मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Weekly Horoscope: मकर संक्रांतीनंतरचा हा आठवडा तक्रारींचा असेल की कौतुकाचा, वाचा राशीभविष्य !

Weekly Horoscope: मकर संक्रांतीनंतरचा हा आठवडा तक्रारींचा असेल की कौतुकाचा, वाचा राशीभविष्य !

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 15, 2024 06:00 AM IST

Weekly Horoscope 15 to 21 january 2024: ग्रह-नक्षत्राच्या बदलाच्या स्थितीत मकर संक्रांतीनंतरचा हा आठवडा कसा राहील, शुभ दिवस कोणता राहील, जाणून घ्या मेष ते मीन सर्व राशींचे भविष्य.

Weekly Horoscope 15 to 21 january 2024
Weekly Horoscope 15 to 21 january 2024 (Pixabay)

सप्ताहात पहिल्याच दिवसी रवि मकर राशीत प्रवेश करणार आहे. गुरू, मंगळ आणि शुक्राच्या मालकीच्या राशीतुन चंद्र गोचर करतोय. शुक्र धनु राशीत प्रवेश करतोय. मंगळ आणि बुधाशी योग करीत असुन, चंद्र भ्रमणात राहु-नेपच्युन आणि गुरू-हर्षल यांच्याशी संयोग करणार आहे. यामुळे अशुभ 'ग्रहणयोग' आणि अत्याधिक शुभ 'गजकेसरी योग' तयार होत आहे. हे दोन्ही योग कसे फलद्रुप होतील! काय बदल घडणार आहेत या सप्ताहात! वाचा साप्ताहिक राशीभविष्य!

मेषः 

सप्ताहाच्या सुरुवातीच्या कालखंडात घरातील मागच्या पिढीच्या लोकांशी मात्र मतभेद होण्याची शक्यता आहे. नियोजन आणि शिस्तीची फारकत तुमच्या वागण्यामध्ये झाल्यामुळे हे वाद निर्माण होतील. परंतु कोणत्याही परिस्थितीत मन:शांती बिघडू देऊ नका. वरिष्ठ मंडळींना खूप त्रास होईल. तुमच्या वागण्या बोलण्यात तफावत दिसल्यामुळे घरचे लोक तुम्हाला जाब विचारतील. फटकन एखादा निर्णय घेण्याचा अविचारही हातून घडू शकतो. तज्ञ व्यक्तींचे सल्ले मात्र उपयोगी पडतील. कुटुंबातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. पत्नीसोबत मधुर संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या विषयी गैरसमज आणि संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते. मानसिक स्वास्थ बिघडणार नाही याची काळजी घ्या. प्रेमसंबंधात वादविवादाचे प्रकार घडतील. भागीदारीतील आर्थिक व्यवहार देवाण-घेवाण अडचणीत आणणार आहेत. व्यवसायिकांना कर्ज प्रकरण त्रासदायक ठरण्याची संभावना आहे. नोकरदारांनी वरिष्ठांशी स्नेहपूर्वक वागा. आरोग्याच्या तक्रारी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. संततीतीविषयी अशुभ घटना घडतील. मानसिक अस्वस्थता उत्पन करणारा सप्ताह आहे. व्यापार वर्गांनी कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नयेत. निर्णय चुकू शकतात. घरातील वातावरण समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करा. संबंधात तणाव निर्माण होतील. प्रकृतीची काळजी घ्या. शक्यतो दुरवरचे प्रवास टाळावेत.

शुभदिवसः सोमवार,बुधवार,रविवार.

