अभिनेता अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील अंधेरी भागात असलेला त्यांचा आलिशान डुप्लेक्स फ्लॅट ८३ कोटी रुपयांना विकला आहे. तब्बल ५,१८५ चौरस फूट आकाराचा हा आलिशान फ्लॅट अटलांटिस नावाच्या इमारतीत विकत घेतला होता. मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार अमिताभ बच्चन यांचा हा फ्लॅट २७ व्या आणि २८ व्या अशा दोन मजल्यावर असून १७ जानेवारी रोजी विकल्याची नोंद झाली आहे.
अमिताभ बच्चन यांना या फ्लॅटमध्ये एकूण सहा कार पार्किंगसाठी जागा देण्यात आली होती. या विक्री व्यवहारासाठी ४ कोटी ९८ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आले असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होते. अमिताभ बच्चन यांनी हा फ्लॅट विजय सिंह ठाकोर आणि कमल विजय ठाकोर यांना विकल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होते.
‘स्क्वेअरयार्ड’ ने दिलेल्या वृत्तानुसार अमिताभ बच्चन यांनी हा ड्युप्लेक्स फ्लॅट एप्रिल २०२१ मध्ये ३१ कोटी रुपयांना खरेदी केला होता. आता चार वर्षानंतर त्यांनी ८३ कोटी रुपयांना फ्लॅट विकला आहे. या विक्रीच्या व्यवहारात अमिताभ बच्चन यांना तब्बल १६८ टक्के वाढ मिळाली आहे.
प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्सनुसार अमिताभ बच्चन यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये अभिनेत्री क्रिती सेनन हिला १० लाख रुपये मासिक आणि ६० लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेऊन हा फ्लॅट भाड्याने दिला होता. दरम्यान, या व्यवहाराप्रकरणी अभिनेता अमिताभ बच्चन आणि खरेदीदारांशी संपर्क होऊ शकला नाही.
बच्चन कुटुंबाने २०२० ते २०२४ दरम्यान रिअल इस्टेटमध्ये सुमारे २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ‘स्क्वेअरयार्ड्स’ने दिलेल्या वृत्तानुसार अमिताभ बच्चन आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन या दोघांनी मिळून रिअल इस्टेटमध्ये १९४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ताज्या आकड्यांनुसार रिअल इस्टेटमधील बच्चन कुटुंबीयांच्या गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ २०० कोटी रुपये एवढा झाला आहे.
विशेष म्हणजे बच्चन दाम्पत्याने २०२४ मध्येच रिअल इस्टेटमध्ये १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये प्रामुख्याने ओशिवरा आणि मागाठाणे (बोरिवली पूर्व) येथे खरेदी केलेल्या मालमत्तांचा प्रामुख्याने समावेश आहे.
संबंधित बातम्या