मराठी बातम्या  /  बिझनेस  /  highest fd rates : 'या' चार बँका देतायत एफडीवर सर्वाधिक व्याज; तुमची एफडी कुठं आहे?

highest fd rates : 'या' चार बँका देतायत एफडीवर सर्वाधिक व्याज; तुमची एफडी कुठं आहे?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
May 14, 2024 01:01 PM IST

Highest Bank FD Rates : एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी थोडे अधिक पैसे कमावण्याची संधी आहे. चार बँकांनी आपल्या व्याजदरात बदल करून त्यात वाढ केली आहे.

'या' चार बँका देतायत एफडीवर सर्वाधिक व्याज; तुमची एफडी कुठं आहे?
'या' चार बँका देतायत एफडीवर सर्वाधिक व्याज; तुमची एफडी कुठं आहे?

Highest Bank FD Rates : गुंतवणुकीचे नवनवे मार्ग सध्या उपलब्ध असले तरी बँकेतील मुदत ठेवींवर सर्वसामान्यांचा विश्वास अद्यापही कायम आहे. सुरक्षित आणि गरजेच्या वेळी सहज कामी येणारी गुंतवणूक म्हणून याकडं पाहिलं जातं. एफडीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक खास बातमी आहे. या महिन्यात चार बँकांनी त्यांच्या एफडीच्या व्याजात वाढ केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एफडीच्या व्याजदरात वाढ करणाऱ्या बँकांमध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, सिटी युनियन बँक, आरबीएल बँक आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक यांचा समावेश आहे. खरं तर या बँकांमधील कर्जाची उचल ही ठेवीपेक्षा जास्त आहे. तसेच, गुंतवणूकदार चांगला परतावा देणाऱ्या गुंतवणुकीत त्यांचे पैसे गुंतवत आहेत, त्यामुळं बँकांवर व्याजदर वाढवण्याचा दबाव आहे.

चालू वर्षाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या तिमाहीपर्यंत बँकांतील ठेवी कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं बँकांवर दबाव कायम राहील. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांची इच्छा असल्यास, ते दीर्घ मुदतीची एफडी निवडू शकतात. तसंच, केंद्र सरकारनं सर्व लहान-मोठ्या बँकांच्या ठेवींवर ५ लाख रुपयांची हमी देण्याची तरतूद केली आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक (Utkarsh Small Finance Bank)

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेनं २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात बदल केला आहे. नवीन दर १ मे २०२४ पासून लागू झाले आहेत. त्यानुसार सर्वसामान्य नागरिकांसाठी बँकेचा व्याजदर ४ टक्के ते ८.५० टक्के आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँकेचा व्याजदर ४.६० टक्के ते ९.१० टक्क्यांपर्यंत आहे. २ ते ३ वर्षांच्या कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याजदर उपलब्ध आहेत. हा व्याजदर ८.५० टक्के ते ९.१० टक्क्यांच्या दरम्यान आहे.

सिटी युनियन बँक (City Union Bank)

बँकेचे नवीन व्याजदर ६ मे २०२४ पासून लागू झाले आहेत. बँक सामान्य नागरिकांना ५ ते ७.२५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीचा व्याजदर ५ ते ७.७५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. बँक ४०० दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याजदर देत आहे.

आरबीएल बँक (RBL Bank)

आरबीएल बँकेनं १८ ते २४ महिन्यांच्या एफडीसाठी ८ टक्के व्याज दर निश्चित केला आहे. ज्येष्ठ नागरिकांना ०.५० टक्के अतिरिक्त व्याज मिळत आहे तर ८० वर्षांवरील नागरिकांना ०.७५ टक्के अतिरिक्त व्याज द्यावं लागणार आहे.

कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक (Capital Small Finance Bank)

कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक सामान्य नागरिकांना ३.५ ते ७.५५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर ४ ते ८.०५ टक्के आहे. सर्वाधिक व्याज दर ४०० दिवसांच्या कालावधीसाठी आहे. नवीन दर ६ मे २०२४ पासून लागू झाले आहेत.

WhatsApp channel