Amazon news : जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या Amazon ने आता आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन धोरण जारी केलं आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याऐवजी आता ऑफिसमध्ये येऊन काम करण्यास सांगितले आहे. पुढील वर्षापासून ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान पाच दिवस कार्यालयातून काम करावे लागणार असल्याचे गार्डियनने आपल्या वृत्तात म्हटले आहे. कंपनी हे नवे धोरण २ जानेवारी २०२५ पासून लागू करणार आहे.
कंपनीचे सीईओ अँडी जेसी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पात्रात म्हटले आहे की, त्यांना आता कार्यालयात येऊन काम करावे लागणार आहे. अँडीने लिहिले की, “आम्ही कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना आता घरून काम करण्याची मुभा मिळणार नाही. त्यांना आता आठवड्यातून पाच दिवस ऑफिसमध्ये येऊन काम करावे लागणार आहे. कोरोना काळात आम्ही कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून वर्क फ्रॉम होम सेवा सुरू केली होती. मात्र, आता कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येऊन काम करावे लागणार आहे. गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला तर कार्यालयात एकमेकांसोबत काम करण्याचे अनेक फायदे असल्याचे देखील त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने यापूर्वी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात येऊन काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, काही कारणांनी यातून सूट देण्याची मागणी काही कर्मचाऱ्यांनी केली होती. मात्र, हा पर्याय वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला गेला नव्हता. आता हे धोरण सर्व कर्मचाऱ्यांसाठी बदलण्यात येत आहे. त्यांना २ जानेवारीपासून कार्यालयात यावे लागणार आहे.
सुमारे चार वर्षांपूर्वी, कोविड लॉकडाऊनमुळे, ॲमेझॉनने इतर कंपन्यांप्रमाणेच आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितले होते. मात्र, तेव्हापासून कर्मचाऱ्यांना किती दिवस कार्यालयातून काम करावे लागणार, याबाबत अनेकदा चर्चा झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात, कंपनीने कार्यालयात परत येऊन काम करण्याचे आदेश जारी केले होते. आणि त्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात येण्यास सांगितले होते.
ॲमेझॉन व्यतिरिक्त, अनेक कंपन्यांनी घरातून काम पूर्णपणे बंद केले आहे आणि इतर कंपन्या देखील लवकरच या दिशेने पावले उचलू शकतात.