अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी, अमेरिकेतील दोषारोपानंतर झालेली पडझड थांबली!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी, अमेरिकेतील दोषारोपानंतर झालेली पडझड थांबली!

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी, अमेरिकेतील दोषारोपानंतर झालेली पडझड थांबली!

Nov 25, 2024 10:49 AM IST

Adani Group Share Prices : अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली आहे. सेन्सेक्स-निफ्टीतील बंपर तेजीमुळे अदानी एंटरप्रायझेस, पॉवर, पोर्ट्स आणि ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.

अदानी समूहाच्या शेअरमध्ये आज तेजी, आज सर्व तेजी
अदानी समूहाच्या शेअरमध्ये आज तेजी, आज सर्व तेजी (REUTERS)

Stock Market Updates : गुंतवणूकदारांची फसवणूक व लाचखोरीच्या आरोपांनंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेली पडझड थांबली आहे. अदानी समूहातील कंपन्याच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी आली आहे. सेन्सेक्स-निफ्टीतील बंपर तेजीचाही त्यास हातभार लागला आहे.

सकाळी १० वाजून २० मिनिटांनी अदानी एन्टरप्रायझेसचा शेअर ३.१२ टक्क्यांनी वधारला. आता तो २२९७.५० रुपयांवर आला आहे. अदानी पॉवरचा शेअर १.६५ टक्क्यांनी वधारून ४६८.०५ रुपयांवर व्यवहार करत होता. अदानी पोर्ट्सही २.०८ टक्क्यांनी वधारून १,१६०.४५ रुपयांवर पोहोचला. अदानी ग्रीन एनर्जीमध्ये १.६१ टक्क्यांची चांगली वाढ झाली आहे. अदानी विल्मर १.५२ टक्क्यांनी वधारून २९६.८० रुपयांवर व्यवहार करत आहे.

अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासह अन्य सात अधिकाऱ्यांसह अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड आणि अ‍ॅज्युर पॉवर यांना देण्यात आलेल्या सौर ऊर्जेच्या कंत्राटांवर अनुकूल अटींच्या बदल्यात २०२० ते २०२४ या कालावधीत अज्ञात भारतीय अधिकाऱ्यांना २,००० कोटी रुपये (२५ ० दशलक्ष डॉलर्स) लाच दिल्याचा आरोप अदानी यांच्यावर आहे.

अदानी समूहानं फेटाळले आरोप

अदानी समूहानं गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्यासह आपल्या संचालकांवरील आरोप फेटाळून लावले असून हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. या आरोपांनंतर गेल्या आठवड्यात अदानी समूहाच्या शेअरमध्ये घसरण झाली. आज अदानी समूहाचे सर्व शेअर्स तेजीत आहेत. एसीसी सिमेंट २.६९ टक्क्यांनी वधारला आहे. अंबुजा सिमेंट २.६६ टक्क्यांनी वधारून ट्रेड करत आहे. अदानी एनर्जी सोल्यूशन्स २.०३ टक्क्यांनी वाढून ट्रेड करत आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner