अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची वाढ; बांगलादेशकडून मिळाली पेमेंटची भरघोस रक्कम
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची वाढ; बांगलादेशकडून मिळाली पेमेंटची भरघोस रक्कम

अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची वाढ; बांगलादेशकडून मिळाली पेमेंटची भरघोस रक्कम

HT Marathi Desk HT Marathi
Updated Mar 27, 2025 05:18 PM IST

अदानी पॉवरचा शेअर गुरुवारी ५ टक्क्यांनी वधारला, बांगलादेशातील वीजपुरवठा थकबाकीमुळे अर्धा झाला होता. अदानीच्या वीज निर्मिती युनिटने चार महिन्यांनंतर पूर्ण पुरवठा सुरु केला आहे, ज्यामुळे ब्लॅकआऊट टाळता येईल.

अदानी पॉवर शेअर ची कामगिरी
अदानी पॉवर शेअर ची कामगिरी

अदानी पॉवरचा शेअर गुरुवारी ५ टक्क्यांनी वधारल्याचे दिसून आले. हा शेअर ५२३.९० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण समोर आलं आहे. अदानी पॉवर बांगलादेशला वीजपुरवठा करतो. दरम्यान, बांगलादेशकडून वीजेची देयके थकल्यामुळे अदानी पॉवरकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र आता बांगलादेश सरकारने अदानी पॉवरला रक्कम अदा केली आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजारात त्याचे पडसाद दिसून आले. 

बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष रेजाउल करीम यांनी गुरुवारी सांगितले की, आम्ही अदानी पॉवरला नियमित पेमेंट करत आहोत. अदानी पॉवरकडून बांगलादेशला गरजेनुसार वीज मिळत आहे. देयकाचे प्रमाण आणि मागील थकबाकी भरली आहे की नाही हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डच्या आकडेवारीनुसार अदानी पॉवरने दोन आठवड्यांपूर्वी वीजपुरवठ्यात वाढ केली होती. मात्र बांगलादेश सध्या परकीय चलनाच्या संकटाशी झुंजतोय. त्यामुळे अनेक देयके अदा न केल्याने अदानी पॉवर लिमिटेडने नोव्हेंबरमध्ये त्यांच्या झारखंड स्थित १६०० मेगावॅट क्षमतेच्या कोळसा आधारित वीज प्रकल्पातून बांगलादेशला केला जाणारा वीजपुरवठा अर्धा केला होता. आता वीज पुरवठा पूर्ववत झाल्यामुळे बांगलादेशला उन्हाळ्याच्या कडक महिन्यांत ब्लॅकआऊट टाळण्यास मदत होणार आहे. बांगलादेशच्या काही भागात तापमान ३८ डिग्री सेल्सिअसच्या वर पोहचले आहे.

अदानी पॉवरची बांगलादेश सरकारकडे तब्बल ८५० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त थकबाकी होती. आता ही थकबाकी ८० कोटी डॉलरपर्यंत खाली आली असून येत्या सहा महिन्यांत ती सुद्धा भरली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. बीपीडीबीने अदानीच्या कर्जदारांना कंपनीची कार्यशील भांडवलाची तूट कमी करण्यासाठी राजी करण्यासाठी हमी देखील दिली होती. त्यावर अदानी समूहाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

Whats_app_banner