गाळात गेलेल्या पेटीएमच्या शेअरबाबत बऱ्याच दिवसांनी चांगली बातमी, खरेदी करावा का? एक्सपर्ट्स म्हणतात…-after the deal with zomato a rush to buy paytm shares price crossed rs 600 ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  गाळात गेलेल्या पेटीएमच्या शेअरबाबत बऱ्याच दिवसांनी चांगली बातमी, खरेदी करावा का? एक्सपर्ट्स म्हणतात…

गाळात गेलेल्या पेटीएमच्या शेअरबाबत बऱ्याच दिवसांनी चांगली बातमी, खरेदी करावा का? एक्सपर्ट्स म्हणतात…

Aug 22, 2024 12:26 PM IST

Paytm zomato deal Impact : पेटीएम आणि झोमॅटोमधील एका कराराच्या बातमीनं आज पेटीएमच्या शेअरला बळ दिलं. या शेअरनं बऱ्याच कालावधीनंतर ६०० रुपयांचा टप्पा ओलांडला.

Paytm Zomato deal : गाळात गेलेल्या पेटीएमच्या शेअरबाबत बऱ्याच दिवसांनी चांगली बातमी
Paytm Zomato deal : गाळात गेलेल्या पेटीएमच्या शेअरबाबत बऱ्याच दिवसांनी चांगली बातमी

Paytm share price : ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो आणि फिनटेक फर्म पेटीएमच्या मूव्ही आणि इव्हेंट तिकीट व्यवसायाच्या २४४.२ दशलक्ष डॉलर म्हणजेच २०४८ कोटी रुपयांच्या कराराच्या वृत्तानंतर पेटीएमच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली. आता हा शेअर किंचित घसरला असला तरी सुरुवातीच्या व्यवहारात कंपनीच्या शेअरनं ६०० रुपयांचा टप्पा ओलांडला. 

पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचा शेअर ५८४ रुपयांवर उघडला आणि एनएसईवर काही मिनिटांतच ६०४.७० रुपयांच्या नव्या किंमतीवर पोहोचला. सकाळी ९.३१ वाजता पेटीएमचा शेअर ३.८८ टक्क्यांनी वधारून ५९६.३० रुपयांवर व्यवहार करत होता.

वर्षभरात ३० टक्क्यांची वाढ

मागच्या पाच सत्रात पेटीएमचे शेअर्स १० टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. एका महिन्यात ३१ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर, गेल्या सहा महिन्यांत या शेअरनं ५३ टक्क्यांहून अधिक उसळी घेतली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) केलेल्या बंदीच्या कारवाईमुळं यंदा आतापर्यंत त्यात ८ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. तर, गेल्या वर्षभरात त्यात ३० टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. त्याचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ३१० रुपये आहे.

एक्सपर्ट्सचा सल्ला काय?

लाइव्ह मिंटच्या टेक्निकल ट्रेंडनुसार, हा शेअर शॉर्ट आणि लॉन्ग टर्म अशा दोन्ही कालावधीत तेजीत राहतो. असं असतानाही १४ पैकी ७ विश्लेषक ते विकण्याची शिफारस करीत आहेत. तर, सहा जणांनी होल्ड आणि एकानं जोरदार खरेदीची शिफारस केली आहे.

काय झाला करार?

वन ९७ कम्युनिकेशननं झोमॅटोशी संबंधित कराराची माहिती दिली. पेटीएमचा मूव्ही व इव्हेंटव तिकीट व्यवसाय विकला असला तरी येत्या १२ महिन्यांत पेटीएमच्या अ‍ॅपवर तिकिटे बुक करता येणार आहेत. शेअर खरेदी कराराच्या माध्यमातून हे अधिग्रहण करण्याची झोमॅटोची योजना आहे. या करारानुसार वन९७ कम्युनिकेशन्सची उपकंपनी ओटीपीएल आणि डब्ल्यूईपीएलमधील झोमॅटो ओसीएलचा संपूर्ण हिस्सा विकत घेणार आहे. त्यानंतर, ओटीपीएल आणि व्हीईपीएल दोन्ही झोमॅटोच्या पूर्ण मालकीच्या उपकंपन्या बनतील. याशिवाय झोमॅटो ओटीपीएल आणि डब्ल्यूईपीएलमध्ये प्रिफरेन्शियल अलॉटमेंटच्या माध्यमातून प्राथमिक गुंतवणूक करेल.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ माहितीपर आहे. यातील तज्ज्ञांची मतं व शिफारसी त्यांच्या वैयक्तिक आहेत, हिंदुस्तान टाइम्स मराठीच्या नाहीत. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या सल्लागाराचा सल्ला घ्या.)

विभाग