Adani Group : २० हजार कोटी कुणाचे?; राहुल गांधींच्या आरोपांवर अदानी समूहाचा प्रथमच खुलासा
Adani Group Clarification : हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांंवर अदानी समूहानं प्रथमच खुलासा केला आहे.
Adani Group Clarification : हिंडेनबर्गच्या अहवालानंतर बॅकफूटवर गेलेल्या व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या रडारवर असलेल्या अदानी समूहानं २० हजार कोटींच्या आरोपांवर अखेर खुलासा केला आहे. २०१९ पासून आतापर्यंत वेगवेगळ्या कंपन्यांतील हिस्सेदारी विकून आम्ही २० हजार कोटी रुपये उभे केले आहेत, असं अदानी समूहानं म्हटलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
अदानी समूहानं आपल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे केले आहेत आणि लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे, असा आरोप हिंडेनबर्गच्या अहवालातून करण्यात आला. त्यानंतर राहुल गांधी यांनी संसदेत आणि संसदेबाहेरही अदानी समूहाला घेरलं. अदानी समूहानं अनेक बोगस कंपन्यांमध्ये तब्बल २० हजार कोटी रुपये गुंतवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळंच हे सगळं सुरू आहे, असा थेट आरोप राहुल गांधी यांनी केला. त्यामुळं देशभर खळबळ उडाली. अदानी समूहाच्या कथित गैरव्यवहारांची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसनं लावून धरली.
या पार्श्वभूमीवर अदानी समूहानं आज खुलासा केला आहे. अबू धाबी स्थित ग्लोबल स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट युनिट इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी (IHC) सारख्या गुंतवणूकदारांनी अदानी एन्टरप्रायझेस लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) सारख्या समूह कंपन्यांमध्ये २.५९३ अब्ज डॉलरची (सुमारे २० हजार कोटी) गुंतवणूक केली आहे. प्रवर्तकांनी अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि AGEL मधील भागभांडवल विकून २.८७३ अब्ज डॉलर उभे केले. ही रक्कम नव्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी पावर सारख्या कंपन्यांच्या विस्तारात गुंतवण्यात आली, असं समूहानं म्हटलं आहे.
अदानी समूहानं २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत प्रश्न उपस्थित करणारा हिंडेनबर्गचा अहवालही फेटाळून लावला आहे. अदानी समूहाला अडचणीत आणण्याचा स्पर्धक कंपन्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळं अशा आरोपांची चर्चा होणं साहजिक आहे. मात्र, आम्ही कायद्यांचं पूर्ण पालन करत असून कुठलाही गडबड घोटाळा नाही, असंही अदानी समूहानं स्पष्ट केलं आहे. मात्र, बोगस कंपन्यांबाबतच्या आरोपांवर अदानी समूहानं कुठलंही भाष्य केलेलं नाही.