Multibagger Stock : रिअल इस्टेट क्षेत्रातील अनंत राज लिमिटेड या शेअरच्या किंमतीत शुक्रवारी ४ टक्क्यांची वाढ झाली. कंपनीच्या समभागांच्या कामगिरीबाबत तज्ज्ञ उत्साही आहेत. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या मते कंपनीच्या शेअरची किंमत सध्याच्या किमतीपेक्षा ३० टक्क्यांनी वाढू शकते. ब्रोकरेज हाऊसनं अनंत राज लिमिटेडला 'बाय' टॅग दिला आहे.
शुक्रवारी बीएसईवर कंपनीचा शेअर ८५२.७० रुपयांवर खुला झाला. कंपनीचा शेअर ८७४.३० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. बाजार बंद होताना कंपनीच्या शेअरची किंमत जवळपास १ टक्क्यांनी वाढून ८४५.८० रुपयांवर होती.
अनंत राज लिमिटेडच्या शेअरवर बारकाईनं लक्ष ठेवून असलेल्या ब्रोकरेज हाऊसनं ११०० रुपयांचं टार्गेट प्राइस लक्षात घेऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीमध्ये सध्या बरेच सकारात्मक बदल होत आहेत. रिअल इस्टेट तसेच डेटा सेंटर आणि क्लाऊड सर्व्हिसेस व्यवसायात ही कंपनी शिरकाव करत आहे. कंपनीचा रिअल इस्टेट व्यवसायही चांगली कामगिरी करत आहे. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत १४ दशलक्ष चौरस फुटांचे वितरण अपेक्षित आहे, असं ब्रोकरेज हाऊसनं आपल्या नोट्समध्ये लिहिलं आहे.
अनंत राज कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात वाऱ्याच्या वेगानं वाढ झाली आहे. या काळात कंपनीच्या शेअरची किंमत १९१ टक्क्यांनी वाढली आहे. तर अवघ्या ६ महिन्यांत हा शेअर ९२ टक्के परतावा देण्यात यशस्वी ठरला आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८७४.३० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर २८१.१५ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप २८,९१७.१२ कोटी रुपये आहे.
गेल्या ५ वर्षात अनंत राज यांच्या शेअर्समध्ये ५०९५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर सेन्सेक्सनं या काळात केवळ ८७ टक्के परतावा देता आला आहे.