Top IPOs 2024 : चालू वर्षातील आतापर्यंतचे टॉप परफॉर्मिंग आयपीओ कोणते? पाहा!-5 top performing ipos of 2024 so far share market news in marathi ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Top IPOs 2024 : चालू वर्षातील आतापर्यंतचे टॉप परफॉर्मिंग आयपीओ कोणते? पाहा!

Top IPOs 2024 : चालू वर्षातील आतापर्यंतचे टॉप परफॉर्मिंग आयपीओ कोणते? पाहा!

Sep 26, 2024 06:04 PM IST

Top 5 IPOs of 2024 : चालू वर्षात अनेक आयपीओंनी बंपर नफा मिळवून दिला आहे. अशा पाच टॉप आयपीओंवर एक नजर…

२०२४ मधील आतापर्यंतचे टॉप परफॉर्मिंग आयपीओ कोणते? पाहा!
२०२४ मधील आतापर्यंतचे टॉप परफॉर्मिंग आयपीओ कोणते? पाहा!

Top 5 IPOs this Year : २०२४ मध्ये आतापर्यंत एकूण १७८ कंपन्यांनी शेअर बाजारात पदार्पण केलं आहे. २०२४च्या पहिल्या सहामाहीत जागतिक आयपीओंमध्ये भारताचा वाटा २५ टक्के होता. आयपीओंच्या वाढत्या संख्येमुळं मेनबोर्ड-लिस्टेड कंपन्यांच्या बाबतीतही देश अव्वल स्थानावर पोहोचला आहे. सध्या ५४५० हून अधिक कंपन्या सूचीबद्ध आहेत. हा आकडा जगात सर्वाधिक आहेत.

देशांतर्गत वाढती मागणी आणि गुंतवणूकदारांच्या विश्वासामुळं बीएसई आयपीओ निर्देशांकानं बीएसई ५०० पेक्षा चांगली कामगिरी केली आहे, तर एसएमई आयपीओमध्ये लक्षणीय लिस्टिंग वाढ झाली आहे. २०२४ मध्ये सुमारे ५८ मेनबोर्ड आयपीओंपैकी २५ पेक्षा जास्त आयपीओंनी ५० टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे आणि ७ शेअरर्स मल्टीबॅगर ठरले आहेत.

२०२४ मधील आतापर्यंतचे ५ बेस्ट परफॉर्मिंग आयपीओ कोणते पाहूया!

ज्योती सीएनसी ऑटोमेशन

ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड (जेसीएएल) ही मेटल-कटिंग कॉम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल (CNC) मशीनची जगातील अग्रगण्य उत्पादकांपैकी एक आहे. एअरोस्पेस आणि डिफेन्स, ऑटो आणि ऑटो कंपोनेंट्स, जनरल इंजिनीअरिंग, ईएमएस, डाई अँड मोल्ड्स आणि इतर सारख्या विविध उद्योगांमधील ग्राहकांसाठी ही कंपनी सीएनसी मशीन, सीएनसी टर्निंग सेंटर्स, सीएनसी टर्न मिल सेंटर्स, सीएनसी व्हर्टिकल मशीनिंग सेंटर्स (व्हीएमसी) आणि सीएनसी क्षैतिज मशीनिंग सेंटर्स (एचएमसी) तयार करते आणि पुरवठा करते. १६ जानेवारी २०२४ रोजी शेअर बाजारात आल्यापासून ज्योती सीएनसीच्या कंपनीचा शेअर ३३१ रुपयांवरून १,१६९ रुपयांपर्यंत वाढला आहे. जून २०२४ तिमाहीतील दमदार कामगिरी तेजीचं प्रमुख कारण ठरली आहे.

भारती हेक्साकॉम

भारती हेक्साकॉम ही भारती एअरटेलची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. भारती हेक्साकॉममध्ये सरकारी कंपनी टेलिकम्युनिकेशन्स कन्सलटंट कंपनीचा ३० टक्के हिस्सा आहे. उर्वरित ७० टक्के हिस्सा भारती एअरटेलकडं आहे. कंपनी राजस्थान आणि ईशान्य भारतात वायरलेस सेवा, फिक्स्ड लाइन्स आणि ब्रॉडबँड सेवांच्या व्यवसायात गुंतलेली आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत कंपनीचे २३,७४८ नेटवर्क टॉवर्स होते, त्यापैकी ५००५ मालकीचे होते. १२ एप्रिल २०२४ रोजी सूचीबद्ध झाल्यापासून शेअरची किंमत ५७० रुपयांच्या इश्यू प्राइसवरून १५४ टक्के वाढून १४४८ रुपये झाली आहे. हा शेअर ४२ टक्क्यांच्या वाढीसह ८१३.७ रुपयांवर लिस्ट झाला होता.

