Ajax Engineering limited IPO : २०२४ मध्ये शेअर बाजारात आयपीओंची लाटच आली आहे. याच लाटेवर स्वार होत आता ३२ वर्षांची जुनी बेंगळुरू स्थित अजाक्स इंजिनीअरिंग लिमिटेड ही कंपनी आयपीओ आणण्याच्या विचारात आहे. त्यासाठी कंपनीनं भांडवली बाजार नियामक सेबीकडे (SEBI) या संदर्भातील मसुदा (DRHP) दाखल केला आहे.
या मसुद्यानुसार, कंपनी आयपीओच्या माध्यमातून ऑफर फॉर सेल अंतर्गत २,२८,८१,७१८ इक्विटी शेअर्स (२.२८ कोटी इक्विटी शेअर्स) विक्रीसाठी काढणार आहे. या ऑफर फॉर सेलमध्ये केदारा कॅपिटलच्या ७४,३६,८०० इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.
कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, कृष्णास्वामी विजय आणि कल्याणी विजय २८,६०,१७० इक्विटी शेअर्सची विक्री करतील. जेकब जितेन जॉन हे २२,८८,१३६ इक्विटी शेअर्स, जेकब हॅन्सन फॅमिली ट्रस्ट ६०,०६,३५७ इक्विटी शेअर्स आणि सुसी जॉन हे १४,३०,०८५ इक्विटी शेअर्स विकणार आहेत.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, सिटी ग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जेएम फायनान्शियल लिमिटेड, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड या कंपन्यांनी या इश्यूचे लीड मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत. अजाक्सचे शेअर बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
१९९२ मध्ये स्थापन झालेल्या अजाक्स इंजिनीअरिंग या कंपनीचा पोर्टफोलिओ मोठा आहे. यामध्ये सेल्फ लोडिंग काँक्रीट मिक्सर आणि काँक्रीटच्या उत्पादनासाठी बॅचिंग प्लांट, काँक्रीटच्या वाहतुकीसाठी ट्रान्झिट मिक्सर, बूम पंप, काँक्रीट पंप आणि बरेच काही समाविष्ट आहे. काँक्रीट टाकण्यासाठी काँक्रीट, स्लिप-फॉर्म पेव्हर आणि काँक्रीट जमा करण्यासाठी थ्रीडी काँक्रीट प्रिंटर लावण्यासाठी स्वयंचलित बूम पंपही या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत.
३१ मार्च २०२४ पर्यंत अजाक्सच्या डीलर नेटवर्कमध्ये भारतभरातील २३ राज्यांमध्ये ५१ डीलरशिप्सचा समावेश होता. तसंच, दक्षिण आणि आग्नेय आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिकेतील २५ डीलर्स आणि वितरकांसह कंपनीनं जागतिक बाजारपेठेतही जम बसवला आहे. अजाक्स इंजिनीअरिंग कर्नाटकातील ओबाडेनाहळ्ळी, गौरीबिदनूर आणि बाशेट्टीहळ्ळी इथं चार असेम्ब्लिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवते.