हिंदू धर्मात काही वनस्पती अशा आहेत ज्यांना अत्यंत महत्वाचं स्थान देण्यात आलं आहे. या वनस्पतींना आयुर्वेदात आणि वास्तुशास्त्रातही अत्यंत महत्व दिलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या आसपास यातल्या काही वनस्पती किंवा झाडं असल्यास त्यांचा तुमच्या घरावर सकारात्मक परिणाम होतो. तुमच्या घरातलं वातावरण सुखद राहातं आणि तुम्हाला कधीही कोणत्या गोष्टींची कमतरता राहात नाही. वास्तुशास्त्रानुसार अशी कोणती झाडं आहेत जी तुमच्या घराच्या आसपास असल्यास ती झाडं तुमच्या घरावर सकारात्मक परिणाम करतात ते पाहूया.
पुराणानुसार आवळ्याच्या झाडावर देवांचा वास असतो. आवळ्याचे झाड आणि फळ भगवान विष्णूला खूप प्रिय आहेत. आवळ्याचे झाड घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे. या झाडाची नित्य पूजा केल्याने देवतांचा आशीर्वाद घरात राहतो आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते असं मानण्यात येतं.
वास्तूतील शुभ वृक्ष आणि वनस्पतींमध्ये तुळशीचे नाव सर्वात प्रथम येते. हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मीचा दर्जा देण्यात आला आहे. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असेल तिथे पैशाची कमतरता नसते. तुळशीच्या रोपामुळे घरातील नकारात्मक दोष दूर होतात. तुळशीचे रोप नेहमी ईशान्य दिशेला लावावे.
श्वेतार्क ही गणपतीची वनस्पती मानली जाते. या रोपावर हळद, अक्षता आणि पाणी अर्पण केल्याने घरात आशीर्वाद येतो आणि सुख-शांतीही टिकून राहते. या वनस्पतीच्या शुभ प्रभावामुळे देवी लक्ष्मीची कृपा घरात राहते आणि पैशाची कमतरता भासत नाही. या वनस्पतीची पूजा केल्याने सूर्यदेवही प्रसन्न होतात असे मानले जाते.
ज्योतिष शास्त्रामध्ये शमीची वनस्पती शनि ग्रहाशी संबंधित मानली जाते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी या झाडाची नियमित पूजा करणे उत्तम मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला थोड्या अंतरावर शमीचे झाड लावावे.
हिंदू धर्मात अशोकाचे झाड खूप शुभ मानले जाते. हे झाड घरातील वास्तु दोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते. घराजवळ लावल्याने इतर अशुभ झाडांमुळे निर्माण होणारे दोषही दूर होतात. ज्या घरात हे झाड असते, त्या घरातील लोकांची नेहमी प्रगती होते असं मानलं जातं.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या