प्रीमियर एनर्जीज

१९९५ मध्ये स्थापन झालेली प्रीमियर एनर्जी ही एक अग्रगण्य एकात्मिक सोलर सेल आणि सोलर मॉड्यूल उत्पादन कंपनी आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर तिचा भर आहे. वॉशिंग्टन डीसीमधील प्रमुख खासगी इक्विटी गुंतवणूकदार जीईएफ कॅपिटलच्या पाठिंब्यानं प्रीमियर एनर्जी फोटोव्होल्टिक सोल्यूशन्समध्ये काम करते. एनटीपीसी, टाटा पॉवर सोलर सिस्टीम्स, पॅनासोनिक लाइफ सोल्युशन्स, शक्ती पंप्स, ल्युमिनस आदी नामांकित कंपन्या प्रीमियर एनर्जीजच्या ग्राहक आहेत. ३ सप्टेंबर २०२४ रोजी लिस्ट झाल्यापासून शेअरची किंमत ४५० रुपयांच्या इश्यू प्राइसवरून १४६ टक्क्यांनी वाढून ११०९ रुपये झाली आहे. हा शेअर इश्यू प्राइसपेक्षा ८६ टक्के प्रीमियमवर लिस्ट झाला होता.

बजाज हाऊसिंग फायनान्स

बजाज हाऊसिंग फायनान्स ही बजाज फिनसर्व्ह आणि बजाज फायनान्स या दोन्ही कंपन्यांची उपकंपनी आहे. ग्राहक आणि एसएमई कर्जात आघाडीवर असलेल्या बजाज फायनान्सकडं बजाज हाऊसिंग फायनान्सचा १०० टक्के हिस्सा आहे, तर वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील प्रमुख कंपनी बजाज फिनसर्व्हचा बजाज फायनान्समध्ये ५१.३ टक्के हिस्सा आहे. परिणामी, दोन्ही कंपन्या बीएचएफएलच्या प्रमुख प्रवर्तक आहेत. १६ सप्टेंबर २०२४ रोजी लिस्ट झाल्यापासून शेअरची किंमत ७० रुपयांच्या इश्यू प्राइसवरून १३० टक्क्यांनी वाढून १६१ रुपये झाली आहे.

एक्झिकॉम टेली-सिस्टीम्स

१९९४ मध्ये स्थापन झालेली एक्झिकॉम टेलि-सिस्टीम्स पॉवर सिस्टीम्स, इलेक्ट्रिक व्हेइकल (EV) चार्जिंग आणि इतर संबंधित सोल्यूशन्समध्ये एक आघाडीची कंपनी आहे. यात पॉवर सिस्टीम आणि ईव्ही चार्जिंग सोल्युशन्स असे दोन बिझनेस डिव्हिजन आहेत. कंपनी ईव्ही चार्जर व्यवसायातही कार्यरत आहे. स्लो चार्जिंग सोल्यूशन्स (निवासी वापरासाठी एसी चार्जर) आणि फास्ट चार्जिंग सोल्यूशन्स (शहरे आणि महामार्गांमधील व्यवसाय आणि सार्वजनिक चार्जिंग नेटवर्कसाठी डीसी चार्जर) दोन्ही ऑफर करते. ५ मार्च २०२४ रोजी लिस्टिंग झाल्यापासून शेअरचा भाव १३० टक्क्यांनी वधारला असून तो १४२ रुपयांवरून ३२७ रुपयांवर पोहोचला आहे.

तरीही सावधगिरी महत्त्वाची!

वरील पाच शेअर्सव्यतिरिक्त प्लॅटिनम इंडस्ट्रीज आणि युनिकॉमर्स ईसोल्यूशन्सनं देखील मल्टीबॅगर परतावा दिला आहे. अव्वल कामगिरी करणारे आयपीओ त्यांच्या प्रभावी प्रारंभिक परताव्यामुळं बऱ्याचदा लक्ष वेधून घेतात, परंतु सावधगिरीनं या संधींकडं पाहणं आवश्यक आहे. केवळ आयपीओचं यश ही भविष्यातील यशाची हमी नसते. आयपीओ गुंतवणूक अत्यंत अस्थिर असू शकते. बाजाराचा कल, गुंतवणूक किंवा मागणीत तात्पुरती वाढ यामुळं लवकर फायदा होतो. कालांतरानं कंपनीची वस्तुस्थिती समोर येते. उदाहरणार्थ, मजबूत प्रारंभिक परतावा देणारे काही शेअर नंतर ढासळतात तर, फंडामेंटली मजबूत कंपन्या वाढत राहू शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल संशोधन करणं आवश्यक आहे.

 

(डिस्क्लेमर: हा लेख केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

Whats_app_banner
विभाग