Adani Power Share Price : अदानी समूहातील अदानी पॉवर कंपनीच्या शेअरमध्य गुरुवारी सकाळच्या सत्रात मोठी वाढ झाली. हा शेअर ६०० रुपयांच्या पातळीवर पोहोचला असून तो ७०० च्याही पुढं जाईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. कंपनीच्या एका संभाव्य निर्णयाचा हा परिणाम मानला जात आहे.
अदानी पॉवरनं सुमारे ५००० कोटी रुपयांच्या निधी उभारणीचा विचार सुरू केला आहे. या संदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सोमवार, २८ ऑक्टोबर २०२४ रोजी संचालक मंडळाची बैठक घेण्यात येणार आहे. या बातमीची सकारात्मक पडसाद बाजारात उमटले आहेत.
अदानी पॉवरच्या शेअरची ओपनिंग आज उत्साहवर्धक नव्हती. मात्र काही वेळातच हा शेअर एनएसईवर ६१२ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्यात सुमारे ४ टक्के वाढ झाली. सकाळी ११ वाजता तो ३.१७ टक्क्यांनी वधारून ६०६.३० रुपयांवर व्यवहार करत होता.
टेक्निकल चार्टवर अदानी पॉवरच्या शेअरची किंमत नुकतीच ५८० रुपये प्रति शेअरच्या आसपास पोहोचली असून आता अल्प ते मध्यम कालावधीत ६६० ते ७२० रुपये प्रति शेअरपर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
लक्ष्मी श्री इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी 'मिंट'ला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या संचालक मंडळाची पुढील आठवड्यात सोमवारी बैठक होणार असून त्यामध्ये पाच हजार कोटी रुपयांचा निधी उभारण्याच्या प्रस्तावावर विचार करून त्याला मंजुरी देण्यात येणार आहे. यामुळं अदानी पॉवरची चर्चा आहे. शिवाय, चार्ट पॅटर्नवर हा शेअर सुमारे ५८० रुपये प्रति शेअरवर पोहोचला आहे. फंडामेंटल आणि टेक्निकल अशा दोन्ही दृष्टिकोनातून हा शेअर मजबूत दिसत आहे.
थोडा अधिक काळ शेअर्स ठेवण्याचा सल्ला अंशुल जैन यांनी दिला आहे. नजीकच्या काळात हा शेअर ६६० रुपयांपर्यंत, तर मध्यम कालावाधीत तो ७२० रुपयांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे, असं जैन म्हणाले.
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगरिया यांनी सांगितलं की, अदानी पॉवरचे भागधारक ६५० रुपये प्रति शेअर या अल्पमुदतीच्या उद्दिष्टासाठी ५७० रुपयांचा स्टॉप लॉस कायम ठेवून हा शेअर ठेवू शकतात. नवीन गुंतवणूकदार ५७० रुपयांचा स्टॉप लॉस कायम ठेवून ६५० रुपयांच्या अल्पमुदतीच्या टार्गेटवर शेअर्स खरेदी करू शकतात.
संबंधित बातम्या