वृषभः 

सप्ताहात नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. प्रत्येक वेळी स्वत:च्या पद्धतीनेच काम करण्याच आग्रह न ठेवता दुसऱ्यांचा विचार करणे आवश्यक ठरेल. बुद्धी आणि शारीरिक ताकद यांचे प्रमाण बिघडल्यामुळे कामाचा वेग कमी होईल.अचानक खर्चाला तोंड द्यावे लागल्यामुळे थोडी धावपळ होईल. आपणास कठोर परिश्रम घ्यावे लागतील. गुप्तशत्रुपासुन त्रास जाणवेल. शत्रुपक्षाचे वर्चस्व वाढेल. नोकरीत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. शेअर्समधील मोठी गुंतवणूक टाळावी. व्यापारी वर्गानी काळजीपूर्वक व्यवहार करा. भावनावर नियंत्रण ठेवून वाटचाल करावी. नातेवाईकांशी पटणार नाही. वाहनापासून अपघाताची शक्यता राहिल. आरोग्य ठीक राहणार नाही. कायम चिंताग्रस्त राहाल. राहत्या घरात चोरी व आग ह्याची भिती राहील.घरात कलह होतील. त्यामुळे नवनवीन घरात राहण्याचे प्रसंग येतील. स्थावर इस्टेटीचे व्यवहारात आर्थिक नुकसान संभवते. आपल्या व्यवहारात भानगडी उपस्थित होतील. नोकरीत वरिष्ठांकडून त्रास होण्याची शक्यता वाटते. वडिलांच्या इस्टेटीत लाभ होणार नाही. सार्वजनिक कामात सावधानतेने भाग घ्या. मानहानी होण्याची शक्यता आहे. उधळेपणावर आळा घालावा लागेल.

शुभदिवसः गुरुवार,शुक्रवार,शनिवार.

मिथुनः 

सप्ताहात समिश्र स्वरूपाचे फले मिळतील. मुलांच्या करियरसंबंधी आर्थिक तरतूद करण्याकडे कल राहील. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या वादग्रस्त व्यक्तीला तुमच्यावर सोपवतील त्यांना सरळ करण्यात तुमचा हातखडा रहाणार आहे. कुटुंबात तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. पैसा मिळवण्याचे वेगवेगळे पर्याय तुमच्यासमोर उपलब्ध होतील. त्याच्या निवडीचे स्वातंत्र्य तुम्हाला रहाणार आहे. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. आरोग्याच्या छोट्या-छोट्या तक्रारी राहतील. डोळ्यांचे विकार संभवतात. ललित वाङमयाची आवड राहील. आपल्याकडे कल्पकता शक्ती उत्तम असते. आपण कामात सातत्य ठेवा. कलाकारांना विशेषत गायन व वादक यांना नविन संधी मिळतील. नातेवाईक व शेजारी वर्गीशी आपले सलोख्याचे संबंध राहतील. प्रवासात प्रियजनांच्या भेटी-गाठी होतील. तरुण-तरुणींचे विवाहाचे योग आहेत. सार्वजनिक कामाची हौस निर्माण होईल.आपण शूर व पराक्रमी आहात. व्यापारातील हुशारीमुळे आपली दुसऱ्यांवर सहज छाप पडेल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. मित्रमैत्रिणी सोबत काळजीपूर्वक व्यवहार करा. नोकरीत बढती मिळेल. सार्वजनिक कामात भाग घ्याल. आकस्मिक धनलाभ प्राप्तीचे योग विद्ववत्तेचा लौकीक होईल.

शुभदिवसः बुधवार,शनिवार,रविवार.

कर्कः 

सप्ताहातील ग्रहमान अनुकुल वातावरण निर्माण करतील. वरिष्ठ एखादे काम बिना दिक्कत तुमच्यावर सोपवतील. इथे तुमचा स्वाभिमान सुखावून जाईल. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातील ज्ञानाचा तुम्हाला खूप उपयोग होईल. तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. लेखकांच्या हातून उत्कृष्ट लिखाण होईल. अत्यंत तरल व्यक्तीमत्त्वामुळे तुमच्याकडे कल्पनांचा खजिनाच असतो. या कल्पनेला सृजनशीलतेची जोड मिळाल्यास तुमच्यासारखे तुम्हीच अशी कौतुकाची थाप मिळेल. विलासी वस्तूंची खरेदी कराल. संतती सुख उत्तम राहील. तरुण-तरुणींचे विवाहाचे योग आहेत. पत्नी सुंदर मिळेल. विद्येच्या बळावर धनप्राप्ती होईल. स्थावर इस्टेटीचा उपभोग घ्याल. उधळ्या स्वभावावर नियंत्रण ठेवून वाटचाल करा. अन्यथा कर्जबाजारी व्हाल. व्यवसाय-धंद्यामध्ये आर्थिक प्राप्ती चांगली राहील. हातात कायम पैसा खेळता राहील. कुटुंबात मान मिळेल. समाधानी वृत्तीमुळे समाजात कुठेही अडचण येणार नाही. भपकेबाज व डामडौलपणा टाळा. नातेवाईकांकडून काही बाबतीत त्रास जाणवेल. आई वडिलाच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या प्रकृतीची काळजी घ्या.

