चांदीच्या दागिन्यांची खरेदी करताना आता फसवणूक होणार नाही! सरकार करतेय मोठी तयारी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  चांदीच्या दागिन्यांची खरेदी करताना आता फसवणूक होणार नाही! सरकार करतेय मोठी तयारी

चांदीच्या दागिन्यांची खरेदी करताना आता फसवणूक होणार नाही! सरकार करतेय मोठी तयारी

Dec 26, 2024 05:29 PM IST

Hallmarking on Silver News : चांदीच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीसाठी हॉलमार्किंगचा नियम लवकरच लागू होणार आहे. यामुळं ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

सोन्याप्रमाणेच चांदीच्या दागिन्यांवरही आता हॉलमार्किंग, तुम्हाला-आम्हाला काय होणार फायदा?
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दागिन्यांवरही आता हॉलमार्किंग, तुम्हाला-आम्हाला काय होणार फायदा?

Hallmarking on Silver News : चांदी आणि चांदीच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीच्या पद्धतीत आता बदल होणार आहे. सोन्याप्रमाणेच चांदीलाही हॉलमार्किंगचा नियम लवकरच लागू होणार आहे. सरकार या दिशेनं तयारी सुरू केली आहे.

सोन्याच्या बाबतीत हॉलमार्किंग काही टप्प्यात लागू करण्यात आलं असलं तरी चांदीवर त्याची अंमलबजावणी करताना काही तांत्रिक अडचणी आहेत. या समस्यांवर तोडगा काढल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचा सरकारचा विचार आहे.

तज्ज्ञांच्या मते, सध्या चांदीवर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन मार्क करण्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे चांदीवरून ते सहज पुसलं जाऊ शकतं. त्यासाठी तांत्रिक उपाययोजनांचा विचार केला जात आहे.

हा युनिक आयडी भारतीय मानक ब्युरोनं (BIS) पडताळणी केलेला सहा अंकी कोड आहे आणि कोणत्याही दागिन्यांवर तो रिपीट केला जात नाही. यामुळं ग्राहकांना त्यांच्या दागिन्यांची योग्य आणि पूर्ण किंमत मिळू शकते. इतकंच नाही तर गरजेच्या वेळी किंवा त्या दागिन्यांच्या रिमेकच्या वेळी ते सहज विकता येतात, कारण ते दागिने बीआयएस प्रमाणित असतात. याशिवाय एखाद्या ग्राहकाला दागिन्यांच्या शुद्धतेबाबत संशय असेल तर तो खास आयडीद्वारे कायदेशीर मदतही घेऊ शकतो.

हॉलमार्किंगचे फायदे:

शुद्धता : या आयडीच्या वापरामुळं दागिने योग्य कॅरेट आणि मानकांशी सुसंगत आहेत की नाही याची खात्री होते. दागिने प्रमाणित असणं हे विश्वासाचं प्रतीक आहे.

फ्रॉड प्रोटेक्शन : या खास आयडीद्वारे प्रत्येक दागिन्यांचा मागोवा घेणं शक्य आहे. यामुळं बनावट किंवा भेसळयुक्त सोनं ओळखता येतं. यामुळं ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डच्या प्रामाणिकपणावर ग्राहकांचा विश्वास निर्माण झाला आहे.

पारदर्शकता : हॉलमार्किंग दागिन्यांबद्दल संपूर्ण माहिती प्रदान करते. उदा. शुद्धता, कॅरेट, योग्य मोजमाप आणि वजन, दागिने निर्मात्याचा तपशील आणि विक्रेते.

सर्व्हेलन्स : या आयडीच्या माध्यमातून सरकार या मौल्यवान धातूंच्या व्यापारावर नजर ठेवून तस्करीला आळा घालू शकते. यामुळं काळा पैसा आणि अवैध सोन्याच्या व्यापाराला आळा बसू शकतो.

हॉलमार्किंगची संकल्पना नवी नाही!

भारतात १६ जून २०२१ पासून लागू आहे. काही भागात हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आलं आहे. दागिन्यांवर आता बीआयएस मार्क, प्युअरिटी ग्रेड आणि आयडी असणं आवश्यक आहे. ग्राहक बीआयएस मोबाइल अ‍ॅप किंवा वेबसाइटचा वापर करून आयडी कोडद्वारे दागिन्यांची शुद्धता आणि सत्यता तपासू शकतात.

Whats_app_banner