मराठी बातम्या  /  बिझनेस  /  stock market : एक्झिट पोल मोदींच्या बाजूनं आल्यानं गुंतवणूकदार खूष! 'अदानी'चे शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड

stock market : एक्झिट पोल मोदींच्या बाजूनं आल्यानं गुंतवणूकदार खूष! 'अदानी'चे शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड

Jun 03, 2024 03:39 PM IST

share market update : देशात पुन्हा एकदा भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार येत असल्याचा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारावर विशेषत: अदानी समूहाच्या कंपन्यांवर झाला आहे.

एक्झिट पोल मोदींच्या बाजूनं आल्यानं गुंतवणूकदार खूष! 'अदानी'चे शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड
एक्झिट पोल मोदींच्या बाजूनं आल्यानं गुंतवणूकदार खूष! 'अदानी'चे शेअर खरेदी करण्यासाठी झुंबड (ANI)

share market update : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या, ४ जून रोजी होत आहे. निकालाच्या आधी जाहीर झालेल्या बहुतेक एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मोठा विजय मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचा थेट परिणाम शेअर बाजारात दिसत आहे. शेअर बाजारानं आज मोठी उसळी घेतली आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडं तिसऱ्यांदा सत्ता जाणार हे कळताच अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. अदानीच्या पाच कंपन्यांच्या समभागांनी आज ५२ आठवड्यांचा उच्चांक नोंदवला. तर, अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये सर्वाधिक १५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अदानी एंटरप्रायझेस

अदानी समूहाच्या या कंपनीच्या शेअरच्या किमतीत आज ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजारात कंपनीनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. सध्या अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स जवळपास ७ टक्क्यांच्या वाढीसह ३६४२.६५ रुपयांवर व्यवहार करत आहेत.

अदानी पोर्ट्स

अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचे ​​समभाग आज १० पेक्षाही जास्त टक्क्यांनी वधारले आहेत. सध्या हे शेअर १५८३.५० रुपयांवर ट्रेड करत आहेत. कंपनीचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. तर, कंपनीची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ७०२.८५ रुपये प्रति शेअर आहे.

अदानी पॉवर

अदानी पॉवर या कंपनीच्या समभागांच्या किमतीत आज १५.६५ टक्क्यांची वाढ झाली आहे. शेअर बाजार उघडताच ८७५ रुपयांवर जाऊन शेअरनं ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. कंपनीची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २३०.९५ रुपये आहे.

अदानी एनर्जी सोल्युशन्स

या कंपनीचे शेअर्स ११२८.१० रुपयांच्या पातळीवर उघडले. मात्र काही काळानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत ११.२३ टक्क्यांनी वाढून १२४९ रुपयांच्या पातळीवर पोहोचली. ही किंमत ५२ आठवड्यांच्या उच्चांकाच्या अगदी जवळ आहे.

अदानी टोटल गॅस

अदानी समूहाची ही कंपनी 15.28 टक्क्यांच्या वाढीसह 1197.95 रुपयांच्या पातळीवर उघडली होती. उघडल्यानंतर, समभागाची किंमत इंट्रा-डे नीचांकी पातळी 1114.25 रुपयांवर पोहोचली होती.

अदानी विल्मर लिमिटेड

बीएसईवर अदानी विल्मरचे शेअर्स ६ टक्क्यांहून अधिक वाढीसह २८०.५५ रुपयांवर उघडले. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक रु. २८२ आहे. कंपनीचे मार्केट कॅप ४७८८०.१६ कोटी रुपये आहे.

एनडीटीव्ही

अदानी समूहाच्या या मीडिया क्षेत्रातील कंपनीच्या शेअरमध्ये आज सुरुवातीच्या सत्रात चांगली झेप घेतली. बीएसईमध्ये कंपनीचे शेअर्स २७४.९० रुपयांच्या पातळीवर उघडले. कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३०६.५५ रुपये आहे.

एसीसी लिमिटेड

आज या सिमेंट कंपनीच्या शेअरच्या दरातही वाढ झाली आहे. शेअरची किंमत आज ६.७२ टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक २७१७.४० रुपये आहे.

अंबुजा सिमेंट लिमिटेड

अदानी समूहाच्या या कंपनीच्या शेअरची किंमत आज ६ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. बीएसईमध्ये कंपनीचे शेअर्स 665.05 रुपयांच्या पातळीवर उघडले. काही काळानंतर, कंपनीचे शेअर्स 676.05 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले.

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड

या कंपनीच्या शेअर्समध्ये आज १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स २१०० रुपयांच्या पातळीवर उघडले. मात्र काही काळानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत १३.४९ टक्क्यांनी वाढून २१७३.६५ रुपयांच्या पातळीवर पोहोचली. बीएसईमध्ये हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे.

(डिस्क्लेमर : हे वृत्त केवळ कंपनीची आणि त्याच्या शेअरच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आपल्या व्यक्तिगत सल्लागाराशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel