Asian Paints Q2 Results : नामांकित पेंट कंपनी एशियन पेंट्सच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून घसरण सुरू आहे. आजही ही घसरण सुरूच राहिली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज कंपनीचा शेअर ९ टक्क्यांपर्यंत खाली घसरून २५०७ रुपयांवर आला. सप्टेंबर अखेरच्या तिमाही निकालानंतर ही मोठी घसरण झाली आहे.
सप्टेंबर तिमाहीच्या निकालानंतर अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी एशियन पेंट्सच्या शेअर्सवरील रेटिंग कमी केलं आहे आणि टार्गेट प्राइसही खाली आणली आहे. वाढती स्पर्धा आणि कमकुवत दृष्टीकोन हे कारण यासाठी विश्लेषकांनी दिलं आहे.
परदेशी ब्रोकरेज फर्म जेफरीजने एशियन पेंट्सच्या शेअर्सवर अंडरपरफॉर्म रेटिंग कायम ठेवले आहे. पेंट कंपनीच्या समभागांसाठी जेफरीजची टार्गेट प्राइस २१०० रुपये आहे. म्हणजेच एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये शुक्रवारच्या बंद पातळीपेक्षा २५ टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळू शकते. जेपी मॉर्गनने एशियन पेंट्सचे रेटिंग कमी केले आहे. यापूर्वी ब्रोकरेज हाऊसने कंपनीच्या समभागांना न्यूट्रल रेटिंग दिले होते. जेपी मॉर्गनने एशियन पेंट्सच्या शेअर्सच्या किमतीचे लक्ष्य २८०० रुपयांवरून २४०० रुपयांवर आणले आहे. सीएनबीसी-टीव्ही १८ ने दिलेल्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे.
हाऊस सीएलएसएने एशियन पेंट्सवर अंडरपरफॉर्म रेटिंग कायम ठेवले आहे. ब्रोकरेज हाऊसने कंपनीच्या शेअर्ससाठी २२९० रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. मॉर्गन स्टॅनलीनेही एशियन पेंट्सला अंडरवेट रेटिंग दिले आहे. तसेच कंपनीच्या शेअर्ससाठी २५२२ रुपयांचे टार्गेट प्राइस देण्यात आले आहे. परदेशी ब्रोकरेज हाऊस नोमुराने एशियन पेंट्सवर न्यूट्रल रेटिंग कायम ठेवले असून पेंट कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस २५०० रुपये आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत एशियन पेंट्सच्या एकत्रित निव्वळ नफ्यात ४२.४ टक्क्यांची घट झाली आहे. सप्टेंबर २०२४ च्या तिमाहीत एशियन पेंट्सचा एकत्रित निव्वळ नफा ६९४.६४ कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १,२०५.४२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तर तिमाही महसूल ५.३ टक्क्यांनी घसरून ८००३.०२ कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत ८४५१.९३ कोटी रुपये होता.