Share Market News : कंडक्टर, केबल्स, स्पेशालिटी ऑईल, पॉलिमर आणि ल्युब्रिकेंट्सची उत्पादक आणि पुरवठादार असलेल्या अपार इंडस्ट्रीजचे शेअर्स आज तब्बल २० टक्क्यांनी कोसळले. आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालाचा हा परिणाम आहे. डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात वाढ झाली असली तरी कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे.
अपार इंडस्ट्रीजचा एकत्रित नफा तिसऱ्या तिमाहीत १९.७ टक्क्यांनी घसरून १७५ कोटी रुपयांवर आला आहे. व्याज, अवमूल्यन, कर आणि अमोर्टायझेशन (EBITDA) पूर्वीचे उत्पन्न वार्षिक ७.१ टक्क्यांनी घटून ४०१ कोटी रुपयांवर आलं आहे.
आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचा महसूल १७.७ टक्क्यांनी वाढून ४,७१६ कोटी रुपयांवर पोहोचला असून, देशांतर्गत व्यवसायात ३१.८ टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत निर्यात विभागाचं एकूण महसुलातील योगदान घटून ३३.५ टक्क्यांवर आलं आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते ४०.७ टक्के होतं. मात्र, निर्यात व्यवसायात येणारे अडथळे हळूहळू कमी होतील, अशी अपेक्षा कंपनीनं व्यक्त केली आहे.
कंडक्टर सेगमेंटच्या महसुलात तिसऱ्या तिमाहीत २३.४ टक्के वाढ झाली असून, वॉल्यूममध्ये वार्षिक १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीचे ऑर्डर बुक ७,६०१ कोटी रुपयांवर स्थिर राहिले.
केबल सोल्युशन्स सेगमेंटमध्येही वार्षिक ३७ टक्के वाढ झाली असून देशांतर्गत महसुलात ३०.४ टक्के वाढ झाली आहे. मात्र, स्पेशालिटी ऑईल सेगमेंटच्या महसुलात ०.६ टक्क्यांची घट झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत या सेगमेंटची उलाढाल वार्षिक ४.८ टक्क्यांनी वाढली आहे.
अपार इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कुशल एन. देसाई यांनी निकालावर भाष्य केलं. 'आम्ही आणखी एका तिमाहीत मजबूत महसूल वाढ साधली आहे. नाविन्यपूर्णतेची कास आणि ग्राहककेंद्री दृष्टिकोन ठेवून आम्ही आमच्या प्रीमियम व्यवसायांमध्ये आघाडीवर आहोत. पायाभूत सुविधांच्या भांडवली खर्चाच्या जोरावर देशांतर्गत विकासाचा वेग कायम राहील, अशी आम्हाला आशावादी आहोत. निर्यात व्यवसायासाठी येणाऱ्या अडचणी हळूहळू कमी होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मार्जिनच्या आघाडीवर चीनकडून प्रतिकूल स्पर्धात्मक किंमती आणि निर्यातीतून कमी मागणी यामुळं या तिमाहीत घसरण झाली आहे. निर्यातीची मागणी सुधारेल, अशी आम्हाला आशा आहे. मालवाहतुकीचा खर्च कमी होऊ लागला आहे, त्याचाही फायदा होईल. तथापि, ऊर्जा व पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील व्यवसायाच्या जोरावर आमच्या भागधारकांना दीर्घकालीन फायदा होईल, विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.
आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालानंतर अपार इंडस्ट्रीजच्या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाली. बीएसईवर हा शेअर २० टक्क्यांपेक्षा अधिक घसरून १७१७१ पर्यंत खाली गेला. मागील एका वर्षात कंपनीनं गुंतवणूकदारांना २५ टक्के परतावा दिला आहे. तर, गेल्या पाच वर्षांत हा शेअर १७५९ टक्के वाढला आहे. मात्र मागील सहा महिन्यांपासून शेअर गुंतवणूकदारांना झटका देत १७ टक्क्यांची घसरण नोंदवली आहे.
संबंधित बातम्या