मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Group : हिंडनबर्ग प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधीच शेअर बाजारात उलथापालथ; 'अदानी'च्या शेअर्सचं काय झालं?

Adani Group : हिंडनबर्ग प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधीच शेअर बाजारात उलथापालथ; 'अदानी'च्या शेअर्सचं काय झालं?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 03, 2024 11:05 AM IST

Adani Group Share Price Today : हिंडनबर्ग संस्थेनं अदानी समूहावर केलेल्या आरोपांच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. या निकालाआधीच शेअर बाजारात उलथापालथ झाली आहे.

Gautam Adani
Gautam Adani (REUTERS)

Adani Hindenburg Case Judgement : अदानी समूहावर हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेनं केलेल्या आरोपांच्या प्रकरणाचा निकाल आज सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या मोठ्या निर्णयाआधीच शेअर बाजारात उलथापालथ झाली असून अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर उसळले आहेत.

अदानी समूहानं शेअरच्या किंमतींमध्ये फेरफार केल्याचा आरोप हिंडनबर्ग संस्थेनं केला होता. त्यानंतर अदानी समूहावर अनेक प्रश्न उपस्थित झाले. मागच्या वर्षभरात अदानीच्या शेअरना या आरोपांचा मोठा फटका बसला. सेबीनं या प्रकरणाची दखल घेतली व हे प्रकरण न्यायालयात गेले. 

IPO Explainer : आयपीओ म्हणजे काय? जाणून घ्या स्टॉक मार्केटमधील गुंतवणुकीचा भन्नाट पर्याय

मागील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयानं हिंडनबर्गच्या रिपोर्टवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही असं नमूद केलं होतं. मात्र, अंतिम निकाल राखून ठेवला होता. तो आज येणार आहे. मात्र हा निकाल अदानी समूहाच्या बाजूनं येण्याची शक्यता गृहित धरून गुंतवणूकदारांनी आधीच अदानीच्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी सुरू केली आहे.

समूहाच्या शेअर्समध्ये एकूण १४ टक्क्यांपर्यंत वाढ

अदानी समूहाच्या सर्व १० सूचीबद्ध कंपन्या आज तेजीत आहेत. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अदानी ग्रीन सोल्युशन्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स ७ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत.

Penny Stocks Explained : पेनी स्टॉक म्हणजे काय? त्यातील गुंतवणूक खरंच फायद्याची असते?

अदानी एनर्जी सोल्युशन्सचा शेअर १४ टक्क्यांनी वाढून १२१२ रुपयांवर पोहोचला. मंगळवारी हा शेअर १०६०.८५ रुपयांवर बंद झाला. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स ७ टक्क्यांहून अधिक वाढीसह ३१२८.६५ रुपयांवर व्यवहार करत आहेत. अदानी पोर्ट्सचे शेअर्स ४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढून ११२५ रुपयांवर पोहोचले आहेत. अदानी पॉवरचे शेअर्स सुमारे ५ टक्क्यांच्या वाढीसह ५४४.६५ रुपयांवर व्यवहार करत आहेत. अदानी ग्रीन एनर्जीचे समभाग ८ टक्यांच्या वर ट्रेड करत आहेत.

अदानी टोटल गॅस शेअरला अप्पर सर्किट

अदानी टोटल गॅसचे शेअर्स १० टक्के अपर सर्किटसह ११००.६५ रुपयांवर पोहोचले आहेत. अदानी विल्मरच्या शेअर्समध्येही ८ टक्के वाढ दिसत आहे. त्याचवेळी NDTV चे शेअर्स १० टक्क्यांच्या वाढीसह २९९.२५ रुपयांवर पोहोचले आहेत. अदानी समूहाची सिमेंट कंपनी एसीसीचे शेअर्स १.५० टक्क्यांनी वाढून २३०५.१५ रुपयांवर आहेत. तर अंबुजा सिमेंटचे शेअर्स सुमारे २ टक्के वाढीसह ५४१.४५ रुपयांवर पोहोचले आहेत.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्तात कंपनीच्या व शेअरच्या कामगिरीची केवळ माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel