Apple Removed This Phone From Website: अॅपलने आपली आयफोन १६ सीरिज लॉन्च केली आहे. या सीरिजमध्ये आयफोन १६, आयफोन १६ प्लस, आयफोन १६ प्रो आणि आयफोन १६ प्रो मॅक्स अशी चार मॉडेल्सचा समावेश आहे. नवे फोन लॉन्च करताना अॅपलने आपले काही जुने आयफोन वेबसाइटवरून काढून टाकले आहेत. वेबसाइटवरून काढून टाकण्यात आलेल्या आयफोनच्या यादीत आयफोन १५ प्रो, आयफोन १५ प्रो मॅक्स आणि आयफोन १३ चा समावेश आहे. हे फोन आता कंपनीच्या वेबसाईटवरून खरेदी करता येणार नाही.
महत्त्वाचे म्हणजे, इच्छुक ग्राहक ऑनलाइन प्लॅटफॉर्म, रिटेल स्टोअर आणि अधिकृत अॅपल किरकोळ विक्रेत्यांकडून हे फोन खरेदी करू शकता. स्टॉक संपल्यानंतर तुम्ही येथूनही अॅपलचे हे डिव्हाइस खरेदी करू शकणार नाही. आयफोन १५ प्रो आणि १५ प्रो मॅक्समध्ये कंपनी अॅपल एआय फीचरदेखील देते. सगळीकडे स्टॉक संपल्यानंतर तुमच्याकडे अॅपल एआय फीचरसाठी फक्त आयफोन १६ सीरिजचा पर्याय असेल.
आयफोन १५ प्रोमध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आणि प्रो मॅक्समध्ये ६.७ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले मिळत आहे. हा फोन ए १७ प्रो प्रोसेसरवर काम करतो. फोटोग्राफीसाठी त्यांच्याकडे एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा मेन सेन्सरसह १२ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आहेत. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये सानुकूलित अॅक्शन बटण देखील देण्यात आले आहे.
आयफोन १३ बद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे आहेत. यामध्ये १२ मेगापिक्सेलच्या दोन कॅमेऱ्यांचा समावेश आहे. तर सेल्फीसाठी आयफोन १३ मध्ये तुम्हाला १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. हा फोन ए१५ बायोनिक चिपसेटवर काम करतो.
आयफोन १६: व्हॅनिला आयफोन १६ (१२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी) तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. आयफोन १६ ची सुरुवातीची किंमत ७९ हजार ९०० रुपये आहे.
आयफोन १६ प्लस: भारतात आयफोन १६ प्लस १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी अशा तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल, ज्याची सुरुवाती किंमत ८९ हजार ९०० रुपये असेल.
आयफोन १६ प्रो: आयफोन १६ प्रो मॉडेल १२८ जीबी, २५६ जीबी, ५१२ जीबी आणि १ टीबी अशा चार स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. या मॉडेल्सची किंमत अनुक्रमे १ लाख १९ हजार ९०० रुपये, १ लाख २९ हजार ९०० रुपये, १ लाख ४९ हजार ९०० रुपये आणि १ लाख ६९ हजार ९०० रुपये इतकी आहे.
आयफोन १६ प्रो मॅक्स: आयफोन १६ प्रो मॅक्स हे २५६ जीबी, ५१२ जीबी आणि १ टीबी या तीन स्टोरेज व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आले. या मॉडेलची किंमत अनुक्रमे १ लाख ४४ हजार ९००, १ लाख ६४ हजार ९०० आणि १ लाख ८४ हजार ९०० रुपये इतकी आहे.