मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (एमडब्ल्यूसी) २०२४ च्या पार्श्वभूमीवर चिनी तंत्रज्ञान कंपनी ऑनरने रविवारी स्पेनमधील बार्सिलोना येथे आपला नवीन मॅजिक ६ प्रो स्मार्टफोन लाँच केला. ऑनरने एक प्रायोगिक आय-ट्रॅकिंग एआय फंक्शन देखील प्रदर्शित केले, याद्वारे फोनच्या स्क्रीनमध्ये पाहून कार कंट्रोल करता येणार आहे.
बार्सिलोना येथे सोमवारपासून सुरू होणाऱ्या वार्षिक मोबाइल वर्ल्ड काँग्रेस (एमडब्ल्यूसी) पूर्वी टेक आणि टेलिकॉम कंपन्या नवीन उत्पादने आणि फीचर जारी करीत आहेत. स्मार्टफोनच्या निर्मात्यांना आशा आहे की, एआय फीचरमध्ये बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. तर, तज्ञांचे म्हणणे आहे की, जेनेरेटिव्ह एआय फीचरमुळे कायदेशीर किंवा नैतिक चिंता वाढवू शकते.
अॅपल आणि ओप्पो सारख्या कंपन्यांशी स्पर्धा करणारी ऑनर कंपनी जागतिक स्मार्टफोन बाजारात छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे. इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार, २०२३ मध्ये चीनमध्ये अॅपलचा १७.३ टक्के मार्केट शेअर होता. तर, ऑनरचा १७.१ टक्के होता.
या स्मार्टफोनमध्ये ६.८ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनच्या डिस्प्लेचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये नॅनो क्रिस्टल शील्ड कव्हर देण्यात आले. ही नव्या प्रकारची काच आहे जी इतर स्मार्टफोन डिस्प्लेच्या तुलनेत १० पट अधिक मजबूत असल्याचा दावा कंपनीने केला. फोनमध्ये ग्राहकांना ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सल आणि अल्ट्रावाइड लेन्स आणि १८० मेगापिक्सल क्षमतेचा पेरिस्कोप लेन्स देण्यात आला. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला.
ऑनर मॅजिक ६ प्रोची किंमत कंपनीने १ हजार २९९ युरो एवढी निश्चित केली. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत १ लाख १६ हजार ५०० रुपये आहे. अर्थात, हा फोन भारतात कधी लाँच होणार? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
संबंधित बातम्या