Adani Group Stock : अदानी समूहाची सिमेंट कंपनी सांघी इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये कालपासून तेजी पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या चौथ्या दिवशी उसळलेला हा शेअर आजही सकारात्मक वाटचाल करत आहे. आज ११.३४ वाजता एनएसईवर हा शेअर १.३९ टक्क्यांनी वाढून ६२.९५ रुपयांवर ट्रेड करत आहे.
सांघी इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक येत्या २७ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. या बैठकीत कंपनी डिसेंबर तिमाहीचे अनऑडिटेड आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. कंपनीनं शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे. तिमाही निकाल सकारात्मक येण्याच्या अपेक्षेनं गुंतवणूकदारांनी शेअर खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अदानी समूहानं सांघी इंडस्ट्रीज आणि पेन्ना सिमेंट यांचे अंबुजा सिमेंटमध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. सांघी इंडस्ट्रीजच्या पेड-अप इक्विटी भागभांडवलामध्ये अंबुजा सिमेंट्सचा हिस्सा ५८.०८ टक्के आहे. डिसेंबर २०२३ मध्ये कंपनीचं अधिग्रहण केलं.
मागील पाच दिवसांत सांघी इंडस्ट्रीजचा शेअर जवळपास ४.४१ टक्क्यांनी वधारला आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १३२.८५ रुपये आहे. फेब्रुवारीमध्ये कंपनीनं हा उच्चांक गाठला होता. तर, ५२ आठवड्यांचा नीचांकी भाव १३ जानेवारी २०२५ रोजी ५५.५६ रुपये इतका नोंदला गेला आहे.
अदानी ग्रीन एनर्जीनं डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा नफा ८५ टक्क्यांनी वाढून ४७४ कोटी रुपये झाला आहे. प्रामुख्यानं वीजपुरवठ्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाल्यानं नफ्यात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला २५६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत वीजपुरवठ्यातून मिळणारे उत्पन्न वाढून १,९९३ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ते १,७६५ कोटी रुपये होतं.
अदानी एनर्जी सोल्युशन्सचा निव्वळ नफा डिसेंबर तिमाहीत ८० टक्क्यांनी वाढून ६२५.३० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. डिसेंबर तिमाहीत ३४८.२५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. डिसेंबर तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून ६०००.३९ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते ४८२४.४२ कोटी रुपये होतं.
संबंधित बातम्या