anant ambani radhika merchant wedding : देशातील प्रमुख उद्योगपती व रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी हे अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. राधिका मर्चंट या उद्योजक घराण्यातील मुलीशी त्यांनी लग्नगाठ बांधली. हे लग्न आणि प्री-वेडिंग सोहळा जवळपास वर्षभर चर्चेत आहे. साहजिकच या लग्नावर केलेल्या खर्चाचीही जोरदार चर्चा आहे.
सर्वसामान्य लोक या खर्चाचा अंदाज लावत असतानच 'रेडिट'वरील एक पोस्टमधून एक आकडा समोर आला आहे. त्यानुसार, अनंत-राधिकाच्या लग्नावर अंबानी यांनी ५ हजार कोटी रुपये खर्च केल्याचं समोर आलं आहे. ही रक्कम मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीच्या ०.५ टक्के आहे, असंही बोललं जात आहे. असं असलं तरी सर्वसामान्य नेटकऱ्यांसाठी हा चर्चेचा आणि स्वप्न रंगवण्याचा विषय ठरला आहे.
अंबानींच्या मुलाच्या लग्नात सुमारे एक ते दोन हजार कोटी रुपये खर्च होतील, असं आम्हाला वाटलं होतं. पण ५ हजार कोटी हा आकडा थक्क करायला लावणारा आहे, असा टोला या युजरनं हाणला आहे. तर, 'कुटुंबातील पाच पिढ्यांना सुखी ठेवण्यासाठी एवढी रक्कम पुरेशी असल्याचं दुसऱ्या एकानं म्हटलं आहे.
'मी नुकताच एक लेख वाचला. त्यात म्हटलं होतं अंबानी कुटुंबानं दररोज ३ कोटी रुपये खर्च केले तरी त्यांची संपत्ती ९६२ वर्षे पुरेल,' अशी कमेंट एका युजरने केली आहे. त्यावर, "आम्हाला ३ कोटी द्या, पुढच्या पिढ्यांच्या संपत्तीचा पाया तरी पक्का होईल, असं एका युजरनं म्हटलं आहे. तर, ‘गरीबांना १ कोटी दान योजना’ सुरू केली जावी अशी मिश्किल टिप्पणी दुसऱ्या एका युजरनं केली आहे.
एका इंटरनेट युजरनं ५००० हजार कोटींच्या खर्चाच्या आकड्यावर अविश्वास व्यक्त केला आहे. ५००० हजार कोटी म्हणजे ६०० अमेरिकी डॉलर्स होतात. इतक्या मोठ्या रकमेत अमेरिकेत १० ऑस्कर सोहळे आयोजित होऊ शकतात. इटलीतील क्रूझ पार्टीसाठी एक हजार कोटी रुपयांपेक्षा कमी खर्च येतो. तसंच, एवढ्या पैशात तिथं १० फंक्शनही होऊ शकतात. त्यामुळं पाच हजार कोटींचा विवाह सोहळा हे खरं वाटत नाही, असं त्यानं म्हटलंय. जामनगर प्री-वेडिंग इव्हेंट हा अंबानी कुटुंबाचा वैयक्तिक कार्यक्रम नव्हता. रिलायन्स आणि इतर भागधारकांनी केलेली गुंतवणूक होती. त्यात वैयक्तिक खर्च फारच मर्यादित होता, असंही या युजरनं म्हटलं आहे.
'मोबदल्यात काहीही न मिळवता एवढा पैसा खर्च करण्याइतके उद्योगपती मूर्ख नसतात. हे सगळं त्यांच्या औद्योगिक साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी केलेली गुंतवणूक आणि प्रमोशन असतं, असंही या युजरनं पुढं म्हटलं आहे.
आउटलुकच्या एका अहवालानुसार ४ ते ५ हजार कोटी रुपये हा खर्च सर्वसामान्यांना खूप वाटत असला तरी अंबानी कुटुंब आपल्या मुलांच्या लग्नासाठी सामान्य भारतीय कुटुंबाच्या तुलनेत कमीच खर्च करतंय. कोणतंही भारतीय कुटुंब त्यांच्या एकूण संपत्तीच्या सुमारे ५ ते १५ खर्च करतं, तर अनंत अंबानी-राधिका मर्चंट विवाह अंबानी कुटुंबाच्या निव्वळ संपत्तीच्या केवळ ०.५ टक्के होता.
संबंधित बातम्या