amazon india manesar news : जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन एका वेगळ्याच वादात अडकली आहे. ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना टॉयलेट ब्रेकही देत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हरियाणातील मानेसर येथील अॅमेझॉन इंडियाच्या गोदामात हा प्रकार समोर आला आहे. याची दखल घेत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं केंद्र सरकारला नोटीस बजावली असून आठवडाभरात उत्तर मागितलं आहे. हे बाब खरी असल्यास ते कामगार कायद्यांचं उल्लंघन आहे, असं निरीक्षण आयोगानं नोंदवलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियानं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. दिलेलं टार्गेट पूर्ण होत नाही तोपर्यंत टॉयलेट ब्रेक किंवा वॉटर ब्रेक घेणार नाहीत, अशी शपथच एका कर्मचाऱ्याला देण्यात आल्याचं खुद्द कामगारांनीच सांगितलं. एका २४ वर्षीय कामगाराला २४ फूट लांबीच्या सहा ट्रकमधून सर्व पॅकेजेस उतरवण्याचं काम दिलं होतं. ते होईपर्यंत टॉयलेटला जाणार नाही किंवा पाण्याचा ब्रेक घेणार नाही, असं सांगण्यात आलं.
मानेसर इथल्या गोदामाच्या 'इनबाउंड टीम'नं गेल्या महिन्यात आठ वेळा शपथ घेतल्याचं वृत्त एका टीव्ही चॅनेलनं दाखवलं होतं. कर्मचाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला आहे. गोदामातून बाहेर पडणारा माल हाताळणाऱ्या 'आऊटबाउंड टीम'ला दररोज आपल्या टार्गेटची आठवण करून देण्यात आल्याचं अहवालात म्हटलं आहे. कामाच्या ठिकाणी शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही, असं मानेसर गोदामातील एका महिला कर्मचाऱ्यानं सांगितलं.
अहवालानुसार, मानेसर आणि आसपासच्या कामगार संघटनांनी या परिसरातील पाच गोदामांवर १९४८ च्या कारखाना कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. आठवड्यातील पाच दिवस १० तास काम करणारा कर्मचारी दिवसाला चार ट्रकपेक्षा जास्त माल उतरवू शकत नाही. तेही ३० मिनिटांचं दुपारचं जेवण आणि चहाच्या ब्रेक न घेता काम केल तर हे हे काम होऊ शकतं. असं असताना सहा ट्रक खाली करण्याचं टार्गेट दिलं जातं. एका महिलेनं सांगितल्यानुसार तिला दररोज ९ तास उभं राहून काम करावं लागतं.
अॅमेझॉन इंडियाच्या प्रवक्त्यानं या संदर्भात कंपनीची बाजू मांडली आहे. 'कंपनीचे कर्मचारी आणि सहकाऱ्यांची सुरक्षा आणि हिताला आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांच्या बाबतीत आमची कंपनी आघाडीवर आहे. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या व त्यांना सहज काम करता यावं या दृष्टीनं कंपनीतील सोयीसुविधांची रचना करण्यात आली आहे. सर्व कर्मचारी त्यांच्या कामाच्या वेळेत अनौपचारिक विश्रांती घेण्यास मोकळे आहेत. ते शौचालयाचा वापर करू शकतील, पाणी पिऊ शकतात, तसंच मॅनेजर किंवा एचआरशीही बोलू शकतात, असा खुलासा कंपनीनं केला आहे.
संबंधित बातम्या