Adani news : गौतम अदानी विरोधातील अटक वॉरंटनंतर अदानी ग्रुपला ३८ हजार कोटींचा फटका; सलग दुसऱ्या दिवशी शेअर गडगडले!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani news : गौतम अदानी विरोधातील अटक वॉरंटनंतर अदानी ग्रुपला ३८ हजार कोटींचा फटका; सलग दुसऱ्या दिवशी शेअर गडगडले!

Adani news : गौतम अदानी विरोधातील अटक वॉरंटनंतर अदानी ग्रुपला ३८ हजार कोटींचा फटका; सलग दुसऱ्या दिवशी शेअर गडगडले!

HT Marathi Desk HT Marathi
Nov 22, 2024 12:13 PM IST

Adani Group share price : लाचखोरीचे आरोप व अटक वॉरंटनंतर अदानी समूहातील शेअर्सवर गुंतवणूकदारांची बारीक नजर आहे.

अदानी समूहातील ११ कंपन्यांचे मार्केट कॅप ३८ हजार कोटी रुपयांनी घटले आहे.
अदानी समूहातील ११ कंपन्यांचे मार्केट कॅप ३८ हजार कोटी रुपयांनी घटले आहे.

Stock Market Updates : लाचखोरी आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकन कोर्टानं अटक वॉरंट बजावल्याचे तीव्र पडसाद शेअर बाजारात उमटले आहेत. अदानी समूहाचे शेअर्स सलग दुसऱ्या दिवशी दरडीसारखे कोसळले असून समूहाच्या कंपन्यांचं एकत्रित बाजारमूल्य तब्बल ३८ हजार कोटींनी घटलं आहे.

अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स आज ११ टक्क्यांनी घसरले आहेत. अदानी एन्टरप्रायझेसचा शेअर ७ टक्क्यांनी घसरून २,०३० रुपयांवर आला आहे. शुक्रवारी बीएसईवर अदानी पोर्ट्सचा शेअर ५ टक्क्यांहून अधिक घसरून १०५५.४० रुपयांवर आला. 

अदानी समूहाला गुरुवारी दुहेरी झटका बसला. अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्यासह सात जणांवर अमेरिकेत अब्जावधी डॉलर्सची लाच आणि फसवणुकीचे आरोप आहेत. तसंच, केनियानं अदानी समूहासोबतचे विमानतळ आणि वीज करार रद्द केले आहेत.

किती घसरले अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स?

अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर ११ टक्क्यांनी घसरला. कंपनीचा शेअर १०२०.८५ रुपयांवर पोहोचला आहे. तर अदानी ग्रीन सोल्युशन्स लिमिटेडचा शेअर 8 टक्क्यांहून अधिक घसरून 628 रुपयांवर आला आहे. शुक्रवारी अदानी पॉवरचा शेअर ४ टक्क्यांहून अधिक घसरून ४४५.७५ रुपयांवर आला. अदानी टोटल गॅसचा शेअर ३ टक्क्यांनी घसरला आहे. अदानी विल्मरच्या शेअर्समध्येही ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. एसीसी आणि अंबुजा सिमेंटचे समभाग मात्र सपाट व्यवहार करत आहेत.

बाजार भांडवल ११.६८ लाख कोटींवर

अदानी समूहाच्या ११ समभागांचे एकत्रित बाजार भांडवल ३८,००० कोटी रुपयांनी घटून ११.६८ लाख कोटी रुपयांवर आलं आहे. गेल्या दोन ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी समूहाचे बाजारमूल्य २.६२ लाख कोटी रुपयांनी घटलं आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्येही गुरुवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एन्टरप्रायझेसच्या शेअरमध्ये गुरुवारी २३ टक्क्यांची घसरण झाली. समूहातील इतर कंपन्यांचे समभागही घसरले.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

 

 

Whats_app_banner