Stock Market Updates : गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल १८ हजार टक्क्यांचा परतावा देणाऱ्या अल्गोक्वांट फिनटेक लिमिटेडनं आता आणखी एक खूषखबर दिली आहे. कंपनीनं पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २८ डिसेंबर २०२४ ही रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आली आहे.
अल्गोक्वांटनं १:२ या प्रमाणात बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, पात्र गुंतवणूकदारांना २ रुपये अंकित मूल्य असलेल्या २ शेअर्सवर एक शेअर बोनस दिला जाईल. यासाठी कंपनीनं २८ डिसेंबर २०२४ ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. शेअर बाजारात कंपनी ८ जानेवारी २०२५ रोजी एक्स-बोनस स्टॉक म्हणून व्यवहार करणार आहे.
अल्गोक्वांट फिनटेक लिमिटेडच्या शेअर्सचं विभाजन करण्यात आलं आहे. २०२१ मध्ये कंपनीच्या शेअरचं विभाजन झालं होतं. त्यावेळी कंपनीचे शेअर्स ५ भागांमध्ये विभागले गेले. त्यानंतर १० रुपये अंकित मूल्य असलेल्या शेअरची अंकित किंमत २ रुपये प्रति शेअर झाली. कंपनीनं अद्याप गुंतवणूकदारांना लाभांश दिलेला नाही.
शुक्रवारी कंपनीचा शेअर १.५७ टक्क्यांनी वधारून १३६४.३० रुपयांवर होता. गेल्या ६ महिन्यांत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, १ वर्षापासून कंपनीचे शेअर्स ठेवून घेणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये आतापर्यंत २४ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १६१९.८० रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ९७२.१० रुपये प्रति शेअर आहे. कंपनीचं मार्केट कॅप १९८९ कोटी रुपये आहे.
गेल्या तीन वर्षांत शेअरच्या किंमतीत १९४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, ज्या गुंतवणूकदारांनी ५ वर्षे शेअर्समध्ये गुंतवणूक करून शेअर्स होल्ड करून ठेवले आहेत, त्यांना आतापर्यंत १८ हजार टक्क्यांपेक्षा जास्त नफा झाला आहे.
संबंधित बातम्या