हिंदुजा समूहातील इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (आयआयएचएल) या कंपनीने कर्ज निवारण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुधवारी रिलायन्स कॅपिटलचा ताबा घेतला. आयआयएचएलने कर्ज निवारण प्रक्रियेअंतर्गत सावकारांना मंजूर केलेली रक्कम भरून कर्जबाजारी कंपनी चे अधिग्रहण केले आहे.
सूत्रांनी सांगितले की, आयआयएचएलने रिलायन्स कॅपिटल (आरकॅप) आणि त्याच्या उपकंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांचा ताबा घेतला आहे आणि नवीन संचालक मंडळाच्या सदस्यांची पहिली बैठक बुधवारी संपली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेने मंजूर केलेल्या नव्या संचालक मंडळात मोझेस हार्डिंग जॉन आणि अरुण तिवारी यांचा समावेश आहे.
या अधिग्रहणामुळे आयआयएचएलने आरकॅपशी संबंधित सुमारे ४० युनिट्सवर नियंत्रण प्रस्थापित केले आहे. यामध्ये रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स, रिलायन्स जनरल इन्शुरन्स, रिलायन्स सिक्युरिटीज आणि रिलायन्स अॅसेट रिकन्स्ट्रक्शन सारख्या प्रमुख उपकंपन्यांचा समावेश आहे. आयआयएचएल एप्रिल 2023 मध्ये कॉर्पोरेट दिवाळखोरी निवारण प्रक्रियेअंतर्गत 9,650 कोटी रुपयांच्या बोलीसह यशस्वी समाधान अर्जदार म्हणून उदयास आला होता.
आयआयएचएलचे चेअरमन अशोक हिंदुजा यांनी सांगितले की, या अधिग्रहणामुळे आम्ही बँकिंगबरोबरच विमा व्यवसायातही प्रवेश करत आहोत. विमा कंपन्यांच्या लिस्टिंगबाबत विचारले असता ते म्हणाले की, मूल्यनिर्मितीच्या दोन वर्षांनंतर हे होऊ शकते. आरकॅपच्या अधिग्रहणामुळे आयआयएचएलचे मूल्य २०३० पर्यंत ५० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे, असा विश्वास हिंदुजा यांनी व्यक्त केला. या वर्षाच्या सुरुवातीला आयआयएचएलला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (आयआरडीएआय) आणि संबंधित स्टॉक अँड कमॉडिटी एक्स्चेंजकडून सर्व आवश्यक मंजुरी मिळाल्या होत्या.
अनिल अंबानी यांच्या अनिल धीरूभाई अंबानी समूहाचा भाग असलेल्या आरकॅपच्या संचालक मंडळाला भारतीय रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २०२१ मध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील त्रुटी आणि पेमेंट डिफॉल्टसाठी निलंबित केले होते. मध्यवर्ती बँकेने नागेश्वर राव वाय यांची कंपनीचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.
संबंधित बातम्या