मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Tula Rashi Career : तुला राशीचे लोक नोकरी असो अथवा व्यवसाय दोन्हींमध्ये नाव कमावतात, जाणून घ्या

Tula Rashi Career : तुला राशीचे लोक नोकरी असो अथवा व्यवसाय दोन्हींमध्ये नाव कमावतात, जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 20, 2024 12:18 PM IST

Tula Rashi Career Predictions : राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया तुला राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.

Tula Rashi Career Predictions
Tula Rashi Career Predictions

Zodiac Signs and Career : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीची एक रास असते. त्या राशीचे काही गुणधर्म असतात, ते संबंधित व्यक्तीमध्ये आढळतात. त्या स्वभावधर्मानुसार त्या-त्या व्यक्तीचं जीवन चालतं, असं मानलं जातं. राशीच्या गुणधर्मानुसार नोकरी, व्यवसाय निवडल्यास व्यक्तीची चांगली प्रगती होण्याची शक्यता असते. पाहूया तुला राशीसाठी करियरचे कोणते क्षेत्र अनुकूल आहे.

तुला राशीत येणारी नक्षत्रे

तुला ही पुरूषप्रधान वायु तत्वाची चर राशी असून शुक्र हा राशीस्वामी आहे. या राशीत मंगळाचे चित्रा नक्षत्र दोन चरण, राहूचे स्वाती नक्षत्र चार चरण, व गुरूचे विशाखा नक्षत्र तीन चरण ही नक्षत्रे येतात. त्यामुळे तुला राशीवर राशीस्वामी शुक्र आणि नक्षत्रांचे स्वामी अनुक्रमे मंगळ, राहू, गुरू यांचेही प्राबल्य आहे. त्यातही शुक्र, राहूचा सर्वात जास्त त्या खालोखाल गुरू आणि त्यानंतर मंगळाचा प्रभाव या राशीवर दिसून येतो. समाजप्रिय, सत्याची कास धरणारी म्हणून न्यायी वृत्तीची अशी ही राशी आहे. 

तुला राशी ही कलासंपन्न वृत्तीची समतोल प्रवृत्तीची असून या राशीचे लोक सौंदर्य प्रसाधने, कापड, कागद, स्टेशनरी, कटलरी, किराणा माल, फर्निचर, हॉटेल, लॉजिंग बोर्डिंग, सराफा दुकान, इत्यादी व्यवसायात यशस्वी होतात तर न्यायाधीश, वकील, बँक मॅनेजर, टॅक्स, प्रॅक्टिशनर म्हणूनदेखील तुला राशीचे लोक नाव कमवितात.

तुला राशींच्या व्यक्तींचा स्वभाव आणि गुणधर्म

तुला राशीच्या व्यक्ती व्यापारी वृत्तीच्या असल्याने मधुरभाषी आणि हजरजबाबी असतात. त्यामुळे आपले म्हणणे पटवून देण्याची हातोटी त्यांच्याकडे असते. तसेच ही लोकं झटकन काम हातावेगळे करतात. जबाबदारी घेण्यास कचरत नाहीत. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात. ही राशी प्रेमळ व कौटुंबिक सौख्याची अभिलाषा असणारी आहे. जीवनाविषयी आनंदाने व प्रेमाने जगण्याची वृत्ती, हळव्या वृत्तीची पण कमकुवत मनाची नसलेली, माणुसकीवर प्रेम करणारी वृत्ती असे गुण या राशीत दिसून येतात. 

तसेच, या राशीचे लोक स्वधर्माचे आचरण करणाऱ्या धार्मिक वृत्तीच्या असतात. बुध्दीमान व्यक्ती तुला राशीच्या दिसून येतात. बौध्दिक क्षेत्रात काम करणारे शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार परंतु धार्मिक श्रध्दा ठेवणाऱ्या व्यक्ती या राशीत दिसून येतात. काही प्रमाणात आक्रमक वृत्तीचे लोकही तुला राशीत दिसून येतात. काही बाबतीत चंचलपणा असला तरी विचार प्रवाही असतात. व्यवसाय वारंवार बदलण्याची सवय असल्याने आयुष्यात खूप उशीरा स्थिर होतात. वितंडवाद घालण्याची प्रवृत्ती आढळते. पुरूषार्थी परंतु आळशी स्वभाव असतो.

तुला राशींच्या व्यक्तींसाठी अनुकुल कार्यक्षेत्र

 तुला या राशीच्या व्यक्तीच्या कर्मस्थानी कर्क राशी असते. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र जलकारक ग्रह असून या व्यक्ती खाद्यतेल, पेट्रोलियम उद्योग या व्यवसायात दिसून येतात. शुक्र या राशीचा स्वामी असून हॉटेल उद्योग, खानावळ, कलेसंबंधी व्यवसाय, ब्युटी पार्लर, फोटो ग्राफी, चित्रस्टुडिओ या उद्योगाशी संबंधीत या व्यक्तीचे करिअर असते. बिसलरी वॉटर व्यवसायात तुला राशींच्या व्यक्ती दिसून येतात. 

ऑटोमोबाईल, ॲग्रो केमिकल अशा उद्योग व्यवसायात तुला व्यक्तींचा वावर आढळतो. सौंदर्यप्रसाधने, ब्युटीपार्लर, सुगंधीत अगरबत्ती, धूप, अत्तर या व्यवसायात तुला व्यक्ती करीअर करताना दिसतात. साखर उद्योग, मिठाई उद्योग, हिरे उद्योग व्यवसायात तुला व्यक्तींना चांगले करिअर असते. न्यायदान पध्दती, न्यायालय, हुकूमशाही पध्दतीने मध्यस्ती करणे, तंटे भांडण सोडवणे या कार्यात तुला राशींच्या व्यक्तींना रस असतो. त्यामुळे कायदेशीर आणि बेकायदेशीर रीतीने न्याय देण्याच्या कार्यात तुला व्यक्ती आढळून येतात. या राशीवर शुक्राबरोबर मंगळ राहू आणि गुरुचा ही प्रभाव असल्याने या व्यक्ती पोलीस यंत्रणा, धार्मिक संस्था शिक्षण संस्था याबरोबर बेकायदेशीरपणे किंवा कायद्याने अभय नसणाऱ्या उद्योग व्यवसायात सुध्दा तुला व्यक्ती दिसून येतात. 

तुला या राशीच्या कर्मस्थानात कर्क राशी असून कर्केचा स्वामी चंद्र जर षष्ठ या अशुभ स्थानात असेल तर वरील व्यवसायात नोकरी करणे हा या राशीचा पिंड असतो. परंतु षष्ठ स्थान सोडून चंद्र जर शुभ स्थानात असेल तर या व्यक्ती मोठा उद्योग व्यवसाय करताना आढळतात. चंद्र जर शनिच्या युतीत असेल तर या व्यक्ती हमखास नोकरी करताना दिसतील. परंतु मंगळ शुक्राच्या युतीत असेल तर या व्यक्ती उद्योगात दिसतात. वरील क्षेत्रात व्यवसाय करतांना व नोकरी करतांना अशा दोन्ही प्रकारच्या करीअरमध्ये तुला व्यक्ती दिसून येतात. त्याहीपेक्षा ही राशी शुक्र प्रधान असल्या मुळे कला उद्योग, संगीत, सिनेमा उद्योग, काव्यरचना, गीत रचना अशा विविध क्षेत्रांमध्ये सुध्दा तुला व्यक्तींचे करीअर उत्तम होऊ शकते. नाट्य अकादमी या क्षेत्रात अध्यापन करण्याचे करीअर तुला व्यक्तींना खुलं आहे. या क्षेत्रात सुध्दा त्यांना चांगली संधी उपलब्ध आहे. नोकरी आणि व्यवसाय दोहोतही तुला राशींचा उत्कर्ष करता येऊ शकतो.

 

 

जय अर्जुन घोडके

(jaynews21@gmail.com)

(लेखक ज्योतिषविद्येचे अभ्यासक आहेत.)