ACC Q3 Results : अदानीच्या सिमेंट कंपनीनं बाजी मारली! तिमाहीचा निव्वळ नफा दुपटीनं वाढला! आता नजरा शेअरवर
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ACC Q3 Results : अदानीच्या सिमेंट कंपनीनं बाजी मारली! तिमाहीचा निव्वळ नफा दुपटीनं वाढला! आता नजरा शेअरवर

ACC Q3 Results : अदानीच्या सिमेंट कंपनीनं बाजी मारली! तिमाहीचा निव्वळ नफा दुपटीनं वाढला! आता नजरा शेअरवर

Jan 27, 2025 04:04 PM IST

ACC Ltd Net Profit : एसीसी लिमिटेडचा निव्वळ नफा आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत १०३.०६ टक्क्यांनी वाढून १०९१.७३ कोटी रुपये झाला आहे.

एसीसी लिमिटेडचा तिसऱ्या तिमाहीचा निव्वळ नफा १०३ टक्क्यांनी वाढून १०९१.७३ कोटींवर, आता नजरा शेअरवर
एसीसी लिमिटेडचा तिसऱ्या तिमाहीचा निव्वळ नफा १०३ टक्क्यांनी वाढून १०९१.७३ कोटींवर, आता नजरा शेअरवर

Q3 Results News in Marathi : एसीसी लिमिटेडचा डिसेंबरला (आर्थिक वर्ष २०२५) संपलेल्या तिसऱ्या तिमाहीतील एकत्रित निव्वळ नफा १०३.०६ टक्क्यांनी वाढून १,०९१.७३ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ५३७.६३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. अनुक्रमिक, एकत्रित निव्वळ नफा ४४६.८ टक्क्यांनी वाढला आहे.

डिसेंबरच्या तिमाहीत एसीसीचं कामकाजातून एकत्रित उत्पन्न ५२०७.२९ कोटी रुपये आहे. वार्षिक आधारावर ही वाढ ७.२५ टक्के आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ते ४८५५.२२ कोटी रुपये होतं. अनुक्रमे महसुलात १५.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कंपनीच्या एक्स्चेंज फाइलिंगनुसार, डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत व्याज, कर, अवमूल्यन आणि अमोर्टायझेशनपूर्वीचे उत्पन्न (EBITDA) १,११६ कोटी रुपये होतं. आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत ते ९०५ कोटी रुपये होतं. आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीतील १८.४ टक्क्यांवरून एबिटडा मार्जिन १८.८ टक्के नोंदवलं गेलं.

काय म्हणाले कंपनीचे सीईओ?

‘वाढलेली उलाढाल, खर्चातील बचत आणि वाढीव कार्यक्षमतेच्या माध्यमातून वाढीला चालना देण्यावर आमचा भर आहे. तिमाही निकालात त्याचंच प्रतिबिंब पडलं आहे. आमच्या प्रीमियम सिमेंट उत्पादनांना जोरदार मागणी आहे. गुणवत्तेचे सर्व निकष पूर्ण करतील अशी दर्जेदार उत्पादनं पुरवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. नाविन्यपूर्ण व टिकाऊ उत्पादनं देताना शेअरहोल्डर्सच्या गुंतवणुकीचं मूल्य वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असं कंपनीचे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कपूर यांनी एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलं आहे.

पुढील काळात सिमेंटची मागणी वाढणार

कंपनीच्या एक्स्चेंज फायलिंगनुसार, आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत सिमेंट क्षेत्रात १.५ ते २ टक्क्यांची माफक वाढ झाली आहे. पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण क्षेत्रातील बांधकामांच्या वाढीमुळं आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीत सिमेंटच्या मागणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण-केंद्रित अर्थसंकल्प २०२५ आणि या क्षेत्रांवरील सरकारी खर्चात वाढ यामुळं या वाढीला आणखी चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. एकंदरीत, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये सिमेंटची मागणी अंदाजे ४ ते ५ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

एसीसीच्या शेअरचा भाव

कंपनीचे निकाल सकारात्मक असले तरी आज शेअरमध्ये घसरण झाली आहे. एनएसईवर एसीसीचा शेअर आज ३.०६ टक्क्यांनी घसरून १९९६ रुपयांवर बंद झाला. मागील वर्षभरात कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना निराश केलं आहे. या कालावधीत शेअरमध्ये २० टक्क्यांची घसरण झाली आहे.

मेहता इक्विटीज लिमिटेडचे तांत्रिक विश्लेषक रियांक अरोरा यांनी सांगितलं की, १८६८ च्या खालच्या पातळीवरून या शेअरनं पुनरागमन केलं आहे. या शेअरमध्ये तेजीची चिन्हं दिसत आहेत. १९७० च्या पातळीवर शेअरला सपोर्ट दिसतो आहे, तो तुटला तर शेअरवर विक्रीचा दबाव येऊ शकतो. तात्कालिक प्रतिकार २१०० वर आहे. त्यापुढं २२०० च्या जवळ आहे. एकंदरीत, पुढील ब्रेकआऊटपर्यंत हा शेअर १९७० ते २१०० च्या मर्यादेत व्यवहार करेल अशी आमची अपेक्षा आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner