Adani Group Stock News : श्रीलंका सरकारनं अदानी समूहातील अदानी ग्रीन एनर्जी कंपनीला मोठा झटका दिला आहे. या कंपनी सोबतचा ४४ ० दशलक्ष डॉलर्सचा वीज खरेदी करार श्रीलंकेनं रद्द केला आहे. या वृत्तानंतर अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर आज गडगडला.
बीएसईवर अदानी ग्रीनच्या शेअरचा भाव १०३९.४५ रुपयांवर खुला झाला. गुरुवारच्या बंदच्या तुलनेत शेअरची ओपनिंग सकारात्मक झाली. डिसेंबर २०२४ च्या तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर हा शेअर ४ टक्क्यांनी वधारून १०६५.४५ रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मात्र, प्रकल्प रद्द झाल्याच्या वृत्तानंतर हा शेअर दिवसभरातील उच्चांकी पातळीवरून ५.६ टक्क्यांनी घसरून १००८ रुपयांवर आला.
डेली एफटीनं दिलेल्या वृत्तानुसार, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळानं मन्नार आणि पूनरिन इथं पवन ऊर्जा प्रकल्प बांधण्याचं कंत्राट अदानी ग्रीन एनर्जी एसएल लिमिटेडला देण्याचा निर्णय मागे घेतला. गेल्या वर्षी जूनमध्ये या प्रकल्पाचा करार झाला होता. दिसानायके यांच्या आधीचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी त्यास मंजुरी दिली होती. ४८४ मेगावॅट क्षमतेचा हा पवनऊर्जा प्रकल्प होता.
विद्यमान राष्ट्राध्यक्षांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान हा करार रद्द करून श्रीलंकेत पवनऊर्जा विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा मागविण्याचं आश्वासन दिलं होतं. या आश्वासनाची पूर्तता करत अदानी ग्रीन एनर्जी प्रकल्पाला मंजुरी देणारा मे २०२४ मध्ये घेतलेला तत्कालीन मंत्रिमंडळाचा निर्णय नव्या सरकारनं रद्द केला.
अदानी ग्रीन एनर्जीनं गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीचं कामकाजातून मिळणारं एकत्रित उत्पन्न २३११ कोटी रुपयांवरून २.३३ टक्क्यांनी वाढून २३६५ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.
दरम्यान, करोत्तर नफा (पीएटी) वार्षिक ८५ टक्क्यांनी वाढून ४७४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत २५६ कोटी रुपये होता.
संबंधित बातम्या