Sun Transit 2023 : सूर्याचा कन्या राशीत प्रवेश, 'या' चार राशींच्या व्यक्तींना सावध राहावं लागणार
Surya Gochar 2023 : सूर्य देव येत्या १७ सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. अनेक राशींवर याचा प्रतिकूल परिणाम होणार आहे.
Surya Rashi Parivartan : सूर्याशिवाय मानवी जीवनाची कल्पनाच करता येत नाही. पावसाळ्यामध्ये अनेक दिवस नुसता सूर्य दिसला नाही तरी मनावर एक प्रकारचं मळभ दाटून येतं. आणि जेव्हा सूर्यदर्शन देतो, तेव्हा मन उत्साहानं भरून येतं. सूर्य हा कधी न थकता आपलं कर्तव्य बजावत असतो. हिंदू धर्मात सूर्याला देवतेचं स्थान देण्यात आलं आहे. आपल्याकडं श्रद्धाळूंच्या दिवसाची सुरुवात सूर्यनमस्कारानं व सूर्याला अर्घ्य देऊनच होते.
ट्रेंडिंग न्यूज
ज्योतिषशास्त्रातही सूर्य ग्रहाला विशेष महत्त्व आहे. सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. ज्योतिष विद्येच्या मान्यतेनुसार, सूर्य दर महिन्याला राशी परिवर्तन करतो. म्हणजेच, एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या या जागा बदलाचा किंवा राशी परिवर्तनाचा परिणाम १२ राशींवर वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. चालू महिन्यात येत्या १७ सप्टेंबर रोजी सूर्य कन्या राशीत प्रवेश करणार आहे. कन्या राशीवर बुध ग्रह प्रभावी असतो. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी सूर्याचा पुढील प्रवास सुरू होऊन तो तुला राशीत प्रवेश करेल. मात्र, त्या आधी सूर्याचं स्थान कन्या राशीत असून सूर्याचं इथलं वास्तव्य काही राशींच्या व्यक्तींना शुभ आणि लाभदायी ठरेल. तर, काही राशींसाठी हे अशुभ ठरेल.
पाहूया कोणत्या राशींवर काय होतील परिणाम?
तूळ : सूर्याचं राशी परिवर्तन तूळ राशींच्या व्यक्तींसाठी फारसं शुभ नसेल. या राशीच्या व्यक्तींचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आर्थिक चणचण जाणवू शकते. आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळं कोणतंही पाऊल टाकताना जपून टाका, असा सल्ला देण्यात आला आहे.
कुंभ : या राशीच्या लोकांसाठी सूर्य आठव्या स्थानी राहील. हे स्थान अनिश्चिततेचं स्थान म्हणून ओळखलं जातं. शनि देव हा या राशीचा स्वामी आहे. शनि आणि सूर्य यांच्यात कुठल्याही प्रकारचं सख्य नाही. त्यामुळं सूर्याच्या राशी परिवर्तनामुळं या राशीच्या लोकांना महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येऊ शकतात. आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल.
मेष : मेष राशीच्या सहाव्या स्थानात सूर्याचं वास्तव्य असेल. हे शत्रूचं घर असल्याचं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. या घरात सूर्याचा प्रवेश होताच मेष राशीच्या जातकांना प्रतिकाराचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तुमच्या विरोधात कटकारस्थानं शिजण्याची शक्यता आहे. मानसन्मान कमी होऊ शकतो. तुमच्याप्रति असलेल्या आदराला तडा जाऊ शकतो.
मीन : सूर्याचा कन्या राशीत प्रवेश मीन राशीच्या लोकांसाठी नकारात्मक ठरण्याची दाट शक्यता आहे. आर्की राशीच्या लग्न स्थानात सूर्याचं वास्तव्य असेल. या बदलामुळं मीन राशींच्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी काही कारणास्तव बदनामी होऊ शकते. आर्थिक फटका बसण्याची देखील चिन्हं आहेत.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती ज्योतिषविद्या व धार्मिक मान्यतांवर आधारीत आहे. ती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा हिंदुस्तान टाइम्स मराठीचं म्हणणं नाही. त्यामुळं या माहितीचं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील योग्य व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्या.)