मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today Horoscope 11 May 2024 : आज या राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा! वाचा विनायक चतुर्थी विशेष राशीभविष्य

Today Horoscope 11 May 2024 : आज या राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा! वाचा विनायक चतुर्थी विशेष राशीभविष्य

Priyanka Chetan Mali HT Marathi
May 11, 2024 08:45 AM IST

Today Horoscope 11 May 2024 : आज ११ मे २०२४ शनिवार रोजी, चंद्र मिथुन राशीतून आणि मंगळ व राहुच्या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. ग्रह-नक्षत्राच्या या बदलामुळे १२ राशींवर काय परिणाम होईल? वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

राशीभविष्य ११ मे २०२४
राशीभविष्य ११ मे २०२४

आज शनिवार ११ मे २०२४ रोजी विनायक चतुर्थीचा शुभ दिवस आहे. दरम्यान चंद्र मिथुन राशीतून आणि मंगळ व राहुच्या नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. तसेच शनिशी नवमपंचमयोग निर्माण होत असून सुकर्मा योगदेखील आहे. या शुभ योगांचा परिणाम राशीचक्रातील बारा राशींवरसुद्धा दिसून येणार आहे. कसा असेल आजचा दिवस? पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार, वाचा आजचे राशीभविष्य.

मेष

आज चंद्र संक्रमण पाहता मेष राशीसाठी दिवस मध्यम स्वरूपाचा राहिल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थोडा काळ थांबावे लागेल. घरातील खर्च अपरिहार्य कारणामुळे वाढतील. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नयेत. नोकरीनिमित्त घराबाहेर रहाण्याचे योग येतील. इतरांनी दिलेला सल्ला तुम्हाला आवडणार नाही. तुमच्या लहरी स्वभावाला इतरांना तोंड द्यावे लागणार आहे.

वृषभ

वृषभ राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. आज सुकर्मा योगात आर्थिक घडी थोडी अस्थिर होईल. घरातील सदस्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यात अपयशी राहिल्यामुळे घरात थोडीशी चिडचिड होईल. मानसिक स्वास्थ्य बिघडवणारी परिस्थिती उत्पन्न होईल. तणावामुळे अनिद्रेचा त्रास जाणवेल. मनावर संयम राखण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी कामात अडचणी अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. मन सतत चिंताग्रस्न राहील. व्यापारात समस्या निर्माण होतील.

मिथुन

मिथुन राशीसाठी आज चंद्राच्या संक्रमणामुळे शुभ योग जुळून येत आहे. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. तुमची कार्यक्षमता वाढणार आहे. तसेच कार्यक्षेत्र विस्तारेल. अनेक महिन्यांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा नव्याने उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. साहित्य क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना चांगला आर्थिक लाभ होईल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आजचे चंद्रबलं पाहता तुमच्यात असलेली कला लोकांपर्यंत पोहचावी यासाठी अतोनात प्रयत्न कराल. तुम्ही आत्तापर्यंत घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.सामाजिक क्षेत्रात मान सन्मान वाढेल. पुढील काळात तुमच्या कार्यक्षेत्रात, आर्थिक, कौटुंबिकबाबतीत परिवर्तन घडणार आहे. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. रागीट स्वभावामुळे तुमच्याकडून वाद निर्माण होऊ शकतात.

सिंह

आजचे चंद्रबल पाहता सिंह राशीसाठी दिवस चांगला असणार आहे. एखादी गोष्ट भाग्यात असेल तर ती मिळतेच याचा प्रत्यय येईल. आपल्या महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. भाग्योदयकारक दिनमान आहे. आज तुम्हाला नशीबाची उत्तम साथ लाभणार आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. तुमच्या हातून आध्यात्मिक आणि सामाजिक कार्य घडेल.

कन्या

कन्या राशीसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असणार आहे. आज चंद्र आणि शनिचा नवमपंचम योग जुळून येत आहे. या राशीच्या लोकांना आज व्यक्तिगत समस्या निर्माण होतील. मात्र बौद्धीक आणि वैचारिक पात्रता वाढेल. तुमच्या बौद्धिक क्षमतेची नोंद नक्कीच सगळीकडे घेतली जाईल. कौटुंबिक जबाबदारीकडे लक्ष द्यावे लागेल. आहारात नियमितता ठेवा अथवा आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कामाच्या धावपळीत मानसिक आणि शारिरिक थकवा जाणवेल.

तूळ

तूळ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज सुकर्मा योगात जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. तुमच्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. शासकीय नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. उद्योगधंद्यात अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्यत पत्नीची साथ मिळेल.

वृश्चिक

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस मध्यम स्वरुपाचा असेल. आज चंद्राचे बुधाच्या राशीतून होणारे भ्रमण तुमच्या व्यक्तीत्वामध्ये सुधारणा करण्यास महत्वाचे ठरेल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. त्यामुळे कामातून वेळ काढून जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची चांगली साथ मिळेल. त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही.

धनु

धनु राशीसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरूपाचा राहील. आज सुकर्मा योगात चांगल्या सुविधा मिळाल्यामुळे कामाचा दर्जा वाढवण्यावर तुमचा भर राहील. संतुलित विचाराचा पाठपुरावा करण्याच्या तुमच्या स्वभावाचा तुम्हाला फायदा होणार आहे. फक्त रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही प्रश्नाची उकल तुमच्याकडून फार चांगली होत असल्यामुळे अनेक जणांचे सल्लागार बनाल.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. आज अनुकूल ग्रहयुतीत तुमच्या उत्तम बुद्धीमत्तेचा योग्य वापर कराल. एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना योग्य संधी उपलब्ध होतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. आयुष्यात झालेले बदल जितक्या लवकर आत्मसात कराल तितका यशाचा आलेख उंचावेल.

कुंभ

आज चंद्राचे मंगळ ग्रहाच्या नक्षत्रातून होणारे भ्रमण पाहता विचार पूर्वक निर्णय घ्या. घरात आणि घराबाहेर थोडी संघर्षात्मक विरोधात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते. दीर्घकाळ रेंगाळणाऱ्या व्याधींना तोंड द्यावे लागेल. घरातील मोठ्या व्यक्तींशी न पटल्यामुळे ताणतणाव जाणवेल. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल.

मीन

मीन राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज शनिशी होणारा चंद्राचा योग पाहता कलाकारांची कला बहरेल. लेखक कलावंतांना नव्या संधी मिळतील. कामातील बदल हा सुद्धा तुम्हाला काम करण्यासाठी उत्साहदायी ठरेल. उपासना करणार्‍यांना भक्ती आणि श्रद्धेची आर्द्रता जाणवेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. व्यवसाय असणार्‍यांना आपला धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे.

WhatsApp channel