Stock Market News Today : अलीकडेच शेअर बाजारात लिस्ट झालेल्या शापूरजी पालोनजी ग्रुपच्या एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअरचा भाव शुक्रवारी BSE वर ६ टक्क्यांपेक्षा जास्त वाढून ५७० रुपयांवर पोहोचला. हा कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) कडून मिळालेल्या १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ऑर्डरचा हा परिणाम आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) च्या वतीनं संरक्षण मंत्रालयाकडून कंपनीला एक पत्र देण्यात आलं आहे, असं कंपनीनं एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटलं आहे. कंपनीला मिळालेली ही ऑर्डर मेरीटाइम थिएटर कमांड (MTC) चा विस्तार व अत्याधुनिकीकरण, SAF ची निर्मिती आणि विशाखापट्टणम इथं शिप लिफ्ट सुविधेची कार्यशाळा उपकरणं यासाठी आहे. ही ऑर्डर १०८४.५४ कोटी रुपयांची असून ती ३ वर्षांत पूर्ण करणं अपेक्षित आहे. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरला सप्टेंबरपर्यंत १९००० कोटी रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.
Afcons Infrastructure चा आयपीओ २५ ऑक्टोबर २०२४ रोजी उघडण्यात आला आणि तो २९ ऑक्टोबरपर्यंत खुला राहिला. कंपनीच्या शेअरची आयपीओ किंमत ४६३ रुपये होती. कंपनीचे शेअर्स ४ नोव्हेंबर २०२४ रोजी बीएसईवर ४३०.०५ रुपयांवर सूचीबद्ध झाले. लिस्टिंगच्या दिवशीच कंपनीचे शेअर्स ४७४.५५ रुपयांपर्यंत वाढले होते.
एफकॉन्सचा आयपीओ एकूण २.७७ पट सबस्क्राइब झाला होता. आयपीओमधील किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा ०.९९ पट सबस्क्राइब झाला. कर्मचाऱ्यांचा कोटा १.७७ पट सबस्क्राइब झाला. त्याच वेळी, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) श्रेणीमध्ये ५.३१ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. तर, पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा कोटा ३.९९ पट सबस्क्राइब झाला होता.
संबंधित बातम्या