Air India Black Friday sale : तुम्ही कधी विमानात बसला नसाल आणि विमान प्रवासाची तीव्र इच्छा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची कंपनी एअर इंडियानं प्रवाशांना स्वस्तात विमान प्रवासाची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी एअर इंडियानं ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली आहे.
ब्लॅक फ्रायडे सेलअंतर्गत देशांतर्गत उड्डाणांसाठी सध्याच्या मूळ भाड्यावर २० टक्क्यांपर्यंत आणि अमेरिका, युरोप (यूकेसह), ऑस्ट्रेलिया, दक्षिण पश्चिम आशिया आणि दक्षिण आशिया सारख्या आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांसाठी १२ टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. एअरलाइन्स कंपनीची ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे.
एअर इंडियानं ९६ तासांचा ब्लॅक फ्रायडे सेल सुरू केला आहे. स्पेशल सेलअंतर्गत पुढील वर्षी ३० जून २०२५ पर्यंतच्या प्रवासासाठी बुकिंग २९ नोव्हेंबर रोजी रात्री १२.०१ ते २ डिसेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहील. भारत, ऑस्ट्रेलिया आणि उत्तर अमेरिकेसाठी ही ऑफर ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत वैध आहे.
एअर इंडियाच्या वेबसाईट आणि मोबाईल अॅपवर प्रवासी तिकीट बुक करू शकतात. आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही वर एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल अॅपच्या माध्यमातून हा स्पेशल सेल उपलब्ध असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. ऑफरमधील जागा मर्यादित आहेत आणि काही ब्लॅकआऊट तारखांसह (या दिवशी सवलत बंद असेल) 'प्रथम या, प्रथम मिळवा' या तत्त्वावर विक्री केली जाईल.
ही सवलत देणारी एअर इंडिया ब्लॅक फ्रायडे सेलदरम्यान खास पेमेंट बेस्ड डिस्काउंट देत आहे. यूपीआय पेमेंटसाठी प्रोमो कोड यूपीआयप्रोमोचा वापर करून प्रवाशांना देशांतर्गत उड्डाणांमध्ये ४०० रुपये आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये १२०० रुपयांची बचत करता येईल. त्याचप्रमाणे इंटरनेट बँकिंगद्वारे पेमेंट केल्यास प्रोमो कोड एनबीप्रोमो असलेल्या देशांतर्गत उड्डाणांवर ४०० रुपये आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर १२०० रुपयांची अशीच सवलत दिली जाणार आहे. प्रवाशांना आणखी दिलासा म्हणून एअर इंडियानं विक्री कालावधीत आपल्या वेबसाइट किंवा अॅपद्वारे केलेल्या सर्व बुकिंगसाठी सुविधा शुल्क माफ केलं आहे. यामुळं देशांतर्गत उड्डाणांवर ३९९ रुपयांपर्यंत आणि आंतरराष्ट्रीय बुकिंगमध्ये ९९९ रुपयांपर्यंत अतिरिक्त बचत होणार आहे.
एअर इंडियानं विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना वेगळा दिलासा दिला आहे. या ऑफरसोबत विद्यमान सवलतींची सांगड घालून त्यांना अधिक बचत करण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मूळ भाड्यात २५ टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकते.