घरात अनेक गोष्टी अशाच पडून राहीलेल्या पाहायला मिळतात. अगदी आवडीने आपण काही गोष्टी विकत घेतो खरे मात्र कालांतराने त्या गोष्टी आपल्या घरातल्या माळ्यावर किंवा अडगळीच्या खोलीत पडलेल्या पाहायला मिळतात. त्यातली सर्वात जास्त पाहायला मिळणारी गोष्ट म्हणजे आपल्या घरातली भांडी. एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर तिथल्या संस्कृतीनुसार बनवल्या गेलेल्या भांड्यांचं आपल्याला अप्रूप वाटतं. ती भांडी आपण विकत घेतो किंवा आपल्या घरात जुनी आपल्या पूर्वजांची भांडी आपण आठवण म्हणून घरातल्या माळ्यावर किंवा स्टोअर रूममध्ये ठेवतो.
मात्र कालांतराने ही भांडी विस्मरणात जातात. हळूहळू त्यावर धूळ बसते आणि ही भांडी गंजतात. ही अशी भांडी आपल्या घरात वास्तुदोष निर्माण करतात. हा वास्तुदोष कालांतराने आपल्या घरच्या सदस्यांवर परिणाम करतो. वास्तुशास्त्रानुसार अशी भांडी किंवा काही गोष्टी बंद पडलेल्या किंवा गंजलेल्या किंवा वापरात नसलेल्या स्वरूपात असतील तर त्यांना ताबडतोब घरातून बाहेर काढलं पाहिजे. कोणत्या आहेत त्या वास्तू पाहूया.
वास्तूनुसार घरात बंद घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे घरात कधीही बंद घड्याळ ठेवू नये. भिंतीवर बंद घड्याळ टांगल्याने घरातील सदस्यांवर वाईट काळ सुरू होतो. अशा वेळी हे घड्याळ एकतर दुरुस्त करून भिंतीवर टांगून ठेवा किंवा घराबाहेर काढा.
तुमच्या घरात जुन्या लोखंडी वस्तू किंवा साधने पडून असतील तर ती ताबडतोब घराबाहेर काढा. कारण ज्या वस्तू किंवा साधने काम करत नाहीत, त्यांना गंज चढतो आणि मग हळूहळू वास्तुदोष निर्माण होतो. अशावेळेस, त्यांना घरात ठेवल्याने त्रास आणि समस्या वाढतात. वास्तूनुसार, ही उपकरणे गंजल्यावर जास्त धोकादायक बनतात.
जर तुमच्या घरात जुनी पितळेची भांडी असतील आणि ही भांडी दैनंदिन जीवनात वापरली जात नसतील, तर तुम्ही ती ताबडतोब तुमच्या स्टोअर रूम किंवा किचनमधून बाहेर काढा. कारण शनिदेव पितळेच्या भांड्याच्या अंधारात वास करतात असे मानले जाते. तर दुसरीकडे शनीच्या दुष्परिणामांमुळे माणसाच्या आयुष्यात अनेक समस्या येऊ लागतात. त्यामुळे जुनी पितळेची भांडी पडली असतील तर ती लगेच घरातून काढून टाकावीत.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)