मराठी बातम्या  /  बिझनेस  /  भारतातील ‘या’ विमान कंपनीकडे पगार द्यायलाही पैसे नाही; १४०० कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढणार

भारतातील ‘या’ विमान कंपनीकडे पगार द्यायलाही पैसे नाही; १४०० कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढणार

Feb 12, 2024 03:05 PM IST

SpiceJet to cut job - स्पाइस जेट ही विमान कंपनी सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत सापडली असून तब्बल १४०० कामगारांना नोकरीवरून काढणार आहे.

Spicejet Plans Layoffs to Align Costs with Operational Needs
Spicejet Plans Layoffs to Align Costs with Operational Needs (Reuters)

'स्पाइस जेट’ ही विमान कंपनी सध्या प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करतेय. (Spicejet to cut job) तोट्यात चाललेल्या स्पाइसजेट कंपनीला खर्च भागवण्यासाठी निधीची मोठी गरज निर्माण झाली असून खर्च कमी करून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाय योजले जात आहे. याचाच भाग म्हणून स्पाइसजेटमधील एकूण कर्मचारीसंख्येच्या १५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यामुळे १४०० कामगारांना नोकरीवरून काढले जाणार असल्याचे वृत्त 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्पाइसजेट कंपनीत गेले अनेक महिने कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीए. अनेक कर्मचाऱ्यांचे जानेवारी महिन्याचे पगार अद्याप झाले नसल्याचे वृत्त आहे. कर्मचाऱ्यांचे एकूण ६० कोटी रुपयांचे पगार थकीत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, कर्मचारी कपातीबाबतच्या वृत्ताबाबत स्पाइसजेट विमान कंपनीच्या प्रवक्त्याने अधिकृत स्पष्टीकरण जारी केले आहे. ‘खर्चकपात करण्यासाठी कंपनीकडून विविध उपाय योजले जात आहेत. या उपायांद्वारे १०० कोटी रुपयांची बचत केली जाणार आहे' असं स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.

स्पाइसजेटमध्ये २२०० कोटीची गुंतवणूक होणार

स्पाइसजेट विमान कंपनीत २२०० कोटी रुपयांची नव्याने गुंतवणूक होणार असून याची लवकरच घोषणा केली जाईल, असं कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं. याबाबत नुकतीच गुंतवणूकदारांसोबत बैठक पार पडली आहे. खर्चकपात हा एक धोरणाचा भाग आहे. कंपनीने आर्थिक विकास साध्य करणे तसेच भारतीय हवाई वाहतूक उद्योगातील संधींचे भांडवल करण्याच्या उद्देशाने मनुष्यबळाची फेररचना करण्याची उपाययोजना केली आहे, असंही प्रवक्त्याने सांगितलं. 

स्पाइसजेट कंपनीत सध्या नऊ हजार कर्मचारी कार्यरत असून कंपनीच्या ताफ्यात एकूण ३० विमाने आहेत. यापैकी आठ विमाने (क्रू आणि पायलटसह) आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांकडून भाड्याने घेतलेली आहेत. २०१९ मध्ये स्पाइसजेटच्या ताफ्यात एकूण ११८ विमाने आणि १६ हजार कर्मचारी कार्यरत होते. एकूण २३ विमाने आणि ३५०० कर्मचारी असलेली आकासा एअर (Akasa Air) ही स्पाइसजेटची सर्वात जवळची प्रतिस्पर्धी विमान कंपनी आहे.

स्पाइसजेट कंपनीचे माजी प्रवर्तक असलेले कलानिधी मारन आणि त्यांच्या केएएल एअरवेज यांना २०१८च्या लवादाच्या निर्णयाचा भाग म्हणून ६ आठवड्यांच्या आत ५० कोटी रुपये देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिले होते. तसेच रेमॅक टेक्नॉलॉजीजने नोव्हेंबरमध्ये स्पाइसजेटविरोधात दिवाळखोरीची याचिका दाखल केली होती. या कंपनीने स्पाइसजेटला बिझनेस कन्सल्टिंग आणि टेक्निकल सेवा पुरवल्याचा दावा केला होता. दरम्यान, हा वाद मिटवण्याचा कंपनी प्रयत्न करत असल्याचे ८ फेब्रुवारी रोजी स्पाइसजेट एअरलाइन्सने नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलला कळवले होते. हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर एअरलाइन्सच्या शेअरची किंमत घसरली होती. 

WhatsApp channel