Adani Group News : जगातील आघाडीची कंपनी गुगल आणि मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला टक्कर देण्यासाठी अदानी समूह ई-कॉमर्स आणि पेमेंट क्षेत्रात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी डिजिटल कंपनी स्थापन करण्यात येणार आहे.
फायनान्शियल टाईम्सनं (FT) सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. कंपनी आता युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वर काम करण्यासाठी परवाना घेण्याचा विचार करीत आहे. यूपीआय हे भारतात मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं सार्वजनिक डिजिटल पेमेंट नेटवर्क आहे.
अदानी क्रेडिट कार्डच्या योजनेला अंतिम रूप देण्यासाठी बँकांशी वाटाघाटी सुरू आहेत, अशीही माहिती आहे. सरकारी पाठबळ असेलल्या ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सच्या (ONDC) माध्यमातून ऑनलाइन शॉपिंग देण्याबाबतही वाटाघाटी सुरू आहेत. या प्लॅटफॉर्मवर विक्रेते आणि खरेदीदार थेट एकत्र येतात. या प्लॅटफॉर्मवरून शॉपिंग करण्यासाठी पेमेंट अॅपची गरज असते. अदानी समूहाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास २०२२ च्या अखेरीस 'अदानी वन' या अॅपद्वारे ही सेवा उपलब्ध होईल. हे अॅप २०२२ मध्ये लाँच करण्यात आलं होतं. सध्या त्यामार्फत हॉटेल बुकिंग आणि विमान आरक्षणाची सेवा पुरवली जाते.
अदानी कंपनीची ई-कॉमर्स आणि पेमेंट कंपनी सर्वप्रथम समूहाती सध्याच्या ग्राहकांपर्यंत पोहोचेल. यात अदानीचं विमानतळ वापरणारे प्रवासी, गॅस आणि वीज ग्राहकांचा समावेश असेल. हे ग्राहक कोट्यवधींच्या घरात असल्याचा कंपनीचा दावा आहे.
हे ग्राहक बिल भरणा किंवा शुल्कमुक्त खरेदीच्या माध्यमातून लॉयल्टी पॉईंट्स मिळवू शकतात आणि त्यांचा वापर ऑनलाइन शॉपिंगसाठी करू शकतात. अशा प्रकारे विद्यमान ग्राहकांवर लक्ष केंद्रित केल्यास अदानी समूहाल ई-कॉमर्स क्षेत्रात शिरकाव करणं तुलनेनं सोपं जाईल, असं जाणकारांचं मत आहे.
राजकीय संबंधांमुळं चर्चेत असणारे व अडचणींचा सामना करणारे समूहाचे संस्थापक गौतम अदानी हे वेगानं विस्तारणाऱ्या ग्राहकाभिमुख बाजारपेठांमध्ये आपल्या कंपनीचा विस्तार करू पाहत आहेत. अदानी यांनी बंदरे, विमानतळ आणि वीज प्रकल्पांचं मोठं जाळं तयार केलं आहे. त्यामुळं ते आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चनं अदानीवर फसवणुकीचा आणि बाजारातील हेराफेरीचा आरोप केला. गौतम अदानी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याच्या दाव्यांमुळं अदानीच्या सूचीबद्ध शेअर्समध्ये १५० अब्ज डॉलर्सची घसरण झाली आणि विरोधकांकडून टीकेची झोड उठली. मात्र त्यातून अदानी समूह सावरला आहे.
सध्या सुरू असेलल्या निवडणुकीच्या हंगामात अदानी समूहातील कंपन्यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. अदानी यांनी निकृष्ट दर्जाचा कोळसा अधिक महाग, स्वच्छ इंधन म्हणून सरकारी कंपनीला दिल्याचा दावा गेल्या आठवड्यात फायनान्शिअल टाईम्सनं केला होता. त्यानंतर त्याला राजकीय वळण लागलं. सत्तांतर झाल्यास कंपनीची चौकशी करण्याचा इशारा विरोधकांनी दिला होता. अदानी समूहानं मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.
(डिस्क्लेमर: वर केलेली मते आणि शिफारशी वैयक्तिक विश्लेषक किंवा ब्रोकिंग कंपन्यांची आहेत, हिंदुस्तान टाइम्स मराठीची नाहीत. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी प्रमाणित तज्ञांचा सल्ला घ्यावा.)