Budget Impact on Stock Market : केंद्रीय अर्थसंकल्पाचे संमिश्र परिणाम शेअर बाजारातील विविध कंपन्यांच्या स्टॉक्सवर दिसत आहेत. बजेटनंतर काही शेअर कोसळले आहेत तर काही शेअरमध्ये तेजी आली आहे. चप्पल निर्माती कंपनी मेट्रो ब्रँड्सचा शेअर सध्या तेजीच्या लाटेवर स्वार झाला आहे.
मेट्रो ब्रँड्स लिमिटेडच्या शेअरमध्ये आज ७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. मागील सात महिन्यांत एका दिवसात झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. भारतातील पादत्राणे आणि चामडे उद्योगाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेला सरकार पुरस्कृत योजनेचा उल्लेख आणि मध्यमवर्गासाठी आयकर स्लॅबमध्ये बदल याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या शेअरवर झाला आहे. सरकारनं प्रस्तावित केलेल्या योजनेमुळं रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील आणि या भागात आर्थिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.
गेल्या वर्षभरात मेट्रो ब्रँडचे शेअर्स २५ टक्क्यांनी वधारले आहेत. या वर्षी आतापर्यंत या कंपनीच्या शेअरनं ६ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याचा ५२ आठवड्यांतील उच्चांक १४३० रुपये आणि नीचांकी स्तर ९९०.०५ रुपये आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला मेट्रो ब्रँड्सनं आपले तिमाही निकाल जाहीर केले. डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ विक्रीत ११.५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीची एकूण विक्री डिसेंबर २०२३ मधील ६१६.३९ कोटी रुपयांवरून ६८७.८६ कोटी रुपये झाली आहे. मात्र, कंपनीचा निव्वळ नफा १५.३६ टक्क्यांनी घसरून ९४.१२ कोटी रुपयांवर आला आहे. तर एबिटडा ९.२२ टक्क्यांनी सुधारून २४६.५० कोटी रुपयांवर पोहोचला.
प्रति शेअर उत्पन्न (EPS) गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ४.०९ रुपयांवरून ३.४६ रुपयांवर आलं आहे. या तिमाहीत मेट्रो ब्रँड्सनं आपल्या फूट लॉकर स्टोअर तसेच न्यू एरासाठी आपलं पहिलं किऑस्क लाँच करून आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर शेअरमध्ये २ टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती.
संबंधित बातम्या