना ही एटीएम मशिन अद्ययावत करण्यास सांगण्यात आलं आहे.

ग्राहकांच्या हितांचं रक्षण होणार

जिथं ग्राहक चुकून पैसे काढण्यास विसरतात किंवा कोणत्याही कारणास्तव पैसे मशिनमधून काढू शकत नाहीत तिथं हे तंत्र अधिक प्रभावी ठरणार आहे. तसंच, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीनं दुसऱ्या ग्राहकाचे पैसे घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला रोखण्यासाठीही हे तंत्र उपयुक्त ठरेल.

Whats_app_banner