ब्रँडी बनविणाऱ्या कंपनीचे शेअर घेण्यासाठी अक्षरश: झुंबड, एका बातमीनं केली कमाल
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  ब्रँडी बनविणाऱ्या कंपनीचे शेअर घेण्यासाठी अक्षरश: झुंबड, एका बातमीनं केली कमाल

ब्रँडी बनविणाऱ्या कंपनीचे शेअर घेण्यासाठी अक्षरश: झुंबड, एका बातमीनं केली कमाल

HT Marathi Desk HT Marathi
Nov 05, 2024 10:58 AM IST

tilaknagar industries share price : ब्रँडी बनविणाऱ्या टिळकनगर इंडस्ट्रीज या कंपनीचे शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची अक्षरश: झुंबड उडाली आहे.

ब्रँडी बनविणाऱ्या कंपनीचे शेअर घेण्यासाठी अक्षरश: झुंबड, एका बातमीनं केली कमाल
ब्रँडी बनविणाऱ्या कंपनीचे शेअर घेण्यासाठी अक्षरश: झुंबड, एका बातमीनं केली कमाल

tilaknagar industries share price : मेन्शन हाऊस ब्रँडी हा भारतातील सर्वाधिक विकला जाणारा ब्रँड आणि जागतिक स्तरावर दुसरा सर्वात मोठा ब्रँड बनवणाऱ्या टिळकनगर इंडस्ट्रीजचे शेअर खरेदी करण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली आहे. त्यामुळं हा शेअर उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. कंपनीचे उत्कृष्ट तिमाही निकाल आणि कर्जमुक्तीच्या बातमीनं ही किमया केली आहे.

टिळकनगर इंडस्ट्रीज या कंपनीचे शेअर आज १५ टक्क्यांपेक्षा जास्त वधारले आहेत. एनएसईवर या शेअरची किंमत ३३६.९० रुपयांवर पोहोचली आहे. हा शेअरचा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने ८२३.३ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे. मागील तिमाहीशी तुलना करता हा महसूल ९.७ टक्के सुधारणा आणि २३.८ टक्के वार्षिक वाढ दर्शवितो. कंपनीने दुसऱ्या तिमाहीत ६६ कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही एबिटडा गाठला असून, वार्षिक ३९.१ टक्क्यांची वाढ दर्शविली आहे. एबिटडा मार्जिन ४२२ बेसिस पॉईंट्सने वाढून १७.६ टक्के झाला आहे. करोत्तर नफा ५८ कोटींवर पोहोचला. कमी वित्त खर्चामुळे ही वार्षिक वाढ ८२ टक्के आहे.

या तिमाहीत कंपनी २५ कोटी रुपयांच्या निव्वळ रोख रकमेसह कर्जमुक्त झाली. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य (आयएमएफएल) ब्रँडी सेगमेंटमध्ये ही कंपनी आघाडीवर आहे. एकूण व्हॉल्यूममध्ये कंपनीचा वाटा ९३ टक्के आहे. विश्लेषकांच्या मते, या सेगमेंटमध्ये कंपनीने जवळपास २० टक्के मार्केट शेअर मिळवला आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीने २.९५ दशलक्ष युनिट्सची विक्री केली. 

या तिमाहीत कंपनीने सेमी-प्रीमियम सेगमेंटमध्ये आसाममध्ये मॅन्शन हाऊस व्हिस्की लाँच केली. कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीतील कमाईच्या फायलिंगनुसार, कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी तेलंगण आणि कर्नाटकमधील पी अँड ए आयएमएफएल सेगमेंटमध्ये तिसरी सर्वात मोठी प्लेयर कंपनी म्हणून आपले स्थान कायम राखले आहे, तर पुद्दुचेरीमधील सर्वात मोठी आयएमएफएल कंपनी म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे.

कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अमित डहाणूकर म्हणाले, 'उत्तम ब्रँड मिक्स आणि कॉस्ट ऑप्टिमायझेशन उपक्रमांमुळे आमचे मार्जिन वाढले आहे. आंध्र प्रदेशमध्ये दुसऱ्या तिमाहीत कमी प्रमाणात वाढ होऊनही हे शक्य झालं आहे.

कशी आहे शेअरची वाटचाल?

पाच वर्षांत २२९० टक्क्यांनी वाढलेल्या या शेअरने अलीकडच्या वर्षांत शेअरधारकांना समृद्ध केले आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीचे शेअर्स १३ रुपयांवरून ३३२ रुपयांच्या सध्याच्या पातळीवर पोहोचले आहेत. या कालावधीत कंपनीनं २,२९० टक्के इतका मजबूत परतावा दिला आहे. याआधी सप्टेंबरमध्ये या शेअरने ३३० रुपयांचा उच्चांक नोंदवला होता.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner