Vastu Tips In Marathi : प्रत्येक गोष्ट करताना आपण वास्तूचा विचार करतो. घर बांधताना किंवा ऑफीस बांधताना वास्तू दिशेला फार महत्व दिले जाते. वास्तूनुसार सर्व काही असल्यास आर्थिक, नोकरी, कौटुंबिक, करिअर, व्यवसायसंबंधी अडचणी येत नाही, आणि आपल्या भोवती सकारात्मक ऊर्जेचा कायम संचार राहतो. यामुळे आपल्याला जीवनात प्रगती आणि यश मिळते.
वास्तुमध्ये दिशांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, ईशान्य दिशा, आग्नेय दिशा, वायव्य दिशा आणि नैऋत्य दिशा अशा आठही दिशांमध्ये वास्तुतील काही खास गोष्टींची काळजी घ्यावी आणि गोष्टी योग्य दिशेने ठेवाव्यात, असे मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. वास्तुशास्त्र आणि आपल्या घरांची रचना यांचा सकारात्मकता आणि चांगल्या भावना निर्माण करण्यासाठी काय संबंध आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. प्रेमळ आणि आनंदी जीवन जगण्यासाठी घरासाठी विविध वास्तू टिप्स आपल्या घरात समाविष्ट केल्या पाहिजेत.
वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेला कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेऊ नये यासंबंधी काही नियम दिले आहेत, या टिप्स घरात आनंदी वातावरण निर्माण करू शकतात. राहू ग्रह नैऋत्य दिशेचा स्वामी आहे. या दिशेला पृथ्वी तत्त्व प्रमुख आहे. जाणून घेऊया घराच्या नैऋत्य दिशेला काय असावे आणि काय नसावे?
मास्टर बेडरूमसाठी नैऋत्य दिशा उत्तम मानली जाते. घराच्या प्रमुखाची खोली याच दिशेला असावी.
नैऋत्य कोपऱ्यात पाण्याचा कोणताही स्त्रोत उपलब्ध असू नये याची काळजी घ्यावी.
या दिशेने शौचालये बांधणेही चांगले मानले जात नाही.
तसेच नैऋत्य दिशेला स्वयंपाकघर बांधू नये. यामुळे घरात नकारात्मकता वाढू शकते.
जड सामान या दिशेला ठेवता येते. यामुळे जीवनात स्थैर्य राहते, असे मानले जाते.
या दिशेला खड्डे, बोअरिंग, विहिरी, देवघर असू नयेत.
नैऋत्य दिशेला बांधलेल्या पायऱ्या घड्याळाप्रमाणे फिरणाऱ्या असाव्यात, असे सांगितले जाते.
संपूर्ण घराच्या प्रत्येक खोलीच्या समतोलात नैऋत्य कोन जड आणि उंच असावा.
या दिशेला उतार असता कामा नये. जमिनीचा उतार नेहमी ईशान्य दिशेला ठेवावा.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)