Aditya Thackeray: दावोसमध्ये २९ कंपन्यांशी सामंजस्य करार; पैकी फक्त १ कंपनी परदेशी, उर्वरित २८ भारतीय
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Aditya Thackeray: दावोसमध्ये २९ कंपन्यांशी सामंजस्य करार; पैकी फक्त १ कंपनी परदेशी, उर्वरित २८ भारतीय

Aditya Thackeray: दावोसमध्ये २९ कंपन्यांशी सामंजस्य करार; पैकी फक्त १ कंपनी परदेशी, उर्वरित २८ भारतीय

Jan 24, 2025 08:15 PM IST

देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यात एकूण २९ कंपन्यांशी सामंजस्य करार झाले. त्यातील फक्त १ कंपनी परदेशी होती, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

दावोसमध्ये २९ पैकी फक्त १ कंपनी परदेशी- आदित्य ठाकरे
दावोसमध्ये २९ पैकी फक्त १ कंपनी परदेशी- आदित्य ठाकरे (Hindustan Times)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यादरम्यान एकूण २९ कंपन्यांशी सामंजस्य करार (MoUs) झाले आहेत . त्यातील फक्त १ कंपनी परदेशी आहे, उर्वरित २८ कंपन्यांचे मुख्यालय भारतातच आहे. विशेष म्हणजे, यातील २० कंपन्या महाराष्ट्रात असून, त्यातील १५ कंपन्या मुंबईतल्या आहेत. मुंबईतील कंपन्यांची कार्यालये मुख्यमंत्री कार्यालयाजवळ आहेत. हे लक्षात घेता केवळ सामंजस्य करार करण्यासाठी या कंपन्यांना दावोसला का नेण्यात आले, असा सवाल शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांची केला आहे. आज मातोश्री येथे पत्रकार परिषद ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी यावेळी काही प्रश्न उपस्थित केले. तसेच महाराष्ट्र आणि भारतात होणाऱ्या कोणत्याही गुंतवणुकीचे  स्वागत आहेच. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्याचे प्लॅनिंग त्यांच्या कार्यालयाकडून योग्य प्रकारे झाले नसल्याचे दिसते असं ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, 'दावोसमध्ये आंतरराष्ट्रीय नेते, कंपन्या आणि तेथील उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी वेळ वापरता आला असता. दावोस हे जागतिक स्तरावर संबंध निर्माण करण्यासाठी योग्य ठिकाण आहे. जेथे अनेक प्रतिभावान व्यक्ती आणि विविध संस्था एकत्र येतात. अशा ठिकाणी महाराष्ट्राच्या हितासाठी जगाशी संवाद साधण्याऐवजी मुख्यमंत्री राज्यातील, देशातीलच कंपन्यांमध्ये गुंतून राहण्यात काय फायदा? इतर कंपन्यांशी संपर्क करा. जागतिक घडामोडींचा अंदाज घेण्यासाठी तेथील सर्वोत्तम सेशन्सना उपस्थित रहा, असं आदित्य ठाकरे म्हणाले .

दावोस दौऱ्यातल्या करारामध्ये एवढ्या कंपन्या भारतातल्या मग 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' का नाही?

२०२२ सालापासून 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' कार्यक्रम झालेला नाही. का घेता आला नाही? दावोसमध्ये पार पडलेले सामंजस्य करार महाराष्ट्रातच पार पाडून जागतिक कंपन्यांना आपल्याकडे बोलावणे उचित ठरले असते . मुख्यमंत्र्यांनी असे सामंजस्य करार आपल्या राज्यात आयोजित करून जगाशी दावोससारख्या व्यासपीठावर संपर्क साधावा, अशी विनंती आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली.

अख्ख नगर विकास खाते मुख्यमंत्र्यांसोबत दावोसला, मंत्री रुसून गावी! 

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावाला निघून गेले होते. त्यांच्या पक्षाचे मंत्री मुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांच्या विभागाचे करार मुख्यमंत्री यांनी केले. नगरविकास विभाग अधिकारी दावोसला आणि मंत्री गावाला, अशी परिस्थिती होती. त्यांना निमंत्रण होतं की नाही? त्यांना सोबत का नेलं नाही? ती नाराजी आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसतीये .प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्र्यांच्या आधी उद्योग मंत्री पोहचायला हवेत. ते मुख्यमंत्री यांच्या नंतर गेले. उद्योग मंत्री यांचा असा काय कार्यक्रम होता जे तिथे थांबू शकत नव्हते? पक्षांतर्गत नाराजी होती का? मुख्यमंत्री सगळे काम सोडून तिथे थांबतात, मात्र उद्योग मंत्री थांबू शकत नाही? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला.

Whats_app_banner