Adani news : लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळले! गुंतवणूकदार सावध
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani news : लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळले! गुंतवणूकदार सावध

Adani news : लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळले! गुंतवणूकदार सावध

Updated Nov 21, 2024 10:17 AM IST

Adani Group shares news : अमेरिकेत झालेल्या लाचखोरीच्या आणि फसवणुकीच्या आरोपांनंतर अदानी समूहाच्या शेअर्सना आज मोठा फटका बसला आहे.

लाचखोरीच्या आरोपांनंतर गौतम अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळले! गुंतवणूकदार सावध
लाचखोरीच्या आरोपांनंतर गौतम अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळले! गुंतवणूकदार सावध (PTI)

Stock Market marathi news : हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमुळं अडचणीत आलेला मात्र पुन्हा सावरलेला अदानी समूह पुन्हा गोत्यात आला आहे. गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचा थेट फटका अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्सना बसला आहे.

गौतम अदानी समूहाच्या शेअर्समध्ये गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात मोठी घसरण झाली. अदानी समूहाचे शेअर्स आज २० टक्क्यांपर्यंत घसरले. शेअर्सच्या या घसरणीमागे गौतम अदानी यांच्यावर लाचखोरी आणि फसवणुकीचा आरोप आहे. अदानी यांच्यावर सौर प्रकल्पांचे कंत्राट आणि वित्तपुरवठा करण्यासाठी मोठी लाच दिल्याचा आरोप आहे आणि त्यांनी ही बाब अमेरिकन गुंतवणूकदारांपासून लपवली आहे.

गुरुवार, २१ नोव्हेंबर रोजी व्यवहाराच्या सुरुवातीला अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स १० आणि २० टक्क्याच्या सर्किटमध्ये आहेत.

कोणत्या शेअरमध्ये किती घसरण?

अदानी एन्टरप्रायझेस - २० टक्के

अदानी पोर्ट्स - १५ टक्के

अदानी ग्रीन एनर्जी - १८.४४ टक्के

अदानी एनर्जी सोल्यूशन्स - २०% लोअर सर्किट

अदानी पॉवर - १३.८५ टक्के

अदानी टोटल गॅस - १४.५९ टक्के

अदानी विल्मर - १०% लोअर सर्किट

एसीसी - १०.८९ टक्के

अंबुजा सिमेंट - १२.८७ टक्के

एनडीटीव्ही - १०.०१ टक्के

(एनसईवर सकाळी १०.३२ पर्यंतची आकडेवारी)

काय प्रकरण आहे?

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि अन्य एका कंपनीसाठी भारत सरकारला १२ गिगावॅट सौर ऊर्जा विकल्याप्रकरणी लाचखोरीचे हे प्रकरण आहे. अदानी आणि इतरांनी भारतात अब्जावधी डॉलर्सची कंत्राटे आणि वित्तपुरवठा मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना सुमारे २६.५ कोटी डॉलर्सची लाच दिल्याचा किंवा त्यांची योजना आखल्याचा आरोप या आरोपपत्रात करण्यात आला आहे. वॉल स्ट्रीट (अमेरिकन शेअर बाजार) गुंतवणूकदारांपासून खरी परिस्थिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या गुंतवणूकदारांनी गेल्या पाच वर्षांत या प्रकल्पात अब्जावधी डॉलर्स ओतले आहेत. यावर अदानी समूहाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

या संपूर्ण प्रकरणात अदानी यांचा पुतण्या आणि अदानी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक सागर अदानी आणि कंपनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत जैन यांच्यासह अन्य आरोपी आहेत. जैन हे २०२० ते २०२३ या कालावधीत कंपनीचे सीईओ होते आणि संचालक मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. ६२ वर्षीय अदानी यांच्यावर बुधवारी कट रचणे आणि सुरक्षा फसवणुकीचा आरोप ठेवण्यात आला होता. ब्रुकलिनच्या फेडरल कोर्टात त्याच्याविरोधात दोन खटले दाखल करण्यात आले आहेत.

Whats_app_banner