Adani group stocks : हिंडेनबर्गच्या नव्या धमाक्याचे शेअर बाजारात तीव्र पडसाद; अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर कोसळले!-adani group shares crash after hindenburg new report stocks market news in marathi ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani group stocks : हिंडेनबर्गच्या नव्या धमाक्याचे शेअर बाजारात तीव्र पडसाद; अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर कोसळले!

Adani group stocks : हिंडेनबर्गच्या नव्या धमाक्याचे शेअर बाजारात तीव्र पडसाद; अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर कोसळले!

Aug 12, 2024 10:44 AM IST

Adani Group stocks : हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेनं केलेल्या नव्या आरोपांनंतर अदानी समूहातील सर्वच कंपन्यांचे शेअर धडाधड कोसळले आहेत.

gautam adani  image credit- bloomberg
gautam adani image credit- bloomberg

Adani Group stocks : शेअर बाजार नियंत्रक सेक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबी (SEBI) च्या प्रमुख माधवी पुरी बूच आणि अदानी समूहावर केलेल्या नव्या आरोपांचे तीव्र पडसाद शेअर मार्केटमध्ये उमटले आहेत. आठवड्याच्या पहिल्या दिवशी अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर २ ते ९ टक्क्यांपर्यंत कोसळले आहेत.

सुरुवातीच्या व्यवहारातच अदानी पॉवरचे समभाग ९ टक्क्यांहून अधिक घसरले. अदानी विल्मर ६ टक्क्यांहून अधिक घसरला. अदानी समूहाचा बेंचमार्क शेअर असलेल्या अदानी एन्टरप्रायझेसचा शेअर ३.१७ टक्क्यांनी घसरला आहे. अदानी टोटल गॅसमध्ये ७ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. अदानी एनर्जी सोल्युशनमध्येही सुमारे साडेचार टक्क्यांची घसरण झाली आहे. एसीसी १.८३ टक्के तर अंबुजा सिमेंट १.५४ टक्क्यांनी घसरले आहेत. अदानी ग्रीन एनर्जी ३.६१ टक्क्यांनी घसरला आहे.

सेन्सेक्स, निफ्टीलाही फटका

हिंडेनबर्गच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स आणि निफ्टीही घसरले आहेत. सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला आहे तर निफ्टीला १०० हून अधिक अंकांनी घसरून ट्रेड करत आहे. निफ्टीतील टॉप लूजर्सपैकी अदानी एन्टरप्रायझेसचा शेअर सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ३.४१ टक्क्यांनी घसरून ३०७९ रुपयांवर आला आहे. एनटीपीसी १.९२ टक्क्यांनी घसरला. तर, अदानी पोर्ट्स १.८१ टक्क्यांनी घसरला आहे.

मागील वेळी अदानी समूहाला टार्गेट केल्यानंतर आता हिंडेनबर्गनं थेट सेबीला लक्ष्य केलं आहे. सेबीच्या प्रमुख व त्यांच्या पतीचे अदानी समूहाशी मिलिभगत आहे. या दोघांचीही अदानीच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. त्यामुळंच आरोप होऊनही अदानी समूहावर कुठलीही कारवाई केली जात नाही, असा आरोप हिंडेनबर्गनं केला आहे.

माधवी बूच यांच्यासह सेबीनंही फेटाळले आरोप

माधवी बूच यांनी हिंडेनबर्गचे आरोप फेटाळले आहेत. भारतातील अनेक नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल हिंडेनबर्गला कारणं दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे, परंतु त्यास उत्तर देण्याऐवजी हिंडेनबर्ग सेबीच्या विश्वासार्हतेवर हल्ला करत आहे. सेबीनंही एक निवेदन जारी करून हे आरोप फेटाळून लावले आहेत.

मागील वर्षी झाले होते अदानी समूहावर आरोप

यापूर्वी २४ जानेवारी २०२३ रोजी हिंडेनबर्गने अदानी समूहावर शेअर्समध्ये फेरफार आणि ऑडिटिंगमध्ये फेरफार केल्याचा आरोप केला होता आणि हा कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचं म्हटलं होतं. अदानी समूहातील अदानी एन्टरप्रायझेस कंपनी किरकोळ विक्रीसाठी २० हजार कोटी रुपयांचे समभाग जारी करणार असताना हिंडेनबर्गनं हा अहवाल प्रसिद्ध केला होता. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहातील जवळपास सर्वच कंपन्यांच्या समभागांमध्ये भूकंप झाला होता. मात्र, नंतर त्यांना सेबीनं समूहाला क्लीन चिट दिली होती.