Today Horoscope 19 May 2024: आज रविवार, १९ मे २०२४ रोजी मोहिनी एकादशी आहे. आज चंद्र कन्या राशीतून आणि हस्त नक्षत्रातून संक्रमण करणार आहे. तर दुसरीकडे शुक्र राशीपरिवर्तन करीत वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सोबतच आज वज्र योग आणि बव करण योग जुळून येत आहे. यासर्व बदलांमध्ये आज रविवार सुट्टीचा दिवस कोणासाठी कसा असणार हे राशीभविष्याच्या माध्यमातून जाणून घेऊया.
आज रविवारी हस्त नक्षत्रातून चंद्र संक्रमण होत आहे. समाजात तुम्हाला मानसन्मान मिळेल. घरामध्ये नवीन येणाऱ्या जबाबदाऱ्या हसतमुखाने पेलाव्या लागतील. मनावर याचा थोडासा ताणही येईल. प्रगतीचे नवे मार्ग तुम्हाला सापडतील. लांबचे प्रवास आनंददायक होतील. नोकर वर्गावर विसंबून न रहाणे व्यवसायिकांना फायद्याचे आहे. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला बहुमानाबरोबरच प्रसिद्धीही मिळेल.
वृषभ राशीसाठी आज ग्रहमान अनिष्ट असल्याने घरातील काही कारणांमुळे मानसिक अस्थिरतेला तोंड द्यावे लागेल. हातात पैसा आल्यामुळे बरीच जुनी देणी देऊन टाकाल. जोडीदाराबरोबर क्षुल्लक कारणावरून वाद संभवतात. कोणतेही काम पूर्णत्वाकडे न्यायचे असेल तर काही गोष्टींकडे कानाडोळा करावा लागेल. रोजगारात जबाबदारीनुसार काम करा. मनात अशांती असल्या कारणाने तुम्हाला संकटाचा सामना करावा लागेल.
आज वज्र योगात आर्थिक बाबतीत पैसा वसूल करण्यासाठी जरा जास्तच कष्ट घ्यावे लागणार आहेत. तरी शेवटी पैसे परत मिळतील. कष्टाला पर्याय नाही या युक्तीला अनुसरुन प्रगती करणार आहात. तुमच्या धोरणीपणामुळे तुमचे यश पक्के आणि स्थायी स्वरूपाचे असेल. व्यवसायाच्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला मोहित करणारे असेल. एक वेगळाच उत्साह आणि आनंद लाभेल. अनेक दिवसांपासून नवीन जागा घेण्याच्या विचारात असाल तर त्यात यश मिळेल.
कर्क राशीसाठी आज अनिष्ट स्थानातून चंद्रभ्रमण होणार आहे. त्यामुळे घरात आणि घराबाहेर प्रवाहाच्या विरूद्ध पोहण्याचे विचार तुमच्या मनात येतील आणि ते अंमलातही आणाल. प्रचंड मेहनतीच्या मानाने अतिशय क्षुल्ल्क यश मिळत असल्यामुळे थोडे निराशेकडे झुकाल. अशावेळी आपण कुठे कमी पडतोय हे कळण्यासाठी त्यातील तज्ञांचा अवश्य सल्ला घ्या. कामानिमित्त प्रवासाचे योग येतील. जवळच्या माणसांची परिस्थिती समजून घ्यावी लागेल. खर्च अचानक वाढणार असल्याने आर्थिक नियोजनाचे गणित चुकू शकते.
सिंह राशीच्या लोकांसाठी आज चंद्रबल उत्तम लाभणार आहे. मात्र जोडीदाराच्या मनाचा विचारही करावा लागेल. आर्थिक जम बसेल. मुलांसाठी काही कारणास्तव पैसा खर्च करावा लागेल. नवीन गोष्टींची सुरुवात कराल. स्वतःला प्रसिद्धीझोतात आणायचे असेल तर कोणा मध्यस्थाचा आधार घ्यावा लागेल. कलाकरांना चांगल्या संधी मिळतील. यशाची अपेक्षा तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल.
