मराठी बातम्या  /  बिझनेस  /  देशातील ३ सरकारी बँकांनी सहा महिन्यांत दिला दुप्पट परतावा, तुम्हाला मिळाला का?

देशातील ३ सरकारी बँकांनी सहा महिन्यांत दिला दुप्पट परतावा, तुम्हाला मिळाला का?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 05, 2024 05:11 PM IST

UCO IOB PSB share price : शेअरची किंमत १०० च्याही खाली असलेल्या तीन सरकारी बँकांच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना जोरदार कमाई करून दिली आहे.

Bank Share price
Bank Share price

PSU Bank Share Price : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्स गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वधारत आहेत. खासकरून कमी किंमतीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ होत आहे. शंभर रुपयांपेक्षा कमी किंमत असलेले पंजाब अँड सिंध बँक, इंडियन ओवरसीज बँक आणि युको बँकेच्या शेअर्सनी गेल्या ३ दिवसांत ३० ते ४४ टक्के परतावा दिला आहे.

युको बँक (UCO Bank)

गेल्या ५ दिवसांत युको बँकेच्या शेअर्सनी ४२ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर, गेल्या एका महिन्यात त्यात ४५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बँकेच्या समभागांनी सहा महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. याचा अर्थ, जर एखाद्या गुंतवणूकदारानं सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असतील तर त्याचे १ लाख रुपये आता २.२२ लाख रुपये झाले आहेत. आज हा शेअर एनएसईवर १५.२३ टक्क्यांनी वाढून ५८.२५ रुपयांवर पोहोचला आहे. तर, या शेअरनं आज ६०.६५ रुपयांपर्यंत जाऊन ५२ आठवड्यांचा उच्चांक नोंदवला आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक २२.२५ रुपये आहे.

पंजाब अँड सिंध बँक (Punjab and Sind bank)

पंजाब आणि सिंध बँकेचे शेअर्स देखील आज ७.५३ टक्क्यांनी वाढून ७० रुपयांवर व्यवहार करत आहेत. आज सकाळी ६७.२५ रुपयांवर खुल्या झालेल्या या शेअरनं एनएसईवर ७७.५० रुपयांचा उच्चांक गाठला. पीएसबी शेअर्सनं गेल्या ५ दिवसांत ४८ टक्के परतावा दिला आहे. एका महिन्यात सुमारे ६६ टक्के परतावा दिला आहे. तर, गेल्या सहा महिन्यांत पीएसबीच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत दुपटीनं वाढ झाली आहे. या कालावधीत पंजाब आणि सिंध बँकेनं १३८ टक्के इतका मजबूत परतावा दिला आहे. पीएसबीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७७.५० तर, नीचांक २३.१० रुपये इतका आहे.

इंडियन ओवरसीज बँक (Indian Overseas Bank)

 इंडियन ओवरसीज बँकेचे शेअर्स देखील आज वाढत आहेत. आज सुरुवातीच्या व्यवहारात ते सुमारे १६ टक्क्यांनी वाढून ६५.२५ रुपयांवर व्यवहार करत होते. आयओबीनं आज ६६.१० वर पोहोचून ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक २०.८५ रुपये आहे. गेल्या ५ दिवसांत या शेअरनं ३६ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तर, गेल्या एका महिन्यात आयओबीनं ४८ टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या ६ महिन्यांत या शेअरनं गुंतवणूकदारांच्या १ लाखाचे २.५२ लाख रुपये करून दिले आहेत.

 

(डिस्क्लेमर : वरील वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

 

 

 

 

WhatsApp channel

विभाग