शुभदिवसः बुधवार,शनिवार,रविवार.

सिंहः 

सप्ताहात शुभ फलदायी घटना घडणार आहेत. कापडधंदा वाद्यकलेशी निगडित व्यवसायांना चलती जाणवेल. मनाविरुद्ध जर काही घडले तर सकारात्मक विचारामुळे उत्साह वाढेल. वैवाहिक जीवनात तर याचे महत्त्व फारच राहील. पित्तप्रकृतीच्या लोकांनी खाण्या पिण्यावर बंधन ठेवायला हवे. जेवणाच्या वेळाही सांभाळायला हव्या. वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. कामाचा लाभ मिळेल. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम योग आहेत. घरामध्ये तरुण वर्गाची ये जा वाढेल. स्वत:ला आनंदी ठेवण्याचा खूप प्रयत्न कराल. हाती घेतलेले काम पूर्ण कराल. नवीन गोष्टींचा वापर व्यवसाय नोकरीत करून त्यांचे प्रयोग करण्यासाठी पुढे सरसावाल. तुमच्या बौद्धीकतेचे मात्र कौतुक होईल. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. घरात धार्मिक कार्य घडतील. मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील. प्रवासातुन धनप्राप्ती होईल. स्पर्धापरिक्षेत यश लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. नोकरीत बदलीचे योग आहेत. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ सप्ताह आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी. प्रवासातून आर्थिक लाभ घडतील. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल.

शुभदिवस: मंगळवार,गुरुवार,शनिवार.

कन्याः

सप्ताहात वर्तमानकाळाशी सांगड घालणे महत्त्वाचे ठरेल. तुमची कल्पनाशक्ती वाखाणण्यासारखी राहील. राजकारणातील लोकांचे उत्तम नेतृत्व जन मानसाचा ठाव घेईल. छोटे मोठे प्रवासाचे योग वरचेवर येतील. व्यवसायात कामाची पद्धत आखीव आणि आधुनिक असल्यामुळे कामाची गती वाढेल. कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. महिला घरामध्ये टापटीप सौंदर्या भिरूची जपण्याचा प्रयत्न करतील. डोळ्यांचे आरोग्य जपायला हवे. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नोकरीत नियोजित कामे वेळेवर कराल. नवनवीन कल्पना आमलात आणाल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. केलेल्या कार्यातून उत्तम धनप्राप्ती होणार आहे. वाहन घर खरेदीसाठी शुभ योग आहे. व्यापारात धनवान होण्याचे योग आहेत. आकस्मिकपणे धनलाभ होईल. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे लौकिकता वाढेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. अतिशय शुभप्रद घटना या सप्ताहात घडतील. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे.कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल. पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल.संततीकडून आनंदाची बातमी मिळेल. व्यापारात भागीदारीत लाभ होतील. आरोग्य उत्तम राहणार आहे. मानसिक स्वास्थ लाभेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढीस लागेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आंनदायक राहिल.

शुभ दिवस : शुक्रवार,शनिवार,रविवार.

तूळ: 

सप्ताहात शुक्र ग्रहाचा धनुतील राशीप्रवेश अनेक आनंददायी शुभवार्ता मिळणार आहेत. मनःशांतीसाठी ध्यानमार्गाचा अवलंब केल्यास उत्तम. तुमच्या कामाचा लाभ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. नावलौकिक आणि प्रसिद्धीही मिळेल. तुमची हुशारी वाखाणली जाईल. नावडत्या व्यक्तीविषयी अती आकस ठेवणे बरोबर नाही. कल्पनाशक्तीच्या भराऱ्या उत्तम असल्यामुळे निर्मिती क्षमताही चांगली राहणार आहे. आर्थिक प्रगती राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य लागेल. नोकरीत वरिष्ठांकडून तुमच्या कामाला उत्तम दाद मिळेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ लाभेल. सोबतच आपण केलेल्या कामाचे कौतूक होऊन मानसन्मान देखील लाभणार आहे. वाहन सौख्य मिळेल. जोडीदाराची साथ लाभेल. व्यापारात व्यवसियाकांनी केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. आपल्याला सकारात्मक परिणाम दिसतील. विद्यार्थ्यांकडून विद्याभ्यासात प्रगती होईल. स्पर्धापरिक्षेत आपण यशस्वी व्हाल. कला लेखकवर्गास लिखाणाच्या माध्यमातून उत्तम प्रसिद्धि योग आहेत. विरोधकावर मात करण्यास काळ उत्तम आहे. मित्रमैत्रिणींकडून सहकार्य लाभेल. कुटुंबात आनंदी वार्ता मिळेल. मानसिक अवस्था उत्तम राहील. आपला आत्मविश्वास उंचावलेला असेल. कोणत्याही स्वरूपाच्या वादामध्ये मध्यस्थीची भूमिका घेऊ नका. आर्थिक आघाडीवर सप्ताह उत्तम राहणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे.

शुभदिवसः गुरुवार,शनिवार,रविवार.

वृश्चिकः 

सप्ताहात चंदभ्रमण आणि शुक्र प्रभावात कोणत्याही किरकोळ गोष्टींचा बाऊ करू नये. प्रचंड चिकाटी ठेवाल आणि अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये जास्त लक्ष दिले जाईल. याचा परिणाम अभ्यासावर होऊ शकतो. याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. आपले विचार लोकांपर्यंत पोचवणे महत्त्वाचे ठरेल. अती चिकित्सा काही वेळेस नडणार आहे. ज्यांना पाठीचे किंवा पायाचे दुखणे आहे त्यांनी औषधाबरोबर व्यायामही चालू करावा. घरात एखाद्या प्रसंगाला अचानक तोंड द्यावे लागेल. जबाबदारीने आपण काम करा. त्याच बरोबर वेळेचे नियोजन असेल तर योग्यच फायदा होईल. कोणताही महत्त्वाचा व्यवहार करताना पेपर तपासणी काळजी पूर्वक करणे आवश्यक आहे. व्यावसायिकांना काळ यशाच्या मार्गाकडे नेणारा आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासातच लक्ष द्यावे. स्थावराच्या वादात प्रेमियुगुलांना काळ प्रतिकुल आहे. विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. नोकरीत भाग्योदयाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी योग राहिल. नवयुवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नव नविन संधी आपल्याला मिळणार आहे. कलाकारांना त्यांच्या कलागुणांना विकसित करण्यास ग्रहमान अनुकूल आहेत. पतप्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल. सरकारकडून आपल्या कामाची प्रशंसा सन्मानाने होईल. नवीन प्रकल्प पुर्णत्वास जातील.

शुभदिवसः सोमवार,बुधवार,शनिवार.

धनुः 

सप्ताहात सुरुवातीस काही कष्टदायक राहील. घरामध्ये मतभेद होऊ शकतात. राजकारणात वावरत असलेल्या गुप्त शत्रूला तोंड द्यावे लागेल. रागाचा पारा जरा जास्तच चढेल. काही गोष्टी सहन कराल. परंतु जगाला तुमचे अस्तित्व दाखवून देणार आहात. घरामध्ये सौख्याच्या बाबतीत मिश्र फळे मिळतील. क्षुल्लक कारणावरून घरात वाद संभवतात. थोडी तडजोड करावी लागेल. अती भावनाप्रधानतेमुळे मूडी किंवा एकलकोंडे होण्याची शक्यता आहे. काहीसी मानसिक अस्वस्थता जाणवेल. तुम्हाला काही नवीन आव्हाने उभा राहू शकतात. तुम्हाला परिवारातून सहकार्य लाभणार नाही. एकटेपणा जाणवेल. हानी होण्याचे योग आहेत. आपल्या मनात नकारात्मक भावना वाढीस लागेल. चलबिचल वाढेल. यामुळे ताणतणाव पूर्ण सुरुवात होईल. आपल्या ध्येयप्राप्तीकडे वाटचाल करा. उत्तरार्थ अनुकुल सप्ताह आहे. विशेषत नोकरदारांना नोकरीत नवीन योजनेवर कार्य करावे लागेल. सरकारी संदर्भातील व्यक्तींना देखील बढती मिळण्याचे योग आहेत. पैशाची आवक उत्तम आल्याने समाधान व्यक्त कराल. जोडीदारांशी सौजन्याने वागावे. कुटुंबातील वातावरण एकंदरीत समाधानी राहील. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळेल. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील महिलां वर्गासाठी काळ अनुकूल आहे. मोठा अधिकार प्राप्त होईल.

शुभदिवसः मंगळवार,गुरुवार,शनिवार.

मकरः 

सप्ताहातील बुध राशीबदल आणि इतर ग्रहयोग पाहता शुभ फळे देणारे आहे. व्यावसायिक कर्ज मिळवण्याची प्रकरणे मार्गी लागतील. नोकरीमध्ये जबाबदारी वाढेल. पूर्वीच्या कर्तृत्वातून विविध प्रकारचे लाभ मिळतील. तुमची निर्णयक्षमता आणि कामाचा वेग वाढेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचा तो प्रयत्न करेल. मन आनंदी आणि उत्साही राहील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. जे अवघड आहे ते जाणून घेण्याची तुमची क्षमता वरिष्ठांच्या नजरेतून सुटणार नाही. भागीदारीत फायदा होईल. नोकरीत वरिष्ठांचे म्हणणे आपणास टाळता येणार नाही अन्यथा त्यांच्याशी वादविवाद होण्याची संभावना दाट आहे. नोकरीत बदल करण्यास काळ अनुकूल आहे. राजकिय व्यक्तींना मोठा अधिकार प्राप्त होईल. मानसन्मान मिळेल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. बहुमान मिळेल. प्रेमी युगुलांसाठी काळ प्रतिकुल आहे. बोलताना वादविवाद टाळा. काही काळ एकमेकांपासून दूरावण्याची संभावना आहे. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. प्रगतीचे नवे मार्ग आपणास ग्रहमान देणार आहे. लांबचे प्रवास आनंददायक होतील. नोकर वर्गावर विसंबून न रहाणे व्यवसायिकांना कमी त्रासाचे आहे. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला बहुमाना बरोबरच प्रसिद्धीही मिळेल.

शुभदिवसः बुधवार,गुरुवार,रविवार.

कुंभ: 

सप्ताहातील शुभ योग पाहता अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे. कारखानदारी ज्यांची आहे त्यांना फायदेशीर व्यवहार करता येतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. फक्त काही अचानक खर्चांना तोंड द्यावे लागेल. समाजात वावरताना एकटं रहायला जास्त आवडेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याला सांभाळावे लागेल. नोकरीतील वातावरण चांगले राहील. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. बरोबरचे सहकारी कामात उत्तम साथ देतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. नोकरीत अधिकार सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळेल. प्रगतीचा काळ आहे. कर्तृत्व सिद्ध केल्याचा सुखद आनंद मिळणार आहे. पतीपत्नीतील स्नेह वाढेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. आर्थिक उत्कर्षाचा असा कालावधी असला तरी खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी अचानक वसूल होतील.

शुभदिवसः मंगळवार,गुरुवार,शुक्रवार.

मीन: 

सप्ताहात नोकरी व्यवसायात अधिकाराचे योग येतील. नवीन कामे मिळतील. सरकारी कामातील अडथळे होतील. निश्चित कोणत्या दिशेने काम करावे याचे मार्गदर्शन करणारा एखादा गुरू तुम्हाला भेटेल. ज्ञान आणि धडाडीच्या जोरावर आकाशालाही गवसणी घालाल. आकस्मिक धनलाभाचे योग आहेत. वाहने मात्र सावकाश चालवा. प्रकृतीच्या बाबतीत निष्काळजी पणाने वागु नका. नोकरीत बदल नवीन संधी मिळतील. जोडीदारांचे सहकार्य महत्वपूर्ण ठरणार आहे.त्याचे सल्ले निर्णायक ठरतील. नोकरीत कनिष्ठ सहकाऱ्यांशी समजुतीचे धोरण स्वीकारावे लागेल. अन्यथा अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. संकल्प पूर्ण करण्याकरिता तुमचा भागीदार व वैवाहिक जोडीदार या दोघांची उत्तम साथ मिळणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग आहेत. आर्थिक तेजीचा सप्ताह आहे. यशामुळे तुमचे समाजातील वजन वाढणार आहे. बंधुप्रेम मिळणार आहे. विद्यार्थीवर्गाचे विद्याभ्यासात लक्ष लागेल.आपला स्वभाव फार उदार राहील. संततीचे सुख लाभेल. नविन वस्तु घेण्याचे योग आहेत. मातृसुख उत्तम मिळेल. राजकारणात जनतेकडुन मान मिळेल. स्थावर इस्टेटीचा लाभ होईल. आपल्या चैनी स्वभावावर आळा घालावा लागेल. कलाकारांना हा सप्ताह चांगला जाईल. त्यांच्या कालागुणांना वाव मिळेल.

शुभदिवसः बुधवार,शनिवार,रविवार.

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)