कन्या राशीसाठी आज ग्रहमान अनुकुल असल्याने नवीन प्रॉपर्टीसंबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहयोग आहे. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांची प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. महत्वाच्या कार्यात भावंडांचे सहकार्य लाभेल. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल.
तूळ राशीच्या लोकांना आज बव करणात परदेशगमनाचे योग जुळून येतील. नवीन आर्थिक गुंतवणूक कराल. घरामध्ये अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे थोडी चिडचिड होईल. स्वतःच्या मताबरोबर इतरांचाही विचार करावा लागेल. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराच्या मनासारखे वागल्यामुळे सौख्याचा अनुभव घ्याल. सामंजस्याने मुलांच्या मनाचा आदर केल्यामुळे दोन पिढ्यांमधील अंतर कमी होईल. त्यामुळे मुलेही आनंदी राहतील. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील.
आज शुक्र राशीपरिवर्तनात वृश्चिक राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहिल. सर्वच बाबतीत मागचा अनुभव पाठीशी घेऊन निर्णय घ्याल. व्यापारात स्वतःचे सामर्थ्य ओळखून वाटचाल कराल. स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचे महत्त्व जपाल. आजूबाजूच्या जगात व्यवहारामध्ये चौकसपणा ठेवलात तर फायद्याचे ठरेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. एखाद्या कामात वरिष्ठांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
धनु राशीसाठी आज चंद्रबलं उत्तम राहील. बरीच रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. तरुणांना प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. तुमची मते मुलांच्या गळी उतरवण्यासाठी जरा जास्तच [प्रयत्न करावे लागतील. संघर्षाचा आणि प्रतिकाराचा भाग जरा जास्त राहिल्यामुळे तापटपणा वाढेल. दुसऱ्याला समजून घेण्यात थोडे कमी पडाल. दुसऱ्यावर कुरघोडी करण्याअगोदर विचार करावा लागेल. अथवा मतभेद होऊ शकतात.
आज चंद्राच्या नक्षत्रातून होणाऱ्या चंद्रभ्रमणात मकर राशीच्या लोकांनी नातेवाईकांमध्ये आर्थिक व्यवहार करू नयेत. थोडे आस्थिर आणि चंचल बनाल. उद्योग-व्यवसायात मनावर ताबा ठेवावा लागेल. हट्टी आणि दुराग्रही स्वभावामुळे जवळच्या लोकांची मने दुखावली जाण्याची शक्यता आहे. तुमच्यातील सुप्त कला दाखवण्याची संधी मिळेल. वाहने जपून चालवा. हितशत्रूंचा त्रास तुमचे मानसिक स्वास्थ्य बिघडवणार आहे.
कुंभ राशीच्या लोकांनी आज वज्र योगात आपल्या हातून कोणता अविचार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक निर्णय चुकीचे घेतले जाण्याची शक्यता आहे. कर्जबाजारी असणाऱ्यांनी हप्ते वेळेवर फेडण्याची खबरदारी घ्यावी. शांत हळुवार काम करण्याच्या वृत्तीमुळे रचनात्मक कामाकडे ओढा राहील. एखाद्या परिस्थितीचा चांगला आढावा घ्याल. इतरांवर जास्त विश्वास टाकत नसल्यामुळे कामाचा भार स्वत: उचलावा लागेल. परंतु त्यामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा जास्त जाणवेल. अचूक मेहनत करूनही फळ कमी प्रमाणात मिळेल.
आज शुक्र राशीपरिवर्तनात कलाक्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. जुन्या मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना प्रचंड सहकार्य कराल. कार्यक्षेत्रात नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त राहण्यास मदत होईल. तरुणांच्या आवडी निवडी बदलत राहतील. त्यामुळे स्वभाव चंचल बनेल. मनाप्रमाणे खरेदी कराल.
संबंधित बातम्या