IPO news in marathi : २०२४च्या सुरुवातीला आलेली आयपीओची लाट वर्षाअखेर सुरू राहणार असं दिसत आहे. आता अग्रवाल ग्लास इंडियाचा आयपीओ चर्चेत आहे. २८ नोव्हेंबर रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला झालेला हा आयपीओ दोन दिवसांत १०० टक्के सबस्क्राइब झाला आहे. आज अर्ज करण्याची शेवटची संधी आहे.
या एसएमई आयपीओचा आकार ६२.६४ कोटी रुपये आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनी ५८ लाख नवे शेअर्स जारी करणार आहे. हा पूर्णपणे फ्रेश इश्यू असेल. पहिल्या दोन दिवसांत आयपीओला १०० टक्के सब्सक्रिप्शन मिळालं आहे. रिटेल श्रेणीत हा आयपीओ सर्वाधिक १.७९ पट सब्सक्राइब झाला आहे. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदार श्रेणीत ०.४८ टक्के आणि पात्र संस्थात्मक खरेदीदार वर्गात ०.०१ पट सब्सक्राइब झाला आहे.
१० रुपये अंकित मूल्य असलेल्या समभागांचा प्राइस बँड १०५ ते १०८ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. कंपनीनं एकूण १२०० शेअर्सची निर्मिती केली आहे. त्यामुळं गुंतवणूकदारांना १,२९,६०० रुपयांची बाजी लावावी लागणार आहे. हा आयपीओ २७ नोव्हेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांकडून १७.८२ कोटी रुपये उभे केले होते.
कंपनीच्या वतीनं ३ डिसेंबर रोजी शेअर्सचं वाटप करण्यात येणार आहे. तर, एनएसई एसएमईवर कंपनीची प्रस्तावित लिस्टिंग ५ डिसेंबर २०२४ रोजी आहे.
ग्रे मार्केटमध्येही कंपनीची स्थिती चांगली आहे. २ डिसेंबरच्या सकाळी कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये ९ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत होते. इन्व्हेस्टर्स गेनच्या अहवालानुसार, २६ नोव्हेंबरपासून ग्रे मार्केटच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
अग्रवाल ग्लास इंडियाची स्थापना २००९ मध्ये झाली. ही कंपनी टेम्पर्ड ग्लासची निर्मिती करते. रेफ्रिजरेटर ट्रे, मोबाइल स्क्रीन, बुलेट प्रूफ चष्मा आदींमध्ये कंपनीची उत्पादनं वापरली जातात.
संबंधित बातम्या