Who will be the CM? : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर एग्झिट पोल देखील जाहीर करण्यात आले. या एक्झिटपोल्सपैकी बहुतेकांनी महायुतीच्या पारड्यात आपले मत टाकले आहे. या संदर्भात प्रसिद्ध ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर गुरूजी यांनी आपले भाकीत वर्तवले आहे. एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर यांनी भाकीत वर्तवले आहे. ज्योतिषाचार्य मारटकर गुरूजी यांनी २०१९ मध्येही जर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होतील असे भाकीत वर्तवले होते. ते भाकीत खरे ठरले होते.
या तीन महिन्यात तूळ संक्रमणाचा काळ आहे. हा काळ म्हणजे १५ ऑक्टोबर ते १५ जानेवारी असा आहे. सुक्ष्म पद्धतीने महिन्याच्या कुंडली पाहतो. हे आमावस्या आणि पौर्णिमेवर आधारित असतात. त्यानंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांना काय ग्रहस्थिती आहे, याचा विचार केला जातो. यानुसार सत्ताधारी पक्षाला १५ ऑक्टोबर पासूनची परिस्थिती सुरुवातीच्या काळात अतिशय खराब होती. १५ नोव्हेंबरनंतर मात्र ही परिस्थिती अनुकूल व्हायला सुरू झाले. म्हणजे लोकसभेला जो ट्रेंड होता तो आता विधानसभेसाठी या काळात काही प्रमाणात कमी झालेली दिसते. आणि ग्रहयोगाचा विचार करता असे दिसते की सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांची स्थिती ५०-५० म्हणजेच तुल्यबळ आहे.
वृश्चिक राशीत रवी आल्यानंतर तो गुरूच्या समोरून भ्रमण करत असल्याचे दिसते. ही परिस्थिती १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर अशी आहे. हा काळ सत्ताधारी पक्षासाठी जास्त अनुकूल दिसतो. महाविकास आघाडी जरी स्पर्धेत असली, तरी खूप अटितटीची लढत होऊन शेवटी महायुतीचा विजय होऊ शकतो असे दिसते.
लोकसभेला उलट परिस्थिती होती. त्यावेळी महाविकास आघाडीचे पारडे जड होते. मात्र अलिकडच्या काळात महायुतीने लाडकी बहीण अशा योजने सारख्या काही योजना आणल्या त्याचाही परिणाम निकालावर होणार आहे. मात्र असे असते तरी फार कमी फरकाने महायुतीचा विजय होईल असे दिसते.
ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर गुरूजी म्हणाले की, नेत्यांच्या पत्रिका पाहिल्या, तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील असेही दिसते. मागील दोन तीन वर्षांपासून एकनाथ शिंदे यांची पत्रिका बलवान आहे. त्यांची धनु रास आहे. तसेच त्यांच्या मकर राशीत रवी-मंगळ अशी युती आहे. मीन राशीत गुरू-शुक्र उच्च स्थानी आहेत. तसेच कुंभ राशीत शनी अतिशय बलवान आहे. ज्या वेळेला कुंभ राशीत शनी असतो तेव्हा त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आले. आजही मे महिन्यापर्यंत शिंदे यांच्या कुंभ राशीत शनी आहे. या प्रभावामुळे पुन्हा त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळू शकते.
भाजपच्या १०० पर्यंत जागा गेल्या तर मुख्यमंत्री भाजपचा होऊ शकतो. मात्र भाजप जर ८० जागांपर्यंत थांबला आणि शिंदेच्या शिवसेनेला ४० पर्यंत जागा आल्या तर, शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणे हाच पर्याय उरेल असेही गुरूजी पुढे म्हणाले.
जर भाजपने १०० जागांचा टप्पा ओलांडला तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं दिसतय.
'सुप्रिया सुळे होऊ शकतात मुख्यमंत्री'
ज्या पक्षाला जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र नेहमी काम करेल असे नाही. महाविकास आघाडीतील पक्षांचा विचार केला तर क्रमांक एकचा पक्ष हा काँग्रेस असणार आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि तिसऱ्या स्थानी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना हा पक्ष असेल असे गणित गुरूजी यांनी मांडले आहे. दोन क्रमांकाचा पक्ष मुख्यमंत्रिपदाची मागणी करू शकतो. कारण आमच्या शिवाय सरकार स्थापन करता येणार नाही अशी परिस्थिती जेव्हा येईल तेव्हा राष्ट्रवादी ही भूमिका घेऊ शकते. शरद पवार यांनी अशावेळी सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे केले तर त्या मुख्यमंत्री होऊ शकतात
सुप्रिया सुळे यांची पत्रिका पाहिली तर त्यांच्या मिथुन राशीमध्ये रवी आहे. तर पुढच्या काळात मिथुन राशीत गुरू येणार आहे. त्यामुळे शरद पवार ही भूमिका घेऊ शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत मुख्यमंत्रिपद मिळालेले नाही. अशा अवस्थेत आम्हाला या वेळी मुख्यमंत्रिपद द्यावे अशी मागणी शरद पवार करू शकतात, असे गुरूजींनी मांडले आहे.
महाविकास आघाडीतर्फे जयंत पाटीलही मुख्यमंत्री होऊ शकतात अशी परिस्थिती उद्भवू शकते. मात्र दोघांच्या नावाचा विचार केला तर मी अग्रक्रम सुप्रिया सुळे यांना देईन असे मारटकर गुरूजी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचा नाना पटोले यांची पत्रिका चांगली आहे. त्यांच्या वृषभ राशीत रवी आहे. तेथून गुरू चाललेला आहे. तसेच त्यांचा शनी चांगला आहे. त्यामुळे नाना पटोले की बाळासाहेब थोरात असा विचार केल्यास नाना पटोले यांनी संधी मिळू शकते. मात्र ही शक्यता धुसर आहे. ग्रहयोग महायुतीला अनुकूल आहे. महाविकास आघाडीची शक्यता खूप कमी आहे.
तुळ लग्न असून दशम स्थानाचा अधिपती चंद्र हा राहूसोबत आहे. हा राहू गोंधळ निर्माण करतो. गेल्या तीन महिन्यात गोंधळ पाहिलेला आहे. त्यामुळे कोणालाही अंदाज बांधणं कठीण आहे. पण जर महायुती आणि महाविकास आघाडीला सारख्या जागा मिळाल्या. राष्ट्रपती राजवट लागू शकते. राहू इथे काम करेल. महाराष्ट्राची पत्रिकाही बोलकी आहे.
धनुलग्न मिथुन रास, पत्रिकेच्या सत्तास्थानी राहू केतू भ्रमण सुरू आहे विचित्र हा ट्रेंड मे महिन्यापर्यंत आहे. तेव्हा महायुती आणि महाविकास आघाडीला जर समसमान जागा मिळाल्या तर राज्यात राष्ट्रपती राजवटीची शक्यताही दिसून येत आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.