Adani stocks : लाचखोरीच्या आरोपांवर खुलाशामुळं दिलासा! अदानी ग्रुपच्या शेअर्सनी पुन्हा उड्डाण भरले!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani stocks : लाचखोरीच्या आरोपांवर खुलाशामुळं दिलासा! अदानी ग्रुपच्या शेअर्सनी पुन्हा उड्डाण भरले!

Adani stocks : लाचखोरीच्या आरोपांवर खुलाशामुळं दिलासा! अदानी ग्रुपच्या शेअर्सनी पुन्हा उड्डाण भरले!

Nov 29, 2024 05:45 PM IST

Adani group stocks price news : अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये पुन्हा एकदा तेजी आली आहे. अमेरिकी न्यायालयाच्या आरोपांवर स्पष्टता आल्याचा हा परिणाम मानला जात आहे.

Adani stocks : लाचखोरीचे आरोप फिके पडले! अदानी ग्रुपच्या शेअर्सनी पुन्हा उड्डाण भरले!
Adani stocks : लाचखोरीचे आरोप फिके पडले! अदानी ग्रुपच्या शेअर्सनी पुन्हा उड्डाण भरले! (REUTERS)

Adani Group Stocks : अमेरिकी न्यायालयानं लाचखोरी आणि फसवणुकीचा ठपका ठेवल्यानंतर घसरलेले अदानी समूहाचे शेअर्स पुन्हा एकदा उसळले आहेत. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवारी अदानी समूहातील अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्युशन्स आणि अदानी टोटल गॅस या कंपन्यांच्या शेअरमध्ये आज मोठी वाढ झाली. अदानी समूहानं या प्रकरणावर भूमिका मांडल्यानंतर चित्र बदललं आहे.

अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर शुक्रवारी २४ टक्क्यांनी वधारून १,३६९.१५ रुपयांवर पोहोचला. व्यवहाराअंती हा शेअर १३१५.०५ रुपयांवर बंद झाला. आदल्या दिवसाच्या तुलनेत एनएसईवर या शेअरमध्ये २०.९६ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.

अदानी टोटल गॅसचा शेअर आज सुमारे १५ टक्क्यांनी वधारला आणि एका क्षणी ८६२.१५ रुपयांवर पोहोचला. व्यवहाराअंती हा शेअर ०.२४ टक्क्यांनी वधारून ८०५.८० रुपयांवर बंद झाला.

अदानी एनर्जी सोल्युशन्सचा शेअर शुक्रवारी ८४०.५५ रुपयांवर बंद झाला. हा शेअर आदल्या दिवसाच्या तुलनेत १५.५६ टक्क्यांनी वधारून बंद झाला. व्यवहारादरम्यान हा शेअर २० टक्क्यांनी वधारून ८६९.४० रुपयांवर पोहोचला.

अदानी समूहाच्या खुलाशाचा परिणाम

अमेरिकन न्यायालयात ठेवलेल्या कथित आरोपांबद्दल अदानी समूहानं स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानुसार, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडवर (एईएमएल) कथित लाचप्रकरणात अमेरिकन फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अ‍ॅक्टचे (एफसीपीए) उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला नाही, असं अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडनं गुरुवारी स्पष्ट केलं. त्यांच्यावर सिक्युरिटीज फ्रॉडअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यामुळं फारतर आर्थिक दंड होऊ शकतो, असं कंपनीनं म्हटलं आहे. हा संदेश गुंतवणूकदारांपर्यंत गेल्याचं प्रतिबिंब आज शेअर बाजारात उमटलं.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner