Zodiac Signs and Career : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची एक रास असते. त्या राशीचे काही गुणधर्म असतात, ते संबंधित व्यक्तीमध्ये आढळतात. त्या स्वभावधर्मानुसार त्या-त्या व्यक्तीचं जीवन चालतं, असं मानलं जातं. राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया वृश्चिक (Scorpio) राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.
वृश्चिक ही जलतत्त्वाची स्थिर राशी असून तमोगुणी अशी आहे. या राशीवर मंगळाचे स्वामीत्व आहे. या राशीत गुरुचे विशाखा नक्षत्र चौथे चरण शनिचे अनुराधा नक्षत्राचे चार चरण व बुधाचे ज्येष्ठा नक्षत्राचे चार चरण अशी तीन नक्षत्रे येतात. त्यामुळे राशी स्वामी मंगळ आणि नक्षत्र स्वामी गुरु, शनि व बुध यांचा प्रभाव दिसून येतो. त्यातही मंगळ, शनि व बुधाच्या खालोखाल गुरुचेही प्रभुत्व वृश्चिक राशीवर दिसून येते. धीटपणा, हट्टी स्वभाव कारस्थाने करणारी प्रवृत्ती दिसून येते. व्यक्तिमत्त्व प्रभावी व आकर्षक असल्यामुळे दुसऱ्यावर छाप पाडणाऱ्या असतात. वक्ता, डॉक्टर, छापखाना संचालक, कीर्तनकार, हार्डवेअर व पेट्रोल पंप, बिमा व्यवसाय, अध्यापन, इत्यादी व्यवसायात किंवा या क्षेत्रात नोकरी करणारे वृश्चिक राशीत असतात. वृश्चिक ही राशी मंगळाच्या मालकीची असल्याने व मंगळाचे नैसर्गिक शत्रू शनि बुधाही प्राबल्य असल्याने वृश्चिक राशीत विरोधाभास दिसून येतो.
वृश्चिक राशींच्या व्यक्ती पटकन भावना व्यक्त करताना दिसुन येत नाहीत. खूप भावना प्रधान असतात. पण आपलं शल्य फारसं कुणाला सांगत नाही. अचूक टेहळणी आणि बिनचूक हेटाळणी यांनीच करावी. मनात एक व प्रत्यक्ष कृती वेगळीच अशी वृत्ती असते. त्यामुळे काहीतरी लपवण्याची वृत्ती, थांगपत्ता न लागू देणारी यातून खोटे बोलणारी हीन मनोवृत्तीची असते. कमालीची धाडसी बेडर वृत्तीच्या या राशीच्या व्यक्ती कधी कधी स्पष्ट बोलण्यामुळे शत्रुत्व ओढवून घेतात.
वृश्चिक राशीचे लोक निरनिराळ्या वेळी निरनिराळे विचार प्रकट करणारे असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्ती प्रामुख्याने सूड बुध्दीच्या दिसून येतात. शत्रूपक्षाचा योग्य संधी मिळताच काटा काढण्यात त्या बाकबगार असतात. गुप्त विचारांनी स्वतःचेच नुकसान करणाऱ्या असतात. दुसऱ्यावर वचक ठेवण्यात या यशस्वी होतात. खर्चिक, नोकरी व्यवसायात उन्नतीवरून खाली येण्याचे अनेक प्रसंग जीवनात येतात. या रागीट संतापी किंवा कोपीष्ट दिसून येतात. यांना एकांत प्रिय असतो.
वृश्चिक या राशींच्या व्यक्ती सिक्युरिटी फोर्समध्ये, पोलीस दलात शिपायांपासून वरिष्ठ पोलीस निरिक्षकापर्यंतच्या पदावर तसेच अधिकारी पदापर्यंत किंवा प्रशासकीय पदापर्यंत आपले प्रभुत्व गाजवणाऱ्या असतात. राशीच्या व्यक्ती शूर असतात म्हणून पोलीस दलात, मिलिटरी, संरक्षण दलामध्ये प्रामुख्याने यांचा बोलबाला असतो. डॉक्टर, केमिकल इंजिनीअर, मेकॅनिकल इंजिनीअर तसेच मरीन इंजिनीअर या व्यक्ती प्रामुख्याने वृश्चिक राशीच्या दिसून येतात. या राशीच्या कर्मस्थानात सिंह ही रविची राशी असल्यामुळे या व्यक्ती सरकार दरबारी किंवा निम सरकारी खात्यात नोकरी करणाऱ्या असतात. रवि जर कर्मस्थानी असेल तर नोकरी बरोबर व्यवसाय करता नाही या व्यक्ती आढळून येतात.
या राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे पोलीस दलाबरोबर संरक्षक दल, खाजगी संरक्षण दल या बरोबप्रापर्टी, घर, जागा यांच्या खरेदी विक्रीतही त्यांना रुची दिसून येते. त्याशिवाय बांधकाम व्यवसाय प्रिंटींग व्यवसाय यात त्यांचे करीअर चांगले घडते. कर्मेश रवि दशम स्थानात सिंह राशीत असेल तर चांगली अधिकार पदाची नोकरी असते. प्रशासकीय बाबत मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. शेतीविषयक अवजारे यांचीही निर्मिती करणारे लोक वृश्चिक राशीचे आढळून येतात. गुरुच्या नक्षत्रात असेल तर खाद्यपदार्थ, बँकउद्योग, वित्तीय संस्था, धार्मिक संस्था किंवा संस्था चालक वृश्चिक राशीचे दिसून येतात. हा गुरु जर षष्ठ स्थानात असेल तर या क्षेत्रात व्यवसाय न करता नोकरी करणाऱ्या आढळून येतात. वृश्चिक राशी आणि शनिचे नक्षत्र असेल तर सेवा उद्योग, कोळसा, खाणउद्योग इमारतींची निर्मिती, बिल्डींग व्यवसाय, या फिल्ड मध्ये आढळतात. बुधाचे ज्येष्ठा नक्षत्र असेल तर प्रकाशन व्यवसाय, नियत कालिकाचे संपादक, पुस्तक निर्मिती, जाहिरात एजन्सी मुद्रण व्यवसाय, या क्षेत्रामध्ये या व्यक्ती दिसून येतात.
वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ दुषित असेल तर पोलीस दलात वृश्चिक राशीच्या व्यक्ती असल्यातरी अनैतिक उद्योग धंद्यामध्येही या आढळून येतात. प्रलोभनांना बळी न पडता जर प्रामाणिकपणे करीअरची निवड केली तर वृश्चिक व्यक्तीला जीवनात नक्कीच यशस्वी होता येईल. वृश्चिक राशीच्या व्यक्ती प्रामुख्याने नोकरीपेक्षा उद्योग व्यवसायात अधिक दिसून येतात. उद्योगशीलता हा गुण त्याच्यांत अधिक आढळून येते. परिश्रम घेतल्यास यशस्वी उद्योजक वृश्चिक राशीत घडु शकतात.
(jaynews21@gmail.com)
(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)
संबंधित बातम्या