अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर विरोधात कारवाईच्या एसईसीआयच्या हालचाली, शेअरमध्ये घसरण
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर विरोधात कारवाईच्या एसईसीआयच्या हालचाली, शेअरमध्ये घसरण

अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवर विरोधात कारवाईच्या एसईसीआयच्या हालचाली, शेअरमध्ये घसरण

HT Marathi Desk HT Marathi
Nov 14, 2024 06:36 PM IST

Reliance Power Share Price : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरला एसईसीआयनं पुन्हा नोटीस बजावून फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे. त्याचा फटका शेअरला बसला आहे.

रिलायन्स पॉवर, अनिल अंबानी
रिलायन्स पॉवर, अनिल अंबानी

Reliance Power Share Price : अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (SECI) रिलायन्स पॉवरला नोटीस बजावली आहे. तुमच्यावर फौजदारी कारवाई का करू नये, असा सवाल एसईसीआयनं केला आहे. त्याचा फटका रिलायन्स पॉवरच्या शेअरला बसला आहे.

रिलायन्स पॉवरच्या उपकंपनीने स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांच्या निविदेत परदेशी बँक गॅरंटीसह बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप झाल्यानंतर ही नोटीस जारी करण्यात आली आहे. दरम्यान, रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये घसरण सुरूच आहे. गुरुवारी हा शेअर २ टक्क्यांहून अधिक घसरून ३५ रुपयांवर आला. व्यवहाराअंती शेअरचा भाव १.५३ टक्क्यांनी घसरून ३६ रुपयांवर आला.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, एसईसीआयच्या नोटीसमध्ये वारंवार खोटी कागदपत्रे सादर करून निविदा प्रक्रिया कमकुवत करण्याचा आणि अवाजवी लाभ मिळवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, रिलायन्स पॉवरने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

रिलायन्स पॉवर आणि त्याची उपकंपनी रिलायन्स एनयू बीईएसएस लिमिटेड यांना बनावट कागदपत्रांमुळे एसईसीआयच्या निविदेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही स्थगिती तीन वर्षांसाठी आहे. एसईसीआयने घेतलेल्या स्पर्धात्मक निविदेअंतर्गत १,००० मेगावॅट/१,००० मेगावॅटच्या स्पर्धात्मक बोलीशी संबंधित हे प्रकरण आहे. ई-रिव्हर्स लिलावामुळे एसईसीआयला निविदा प्रक्रिया रद्द करावी लागल्यानंतर ही तफावत आढळून आली. 

कंपनीची तिमाही आर्थिक कामगिरी कशी?

रिलायन्स पॉवरला चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत २८७८.१५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला २३७.७६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न १९६२.७७ कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ते २११६.३७ कोटी रुपये होतं.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner